वाराणसी आपल्या हिटलिस्टवर असल्याचे अतिरेक्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. ताजा बॉम्बस्फोट हा या शहरातील स्फोटाचा हा चौथा प्रयत्न ठरला. तरिही येथे येणार्या लाखो भाविकांच्या किवा शहरवासियांच्या सुरक्षेचे प्रयत्न होत नाहीत. घाटालगतच्या अरुंद गल्ल्या पाहिल्यावर अशा दुर्घटनेनंतर चेंगराचेंगरीत गंभीर जखमी होणार्यांची संख्या का वाढते हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आता तरी सुरक्षा यंत्रणा सक्रिय होणार का ?वाराणसीतील स्फोटाच्या घटनेचा तपास आता सुरू झाला आहे. यथावकाश त्यातील सत्य बाहेर येईल. पण ही घटना आणि त्यासाठी अतिरेकी शक्तींनी निवडलेले ठिकाण या संदर्भात बारकाईने विचार करायला हवा. वास्तविक पाहता, वाराणसी शहर आपल्या हिटलिस्टवर असल्याचे अतिरेकी शक्तींनी यापूर्वीच लक्षात आणून दिले होते. केवळ संकटमोचन मंदिरातील बॉम्बस्फोट नव्हे तर शहरातील अन्य ठिकाणीही बॉम्बस्फोटाचा प्रयत्न झाला. पण त्यातून सुरक्षा यंत्रणांनी अपेक्षित धडा घेतला नाही असेच आम्हा वाराणसीकरांना वाटत आहे. वाराणसी शहराला पौराणिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गंगा नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहताना या शहराजवळून जाते. तिचे रुप येथे चंद्राकार आहे. नदीच्या एका बाजूला विस्तीर्ण घाट तर दुसर्या बाजूला वाळवंट आहे. येथे गंगा नदीलगत 100 ते 150 घाट आहेत. ते विविध संस्थानिकांनी बांधले असून प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य राहिले आहे. बिहारचे महाराज दरभंगा यांनी बांधलेला दरभंगा घाट, नागपूरच्या भोसल्यांनी बांधलेला भोसला घाट अशी घाटांची वेगवेगळी नावे आहेत. दशाश्वमेध घाट हा त्यापैकीच एक.याच घाटावर दश अश्वमेध यज्ञ झाला त्यामुळे त्याला दशाश्वमेध घाट असे म्हणतात. या घाटावर प्रसिध्द असे शीतला माता मंदिर आहे. मुलांना कांजिण्या आल्यास शीतला मातेचे चरणामृत दिल्यास त
शांत होतात अशी अनेकांची श्रध्दा आहे. नुकत्याच बॉम्बस्फोट झालेल्या घाटापासून काही अंतरावर हे मंदिर आहे. हा बॉम्बस्फोट नेमक्या सायंकाळच्या गंगेच्या आरतीच्या वेळी झाला. दररोज सायंकाळी
6.३० ते 7.20 पर्यंत म्हणजे तासभर होणार्या या आरतीसाठी भाविक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. वास्तविक गंगेच्या आरतीची पध्दत पूर्वापार चालत आलेली नाही. आमच्या लहानपणी अशी आरती नव्हती. पण आठ-दहा वर्षांपूर्वी काही संस्थांनी आणि जगद्गुरू शंकराचार्यांच्या पुढाकारातून ही आरतीची प्रथा सुरू झाली. दशाश्वमेध घाटाला लागून राजेंद्रप्रसाद घाट आहे. तिथेही गंगेची आरती भव्य प्रमाणात होत असते.वाराणसीत येणारा प्रत्येकजण सायंकाळच्या गंगेच्या आरतीला आवर्जून उपस्थित असतो. येथील विविध घाटांलगतचे गंगेचे पात्र अतिशय शांत आणि संथ आहे. प्रथम गंगेची पूजा होते. आपणही पूजा करावी अशी काहींची इच्छा असल्यास त्यानुसार त्यांच्याकडूनही गंगेच्या पात्रात उतरून पूजा केली जाते. नंतर सर्वजण घाटावर येतात. त्यानंतर आरतीस सुरूवात होते. यावेळी घाटावर सर्वत्र विद्युत रोषणाई केलेली असते. शिवाय असंख्य दिव्यांनी परिसर उजळून जातो. नदीच्या पात्रातही दिवे सोडले जातात. संथ पात्रातून लुकलुकत जाणारे ते दिवे, त्यांची प्रवाहातील प्रतिमा आणि सर्वत्र आरतीचा जल्लोष हे दृश्य केवळ डोळ्यात साठवून ठेवावे असेच असते. काही उत्साही भाविक गंगेच्या पात्रात नावेत बसून हे विहंगम दृश्य पाहत असतात. केवळ भाविक किंवा पर्यटकच नव्हे तर या शहरात राहणार्यांकडे कोणी पाहुणे आले तरी त्यांना आवर्जून आरतीसाठी गंगाकाठी नेले जाते.या सार्या वर्णनावरुन आरतीच्या वेळचा माहोल लक्षात येईल. नेमकी हीच संधी साधून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या स्फोटात एक मुलगी मरण पावली असून काहीजण जखमी झाल्याची माहिती प्
