बुद्धीची देवता असलेल्या गणपतीला पूजेमध्ये अग्रक्रम दिला जातो. तो सुखकर्ता, दु:खहर्ता आणि विघ्नविनाशक आहे. सुखकर्ता म्हणजे रचनाकार, दु:खहर्ता म्हणजे सुव्यवस्थाकार आणि विघ्नविनाशक म्हणजे प्रणाली निर्माण करणारा. गणपतीचा हा मूळ अर्थच आज विस्मृतीत गेला आहे. त्यामुळे कुठेही आराखडा, सुव्यवस्था आणि प्रणाली दिसत नाही आणि आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते.
गणपती हे समस्त भारतीयांचं आराध्यदैवत. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवावर दहशतवादाचं सावट दिसतं. गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात स्वाईन फ्लूने थैमान घातल्यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडलं होतं. या वर्षी स्वाईन फ्लूचा प्रकोप तुलनेनं कमी असल्यानं पुन्हा पूर्वीचाच उत्साह अनुभवायला मिळेल. गणपतीच्या नावावर सर्वत्र ढोल-ताशे वाजतील आणि लोक नाचतील पण, हे सर्व करत असताना ‘गणपती’ या शब्दाचा अर्थ आपण विसरलो आहोत की काय, असा प्रश्न पडतो. ‘सुखकर्ता’, ‘दु:खहर्ता’ आणि ‘विघ्नविनाशक’ अशी गणपतीची तीन महत्त्वाची विशेषणं आहेत. त्याचाच विसर पडल्यामुळे आता गणपती आपल्याला पावेनासा झाला आहे आणि त्यामुळेच आजची संकटं निर्माण झाली आहेत.
इसवीसनातील पहिल्या, दुसर्या किवा तिसर्या शतकाच्या दरम्यान पुराणकथा लिहील्या गेल्या असं मानलं तर इसवी सन पहिल्या शतकापूर्वीही गणपती ही संकल्पना आपल्याला माहिती होती, असं लक्षात येतं. या संकल्पनेतील देवत्त्व आपण पाहिलं होतं, त्याचं प्रतिकही निर्माण झालं होतं. पण, देव म्हणून या संकल्पनेला तोपर्यंत मान्यता मिळाली नव्हती. असं असतानाही त्याची सुखकर्ता, दु:खहर्ता आणि विघ्नविनाशक ही महत्त्वाची विशेषणं मान्य झाली होती. अलीकडच्या काळात मात्र या विशेषणांचाच आपल्याला विसर पडला आहे, असं खेदाने म्हणावंसं वाटतं. गणपती ही संकल्पना योग्य पद्धतीने जाणून घेण्यासाठी आणखी काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. त्यासाठी ‘शिव’ या संकल्पनेचा अर्थ समजून घ्यावा लागेल.
आपल्या संस्कृतीमध्ये
ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन आदीशक्तींपैकी महेश म्हणजे शिव ही महत्त्वाची शक्ती मानली जाते. शिव म्हणजे शंकर. तो गणपतीचा पिता, असं आपली संस्कृती सांगते. माणसाच्या मनातील कल्याणकारी निर्मितीक्षम प्रकाश म्हणजे शिव, असा शिव या शब्दाचा सांस्कृतिक अर्थ आहे. पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतीकोशात शिव या शब्दाचे दोन अर्थ दिले आहेत. त्यामध्येच हा अर्थ सांगितला आहे. या शिवाचा मुलगा म्हणजे गणपती. पण, शिव म्हणजे कल्याणकारी प्रकाश असेल तर त्या प्रकाशाचं फलित म्हणजे गणपती, असं म्हणता येतं. या निमित्ताने शिवाबरोबरच पार्वतीचाही विचार करायला हवा. ‘पार्वती’ या शब्दाचा नेमका अर्थ शोधण्याचा बराच प्रयत्न केला, समाधानकारक उत्तर मिळालं नाही. काहींनी ‘पर्वतकन्या’ म्हणजे पार्वती असं सांगितलं. मी मात्र या शब्दाचा थोडा वेगळा अर्थ लावला आहे. शिव म्हणजे माणसाच्या मनातील कल्याणकारी प्रकाश असेल तर पार्वती म्हणजे माणसाच्या मनातील कोणत्याही निर्मितीय क्षेत्रात पर्वतीय उंची गाठण्याची क्षमता, असा अर्थ होऊ शकतो. कोणत्याही सृजनात्मक गोष्टीची निर्मिती करताना अधिकाधिक उंची गाठण्याचा विचार यामागे आहे. शिव आणि पार्वती या दोन्ही संकल्पनांमध्ये भारतीयांनी देवत्त्व पाहिलं. कोणतीही समस्या सोडवायची असेल तर ती सृजनात्मक (क्रिएटीव्ह) मार्गाने सोडवू, हा विचार भारतीयांच्या मनात होता. याच काळात विविध कला आणि त्यांच्या शास्त्रांचा उगम झाला. योगशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, अंकगणित, शिल्पशास्त्र, नाट्यशास्त्र, चित्रकला आणि त्याचं शास्त्र अशा गोष्टींचा उगम याच संस्कृतीत झाला. त्यामुळे त्याची महानता अधिक आहे. या सृजनशीलतेमध्ये ऐहिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही बाबी एकत्र आहेत. हे जगात दुसरीकडे कुठेही पहायला मिळत नाही. स्वत:बरोबरच दुसर्यांचाही
विचार या संस्कृतीमध्ये आहे.
बुद्धीची देवता म्हणून मान्यता पावलेल्या गणपतीला कोणत्याही पूजेमध्ये अग्रस्थान असते. तो सुखकर्ता, दु:खहर्ता आणि विघ्नविनाशक आहे. सुखकर्ता म्हणजे रचनाकार (डिझायनर), दु:खहर्ता म्हणजे सुव्यवस्थाकार आणि विघ्नविनाशक म्हणजे प्रणाली निर्माण करणारा. आराखड्यातून (डिझाईन) सुव्यवस्था निर्माण होत असते आणि अनेक सुव्यवस्थेतून सिस्टीम अर्थात यंत्रणा किवा प्रणाली निर्माण होत असते. हे लक्षात घेतलं की गणपतीच्या व्यापक रुपाची अधिक कल्पना येईल. या तिन्ही गोष्टींचं समान रुप आहे. आज आपण तेच विसरलो आहोत आणि त्यामुळेच आज अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डिझाईन, सुव्यवस्था आणि यंत्रणा या गोष्टींचा विसर पडल्याने आता गणपती पावेनासा झाला आहे. त्यामुळेच अनेक समस्यांचा सामना आज करावा लागत आहे.
अचानक आलेल्या आपत्तीला कसं सामोरं जावं, यासाठी आपण यंत्रणा उभी करू शकलो नाही. त्यामुळे एखादा साथीचा आजार आला की त्यामध्ये माणसांचा बळी जाऊ लागला. स्वाईन फ्लूच्या, महापूराच्या निमित्ताने त्याची प्रचिती येते. व्यवस्था निर्माण करायची नाही आणि उत्सव मात्र जोरात करायचा, ही विसंगती मनाला खटकणारी आहे. गणपती या संकल्पनेचा अर्थ लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे. त्यातील सृजनात्मकता समजून घेतली पाहिजे. त्यानुसार प्रत्येकाने निर्मितीक्षम राहिलं पाहिजे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या गोष्टींचा विचार आवर्जून करायला हवा. समाजातील सुजाण लोकांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. अगदी रस्ता पार करतानाही ‘गणपती’ या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. तो घेतला नाही की अपघात होतात. सामान्य माणसाला अनेक विघ्नांचा सामना करावा लागतो. व्यवस्था निर्माण न केल्यामुळेच म्हणजेच ‘गणपती’ समजून न घेतल्याचाच हा परिणाम आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज कुठल्या कुठे हरवला आहे. लोकांच्या मनातील मूर्तीचं स्थान लक्षात घेऊन सर्व विद्या, कलांना एकत्र आणण्याच्या आणि त्या माध्यमातून समाजाला एकत्र करण्याच्या हेतूने त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. साधारणपणे 1958 पर्यंत हा उद्देश सफल होत होता. त्यानंतर मात्र
परिस्थिती वेगाने बदलत गेली. पुढे गणेशोत्सव समाजकंटकांच्या हाती गेला. त्याचं मूळ सृजनात्मक रूप
कुठल्या कुठे नष्ट झालं. लोकांना नाडून पैसे उकळणं, पोलिस यंत्रणेला वेठीस धरणं असे प्रकार सुरू झाले. या सर्व गोष्टींचा विचार करता ‘गणपती’ या संकल्पनेतील सृजनशीलता पुन्हा एकदा समजावून घेण्याची
आवश्यकता आहे, असं वाटतं.
(अद्वैत फीचर्स)
— रवी परांजपे – ज्येष्ठ चित्रकार
Leave a Reply