या सृष्टीत वनस्पतीचे जीवन हे मानवापेक्षा कितीतरी आधीचे आहे. वनस्पतीनांही जीव असतो, हे सर्वश्रुतच आहे परंतु या वनस्पतींच्या जीवनातील विविधता, निसर्गाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या बुद्धिमान पद्धती आणि त्यांच्यातील विविध यंत्रणा आणि कार्य यांची अधिकारी माहिती दिली आहे.प्रा.किशोर नेने यांनी. पृ. 96 किं. 100 रू. ISBN : 978-93-80232-23-2 9 नातवंडांच्या कुतुहल मिश्रित चौकस उत्साहामुळे लिहिले गेलेले, पण त्यामुळे अनेकांच्या कुतुहलांचे समाधानात रूपांतर करणारे असे हे पुस्तक! निसर्गातील प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सामान्य गृहिणी देखील हल्ली बरीच माहिती गोळा करतात. वेळोवेळी दैनिकातूनही ती वाचायला मिळते. परंतु वनस्पतींबद्दल इतकी सखोलवर माहिती आणि तिही साध्या सरळ मराठी भाषेत आणि सचित्र, क्वचितच दिसेल. आपण झाड मेलं म्हणतो, म्हणजे ते सजीव आहे. जन्म, पोषण, वाढ, प्रजनन हे सर्व आलं. मुळात वनस्पतींमध्ये किती प्रकार आहेत? झाड, वेली हे प्रकार सर्वांना माहीत असतंच, पण मूळ, खोड,पानं नसलेल्या वनस्पतींबद्दल क्वचित लोकांनाच (विषयाचे अभ्यासक सोडून) माहिती असेत. इतर सजीवांप्रमाणे वनस्पतींनाही पाणी आवश्यक आहे. वनस्पती पाणी आणि खनिज यांचं शोषण कशा करतात? त्यातही दोन प्रकार कसे? एक क्रियाशील शोषण तर दुसरं निष्क्रिय शोषण. मग ते कशाप्रकारे होते? वायू तर हवेतून मिळतो पण खनिज क्षार मुळांद्वारे शोषले जातात. मग ते कार्य कशाप्रकारे होते, हे सविस्तर कळते. पाणी आणि खनिजांचे वनस्पतींच्या मुळांपासून पानांपर्यंत वहन म्हणजे रसारोहण. ते कसे होते? मुळापासून वरपर्यंत पाणी कसे चढते? दुपारी रात्रीपेक्षा झाडांना पाण्याची गरज जास्त असते तेव्हा रसारोहण कसे होते? झाडातही जलवाहिन्या असतात आणि त्यांचे कार्य कसे चालते, हे पण कळते. पहाटेच्या वेळी गवतावर (दव) पाण्याचे थेंब दिसतात ते पाणी कुठून येते? वातावरणातील प्रकाश, ऋतुमानानुसार उष्णता व लहान मोठा दिवस ही सर्व परिस्थिती रसारोहणास कशी कारणीभूत होते, हे सविस्तर कळून येते. झाडाद्वारे होणारं प्रकाश संश्लेषण आणि अन्नवहन ह्या प्रकरणात झाडं सूर्य प्रकाशाची मदत कशी घेतात? स्वत:च स्वत:साठी अन्नघटक आणि जीवनसत्व ह्याची निर्मिती कशी करतात, हे वाचायला मिळते. शिवाय वैशिष्ठ्यपूर्ण पोषण घेणारी झाडं कोणती? काही झाडं दुसर्या झाडांपासून, कचरा, कुजणार्या कचर्यापासून किंवा काही झाडं परपोषी म्हणजे इतर सजीवांपासून स्वत:चे पोषण कसे करतात? दुसर्या झाडांपासून पोषण मिळविणारी अमरवेल आपल्याला माहीत आहे, पण कार्य कसे होते ते येथे वाचायला मिळते. पण अशी काही फुलझाडेही आहेत हे वाचून आपण अचंबित होतो. एक मीटर व्यास असलेले रॅफ्लेशियाच्या फुलाबद्दलची माहिती आपल्या वाचनात कधीच आली नाही. जगभरातील लोक ते बघण्यासाठी इंडोनेशियात गर्दी करतात. त्याचा पोशिंदा वेगळा. ह्या फुलाच्या कळीला उमलायलाच 9 महिने लागतात. जणु मानवाचा जन्म! त्याच वर्गातील तारापुष्प. फक्त ह्या झाडाचे पोषण दुसर्या झाडाच्या मूळापासून होते. आपल्याकडे ज्वारीच्या मुळांवर तण दिसते. वेळीच त्यांना उपटून फेकावे लागते. ह्याच प्रकारचे आपल्याकडे दिसणारे झाड म्हणजे चंदन! खटकते नां? सेंद्रिय कचर्यापासून पूर्ण पोषण मिळविणारी पण फुलझाडं असतात. स्वत: अन्ननिर्मिती करीत नाहीत. मांसाहारी वनस्पती! स्वत:च्या शरीरातील कमतरता कीटकं, अळ्या, प्राण्यांपासून मिळवितात? कशी मिळवितात, तेच वाचण्यासारखे आहे. पाण्यातील कीटकांपासून पोषण करणार्या आणि पाण्यातच वाढणार्या अशाहीवनस्पती आहेत. झाडांची मानवप्राण्यांप्रमाणे श्र्वसनक्रियाही सुरू असते आणि आपल्याप्रमाणेच तीही 24 तास सुरू असते. हे सर्व मूळतून वाचणेच उत्तम! वनस्पतींची वाढ म्हणजेच उंची, जाडी, आकार वाढणं आणि विकास म्हणजे बी रूजणं, शाखा, फुलं, फळं, येण वगैरे, बी पेरणं मग, अंकूर फुटणं, मग रोपटं तयार होणं, फांद्या फुटणं, मोहोर, कळ्या, फुलं, फळं व पुन: बीज ह्या सर्व पायर्या आहेत. झाडातही अल्पायू, एकदाच फुलणारी (सिझन, तेरडा) मोसमी, दीर्घायू, एकदा लावल्यावर अनेक वर्ष फुलं देणारी असे प्रकार तसेच फळातही. ऋतुमानानुसार फुलं व फळं. प्रकाशकिरणांशी त्यांचा संबंध. त्यात कृत्रिम रीत्या प्रकाशात बदल केल्यास पडलेला फरक. प्रकाशाच्या तीव्रतेवर व कालावधीवर, उदा. मोठा दिवस, लहान दिवस असल्यास फुलं उगवण्यात पडणारा फरक. कधी कधी आपल्यालाही अनुभव येतोच की, जागा बदलल्यावर झाडं वाढतात किंवा मरतात. कधी झाडांची एकच फांदी सुकते, ती कां? झाडांच्या पेशी, ग्रंथी, मकरंद देणार्या ग्रंथी अशी अनेक प्रकारची माहिती व ज्ञान ह्या पुस्तकातून वाचायला मिळते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व माहिती सचित्र असल्यामुळे खुपच आनंद मिळतो. चित्र खुप स्पष्ट आणि प्रत्येक घटकाचे नाव खुणा व्यवस्थित असल्यामुळे संभ्रमाला जागाचं नाही. केवळ विद्यार्थीच नव्हेत तर शिक्षक, गृहस्थांसाठीही विशेषत: बाग (छोटीशी असेना कां) आवडणार्या प्रत्येक व्यक्तींसाठी हे पुस्तक आवश्यक आहे. अगदी आबाल वृद्धांसाठी देखील. बालवाडीपासूनच्या मुलांनाही त्यांच्या कुवतीनुसार ज्ञान देता येईल. सप्रयोग देता येऊ शकेल. अशा शाळेतील शिक्षकांसाठीही उपयुक्त आहेच पण काही चांगलं वाचल्याचे समाधान मिळवण्यासाठीही उत्तम आहे. अशा या पुस्तकाचे लेखक आहेत, डॉ. किशोर मुकुंद नेने आणि आवर्जून विज्ञान व माहितीपर पुस्तके प्रकाशित करणार्या नागपूरच्या नचिकेत प्रकाशनातर्फे हे उत्तम पुस्तक प्रकाशित झाले आहे. समर्पक मुखपृष्ठ आणि देखणी मांडणी यामुळे पुस्तकाच्या सौदर्यांत भर डली आहे. किंमत माफक असल्यामुळे स्वत:साठी सहज घेता येईल, शिवाय भेटवस्तु म्हणून (योग्य व्यक्तीस)े देण्यास उत्तम! सर्व शिक्षक वर्गास उत्तम असे हे पुस्तक! वनस्पतींची अद्भुत कार्यशैली : डॉ. किशोर नेने नचिकेत प्रकाशन : पाने : ९६ , किंमत : १००/- रू. 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply