सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तिरावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे तसेच इथल्या वैशिष्टयपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठी ही आहेत. कृष्णा नदीवरील घाट खूप प्रसिद्ध आहे.
वाई मधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांच्या रचना पेशवेकाळाची साक्ष देतात. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराचा उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभिमानाने सांगतात. घाटावर वसलेले गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे. धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर आणि पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य. या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पुजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.
मंदिराच्या प्रवेशाचा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे. मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे. शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिच्या हातात ढाल, तलवार आदी आयुध धारण केली आहेत. या लक्ष्मीला सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेचे दर्शन घडविते. देवीची पुजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये किर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत आवाज पोहचू शकतो.
गणपती घाटावरील महागणपतीचे मंदिर हे वाईतील पर्यटकांचे खास आकर्षण होय. गणपतीच्या विशाल व भव्य मूर्तीमुळे ते “ढोल्या गणपती” या नावाने अधिक परिचित आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी जवळजवळ कृष्णानदीच्या पात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणार्या पुरांपासून संरक्षण व्हावे, म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले (कापले) जाऊन पाण्याचा दाब कमी होतो व मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथर्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर व ८० सेमी. उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मुर्ती आहे. तिची स्थापना शके १६९१ वैशाख शु. १३ रोजी करण्यात आली.
मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्यामुळे याला कदाचित ढोल्या गणपती हे नामाभिधान प्राप्त झाले असावे. ती एकसंध काळ्या दगडात खोदली असून हा दगड कर्नाटकातून आणला असून प्रथम तो थोडा मऊ असावा व पुढे हळूहळू कठीण झाला असावा. सध्या मुर्तीला रंग दिलेला असल्यामुळे तिचे मूळ रूप दिसत नाही. गणपती उकिडवा दोन्ही मांड्या पसरून पाय रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीने यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायांतील तोडे स्पष्ट दिसतात. मुर्तीची मागील अर्ध चंद्राकृती प्रभावळ ३ मी. ६३ सेमी. उंचीची आहे. गणपतीच्या चारी हातांत (डावीकडून) मोदक, परशू, पळी आणि दात ही आयुधे आहेत. गणपतीच्या दोन्ही पायांदरम्यान त्याचे वाहन उंदीर प्रतीकात्मकरीत्या दर्शवले आहे. संकष्टी व विशेष समारंभाच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध त्रयोदशीला (देवाचा प्रतिष्ठापना दीन) आणि भाद्रपदात गणेश चथूर्तीपासून सात दिवस किंवा गणेश जयंती या प्रसंगी गणपतीची खास अलंकारयुक्त सजावट करतात. गणपतीची भव्य मूर्तीत सात्त्विकतेबरोबर प्रसन्न मुद्रा दिसते.
गर्भगृहाचे छत तत्कालीन स्थापत्यशैलीची जणू एक किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून ते वास्तुशास्त्रज्ञांनी वसाहतकालीन मंगलोरी कौलांच्या बंगल्यातील छताप्रमाणे तंबूसदृश वर निमुळते केले आहे. अशा प्रकारची छते (विताने) प्रमुख द्वारावरील जो पाचरीसारखा दगड बसवितात त्या केवळ की-स्टोनच्या (कळीचा दगड) साह्याने तग धरून असतात. ही छते तासलेल्या पाषाणाला खाचापाडून खोबणीत दुसर्या दगडाचे कुसू अडकवून तयार करीत आणि त्यांना घोटलेल्या चुन्याचे सांधीत.
महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरामध्ये सर्वांत उंच असून त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची सुमारे २४ मीटर आहे.
।। ॐ गं गणपतयेनम : ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply