कलेचे आदिवासी जमातीशी असलेले घनिष्ट नाते वारली चित्रकलेतून दिसून येते. या समाजाने परंपरेने लाभलेली ही कला जतन केली आहे. या कलेच्या माध्यमातून आदिवासी युवकांना रोजगाराची संधी ही उपलब्ध झालेली आहे. ठाणे जिल्ह्यातील विक्रमगडच्या सुनिल सोमा खरपडे या युवकांने श्री गणेश बचत गट स्थापन करुन ६ सुशिक्षित व ४ अशिक्षीत युवकांना या वारली चित्रकलेच्या व्यवसायातून रोजगार मिळवून दिला आहे.
वारली लोक आपली झोपडी झाडाच्या फांद्याच्या कुडापासून बनवितात, त्यावर शेण व मातीचे मिश्रणाच्या सहाय्याने सारवतात सण, उत्सव लग्नसमारंभ प्रसंगी मातीचा रंग तसेच पिठाचा वापर करुन भिंतीवर, ओटयावर, झोपडीच्या कुडावर, जोत्यावर अंगणात वारली चित्र काढतात. या चित्रातून या समाजाचे राहणीमान, जीवनशैली, संस्कृती, व्यवसाय आदिंचे दर्शन घडवित असतात.परंतू ही वारली चित्रकला एवढया पुरती मर्यादीत राहिली नाही तर विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून त्यावर वारली चित्र काढणे हा व्यवसाय स्वरुपात उदयास येवू लागला आहे.
सुनिल सोमा खरपडे यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले असले तरी अंगी असणा-या या कलेचा वापर करुन स्वत: बरोबर इतरांनाही रोजगाराची संधी मिळावी या हेतूने श्री गणेश बचत गट स्थापन केला. ६ सुशिक्षीत व ४ अशिक्षीत अशा १० युवकांना एकत्र केले. २३ हजाराच्या भांडवलावर व्यवसाय सुरु केला. लाकडापासून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण या युवकांना दिले. भिंती, कापड यावर होणारी ही कला विविध लाकडी वस्तूंवर रेखाटली जावू लागली. दिवसेंदिवस मागणी ही वाढू लागली तसा व्यवसाय ही वाढू लागला.
आदिवासी वाडया पाडयातील अनेक युवक नोकरीसाठी फिरत असतात. त्यांना या कलेचे प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. त्यातून विविध लाकडी कलाकुसर व
उपयोगी वस्तूंवर वारली चित्र काढण्याचा व्यवसाय केला जावू लागला. त्यातूनच या बचतगटास लाख
सव्वालाख रुपये उत्पन्न मिळू लागले. परंतू या वारली चित्रकला असणार्या वस्तूंची वाढती मागणी लक्षात घेता हा व्यवसाय वाढविण्यासाठी आर्थिक मदत व विक्रीसाठी बाजारपेठेची गरज होती. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्फत बचत गट स्थापन करुन मदतीचा हात घेतला. शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी भरणार्या बचत गटाच्या प्रदर्शनात सहभाग घेता येवू लागला. आर्थिक पाठबळ मिळू लागले. पण त्यापेक्षा ग्राहकांपर्यंत जाण्याची संधी मिळाली. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्रातही या वस्तू ठेवल्या जातात. तर विक्रमगड येथील दिवेकर रिसॉर्ट येथे वर्षभर या वस्तूचा स्टॉल लावला जातो. अशा विविध माध्यमातून या बचतगटास दरमहा २५ ते ३० हजार रुपयाच्या वस्तूंची विक्री होण्यास मदत झालेली आहे.
या बचत गटाचे अध्यक्ष सुनिल खरपडे यांनी आपल्या अंगी असणारी कला स्वत:पुरतीच सिमित ठेवली नाही तर इतरांनांही शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासी भागातील खेडोपाडयात सुशिक्षीत व अशिक्षीत मुले नोकरी व्यवसाय नसल्याने भटकत रहातात. त्यांना रोजगाराचे एखादे साधन उपलब्ध व्हावे, त्यांच्या अंगी असणा-या कला गुणांना वाव मिळावा. या हेतूने हा बचत गट कार्य करीत आहे. त्यांनी वारली चित्रकलेच्या व्यवसायातून स्वत:बरोबर इतरांनाही रोजगार मिळवून दिला आहे.
Mahanews
— बातमीदार
Leave a Reply