नवीन लेखन...

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रण देखील असू शकतं. हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.
पित्त प्रकृती
‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.
काय टाळावं-
यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.
वात प्रकृती
‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.
कफ प्रकृती
‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.
कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.
काय टाळावं-
पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- वैद्य राहुल सराफ

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..