कॉलेज संपवून शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा दृढ समज होता आणि त्याच आविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मूर्ख असलेल्या शेतकर्यांना स्वानुभवाने शहाणे करण्यासाठी भरघोस उत्पन्न
घ्यायचे ठरविले. दोन महिन्यांत नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पीक आलं. अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले. ५ रुपयाला पोतं कुणी घेईना. वाहतूक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकिटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणि वांगी फुकटात गेली. असे काय झाले? काहीच कळत नव्हते. प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मूर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी निष्कर्ष निघाला की मार्केटमध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले. कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल. माझी वांगी खपावी म्हणून ग्राहक पोळी, भात, भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खाऊन पोट थोडीच भरणार आहे? स्थानिक बाजारात गरज, मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणून उदरनिर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.
झाली चूक ुन्हा करायची नाही म्हणून दुसर्या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहून १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधील आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हणून माल बैलबंडीने हायवे क्रं. ७ पर्यंत नेला. रायपुर – हैदराबाद जाणार्या ट्रकला थांबवून माल भरला. तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतीने माल चढविला. ६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता. मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.
आदिलाबाद गाठले.
तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी. मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
वांगेच वांगे.
अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
जिकडे तिकडे चोहीकडे, वांगेच वांगे गडे, आनंदी आनंद गडे.
मार्केट वांग्यांनी भरलं होतं. त्या संदर्भात एका शेतकर्याला विचारले.
“यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकूल असल्याने वांगीचं भरघोस उत्पादन आलंय.” तो शेतकरी.
“भाव काय चाललाय?” माझा प्रश्ऩ.
“सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला.” तो शेतकरी.
“किलोला की मणाला?” माझा प्रश्ऩ.
“किलोला? अरे यंदा किलोला विचारतो कोण? पोत्याचा हिशेब चालतो.” तो शेतकरी.
“म्हंजे? पोतभर वांगीला ५-६ रुपये?” माझा प्रश्ऩ.
“पोतभर वांगीला नाही, पोत्यासहित पोतभर वांगीला.” तो शेतकरी.
“रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असताना पोत्यासहित पोतभर वांगीला ५-६ रुपये? “मी मलाच प्रश्न विचारीत होतो. हे कसं शक्य आहे?
“१५ रुपये किंमतीच्या रिकाम्या पोत्यात ५०-५५ किलो वांगी भरली की वांगीसहीत पोत्याची किंमत घटून ती ५ रुपये एवढी होते” हे समिकरण मला कुणी शिकवलंच नव्हतं.
विश्वासच बसेना, पण समोर वास्तव होतं.
“आता लिलाव केव्हा होईल?” माझा प्रश्ऩ.
“इथे नंबरवार काम चालतं, मी काल आलो, माझा नंबर उद्या येईल कदाचित.” तो शेतकरी.
“तोपर्यंत वांगी नाही का सडणार?” माझा प्रश्ऩ.
यावर तो काहीच बोलला नाही. मूक होता. डोळे पाणावले होते, एवढ्या मेहनतीने पिकविलेलं वांगं सडणार म्हटल्यावर त्याचा जीव कासावीस झाला होता.
आता माझ्याही मनात कालवाकालव व्हायला लागली.
आपला नंबर तीन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. डोळ्यादेखत वांगी सडताना पाहणं मानसिकदृष्ट्या पीडादायक ठरणार होतं. मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली. तीन दिवसात किमान अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तीन दिवस जेवणाचा, निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( -१५) म्हणजे वांगी विकण्यासाठी मला जवळून १५ रुपये खर्च करावे लागणार होते.
काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
आता पुढे काय?
निर्णय घेतला. एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावी अशी. ते दृश्य डोळ्यात साठवलं, एका झटक्यात वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता. आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मूर्ख शेतकर्यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभूषित शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो. तेथेच टाईमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
आजही मला दिसतात.
..ते ..वांगे..
गुलाबी-गुलाबी, तजेल आणि टवटवीत. कुणाचीही दृष्ट लागावे असे, अजूनही न सडलेले.
आणी माझ्या दृष्टिपटलावर अमर झालेले.
गंगाधर मुटे
………… **…………..**…………..**…………..**………….
— गंगाधर म. मुटे
Leave a Reply