वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू शकतो कि, हा लेख ज्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही असे हे लोक आहेत.
ज्या लोकांना भ्रूण हत्येची भीती वाटते असे लोक अश्या पणत्याना उकिरड्यावर फेकतात, अथवा अनाथ आश्रमामध्ये रवानगी करतात, किव्वा घरात पणत्यांची आरास तयार करतात. आता इतक्या पणत्या घरात आल्यावर त्यांच्या उजेडात हा वंशाचा दिवा कोणते दिवे लावणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
यातील बहुतेक पणत्या पिताश्री घाटावर जाईपर्यंत सासरी जात नाहीत, कदाचित त्या न जाण्यामुळेच चिंतेने हाय खाऊन पिता यमाच्या दरबाराकडे प्रस्थान करतो, आणी या वंशाच्या दिव्याला अग्नी देण्याचे दिव्य कर्तव्य बजावावे लागते.
खऱ्या अर्थाने कथा इथे सुरु होते, मागे राहिलेल्या कुटुंबाची बाप जिवंत असताना सुरु झालेली ससेहोलपट वेग धरू लागते. मुली सासरी न जाता वडिलांचा अर्धवट संसार आपल्या माऊलीकडे व या दिव्याकडे पहात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नशिबाला दोष देतात.
आजच्या जगात पणत्या काय कमी सक्षम आहेत का? त्या सर्व ठिकाणी खांद्याला खांदा भिडवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहेत, मग त्या काय अग्नी देण्यासारखी क्रिया करू शकत नाहीत? आजकाल वर्तमानपत्रात मुलीनी आपल्या वडिलांना अग्नी दिला, अश्या बातम्या वारंवार छापून येत आहेत, हे समाज परिवर्तनाचे सुंदर उदाहरण आहे, यालाच आपण धर्म मानला पाहिजे. मुक्ता दाभोळकर, पंकजा मुंडे, यांच्या सारख्या असंख्य मुलींनी समाजविरोध पत्करून आपल्या पित्याला अग्नी दिला, यांनी २१व्या शतकातील आदर्श प्रथा सुरु केली असे वाटत नाही का? या महिलांचा आदर्श समाजाने सशर्त स्वीकृत केला पाहिजे, आणि अश्या मुक्ता, पंकजा प्रत्येक घरात जन्माला आल्या पाहिजेत.
ज्या काळात अग्नी देऊन अंत्यविधी करण्याची प्रथा अस्तित्वात आली, त्या काळी कुटुंब नियोजन प्रथा अस्तित्वात नव्हती, पाच ते आठ अपत्य असणे हेच कुटुंब नियोजन मानले जात असे, त्यामुळे त्यात किमान एक मुलगा जन्माला येतच असे. एकंदरीत, त्या काळी मुली, व बायका घराबाहेर फारश्या जात नसत, त्यामुळे मुलगे अग्नी देण्याचे काम बजावत असत, यात कोणताही कर्मकांडाच्या भाग नाही, तर ही एक सर्वसामान्य रूढी होती.
केवळ अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे असे म्हणून सर्व घरावर देशोधडीला लागण्याची पाळी येऊ देऊ नका असे या लेखाद्वारे सांगण्याची वेळ आली आहे, त्याच बरोबर हे हि सांगणे अपरिहार्य आहे कि, अश्या बऱ्याच प्रथा आपण मागे सोडून दिल्या आहेत, हे एकविसाव्या शतकातील लोकांनी विसरायला नको.
हे लक्षात राहूद्या स्थल-काल-परत्वे ज्या मुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे, अश्या पौराणिक प्रथा व परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तसेच नवीन लोकहित प्रथा अस्तित्वात आल्या पाहिजेत, तरच लोक धर्माकडे आदराने पाहतील. धर्म म्हणजेच रूढी परंपरा काळानुसार तयार करून त्या नुसार जगणे, यात काही रूढी हजारो वर्षांपूर्वी योग्य असतील, पण आज त्यांची गरज नाही, तर त्या एक तर सोडून द्याव्यात, किव्वा त्यात काळानुसार बदल करावा.
डार्विन ने सांगितल्याप्रमाणे उत्क्रांती हा निसर्गाचा नियम आहे, यात जो सक्षम आहे तोच जिवंत राहतो आणी सक्षम तोच असतो जो आपल्यात निरंतर बदल घडवितो. धर्मातही आज उत्क्रांतीची नितांत गरज आहे, अन्यथा कर्मठ, अघोरी धर्म डायनासोर सारखे लुप्त होण्यास वेळ लागणार नाही.
धन्यवाद
विजय लिमये (9326040204)
Leave a Reply