सिध्द करण्यात आली. पण एकूण परिस्थिती आणि या परिसराची रचना लक्षात घेता जखमींची संख्या अधिक असणार किंवा वाढणार हे निश्चित. याचे कारण या घाटावर यायला आणि परत जायला एकच रस्ता आहे. बॉम्बस्फोट झाल्यावर भेदरलेले हजारो लोक याच रस्त्याने पळत सुटले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. अशा वेळी जखमी होणार्यांची संख्या मोठी असते हे लक्षात घ्यायला हवे. मागे राजेंद्रप्रसाद घाटावरही असाच बॉम्बस्फोट झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे तो बॉम्बचा नव्हे तर सिलेंडरचा स्फोट आहे असे सांगण्यात आले. नंतर नेमके तथ्य बाहेर आल्यावर तो बॉम्बस्फोटच होता तसेच त्यात आरडीएक्सचा वापर करण्यात आला हे मान्य करण्यात आले. म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणा किती बेफिकीर आहे हेच यावरुन दिसून येते. अशी एखादी घटना घडल्यावर सुरक्षेचे जुजबी उपाय केले जातात. काही दिवसानंतर परिस्थिती पहिल्यासारखी दिसते. राजेंद्रप्रसाद घाटावरील बॉम्बस्फोटानंतर तिथे प्रवेश करणार्यांसाठी मेटल डिटेक्टर बसवण्यात आले तसेच पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले. पण आज या दोन्ही बाबी दिसून येत नाहीत. एवढेच नव्हे तर दशाश्वमेघ घाटावरील मेटल डिटेक्टर बंद आहे आणि कधी सुरू असलाच तर त्याचा वापर करणार्यांची संख्या कमी आहे. ही व्यवस्था टाळून लोक मोठ्या संख्येने घाटावर एकत्र येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी पोलिस यंत्रणाही येथे उपलब्ध नाही. अशी परिस्थिती अतिरेकी कारवायांसाठी पोषक ठरत असल्यास नवल वाटायला नको.वाराणसी हे पुरातन शहर आहे. साहजिकच येथील इमारतींची रचना जुन्या पध्दतीची आहे. त्यामुळे येथील रस्ते छोटे आणि अरुंद आहेत. दाट लोकवस्ती आणि इमारतींमुळे रस्ते मठे करणेही शक्य नाही अशी अवस्था आहे. येथे येणारे हजारो भाविक, पर्यटक अशा अरुंद गल्ल्यांमध्ये वावरत असतात.
यामुळे किती गर्दी होत असेल याची कल्पना येते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणूनही वाराणसीचे महात्म्य आहे. शिवाय येथे पाच विद्यापीठे आहेत. त्यामुळे येथे शिक्षणासाठी येणार्यांची संख्याही मोठी आहे. श्रावण महिन्यात तर येथे पाय ठेवायलाही जागा नसते. असंख्य भाविक कावडी घेऊन येतात. ‘बम भोले’ चा जयघोष आसमंतात घुमत असतो. संक्रांतीच्या वेळीही भाविकांची प्रचंड गर्दी असते. नेमकी आकडेवारी सांगायची तर या कालावधीत दीड ते दोन लाख लोक या शहरात असतात. म्हणजे जवळपास
दुप्पट लोकसंख्या शहरात सामावलेली असते.तसा विचार करायचा तर वाराणसीतील बॉम्बस्फोटाचा हा चौथा प्रयत्न म्हणायला हवा. चार वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्यानंतर संकटमोचन मंदिरात बॉम्बस्फोट झाला. नंतर विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एका कुकरमध्ये बॉम्ब सापडला. पण स्फोट होण्यापूर्वीच तो निकामी करण्यात यश आल्याने हानी टाळता आली. त्यानंतर आता ही घटना घडली आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा गलथानपणाच यासाठी कारणीभूत आहे असे म्हणता येईल.(अद्वैत फीचर्स)
— आबासाहेब काळे, वाराणसी
Leave a Reply