नवीन लेखन...

विचक्षण कलावंत – मुकुल शिवपुत्र

मुकुंद संगोराम यांनी मुकुल शिवपुत्र यांच्या वर लिहिलेला लेख


पं. मुकुल शिवपुत्र भानुमत्येय यांना निसर्गापासून ते नवतंत्रज्ञानापर्यंत आणि राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेकविध गोष्टींबद्दल कुतूहल आहे. ते आपल्या कलेतून व्यक्त करण्यासाठी ते विविधांगांनी त्या विषयांना भिडण्याचा प्रयत्न करतात. निसर्ग आणि संगीताचा संबंध तर जन्मदत्त. त्याची उकल करता करता परंपरेने आलेले ज्ञान पुन्हा एकदा तपासून पाहण्याची कुमारजींची ऊर्मी मुकुलजींकडेही आहे. त्यामुळे अभ्यासाकडेही सर्जनात्मकतेने पाहण्याची त्यांची दृष्टी अनेकदा अचंबित करते. संगीत ही स्थिर नसलेली, तरीही संथगतीने स्वत:मध्ये बदल घडवून घेणारी कला आहे. तिच्यावर परिसरातील अनेक गोष्टींची दडपणे येत असतात आणि त्यांना काही वेळा परतवूनही लावावे लागते. काही वेळा ही दडपणे सामावून घेऊन कलेचे क्षितीज विस्तारण्याची क्षमताही निर्माण करावी लागते. निसर्ग आणि मानवी जीवनातील कल्लोळांचे प्रतिबिंब संगीतात अतिशय अमूर्तपणे प्रकट होत असते. आणि त्याला पहिल्यांदा सामोरा जातो तो कलावंत. सर्जनाच्या सर्व शक्यतांसह तो या सगळ्या गोष्टींना भिडतो. प्रत्यक्ष कला सादर करताना, आणि उर्वरित वेळेतील तो किंवा ती वेगवेगळे असतात. सादरीकरणात सर्जनाशिवाय काहीच नसते. बाकीची सारी पुटे सहजपणे गळून पडलेली असतात आणि त्यांचा मागमूसही दिसत नसतो. तरीही रोजच्या जगण्याशी झुंजणारी व्यक्ती कलावंत म्हणूनही जिवंत असतेच. भारतीय अभिजात संगीताच्या दीर्घ परंपरेत असे अनेक कलावंत सतत या साऱ्या घटनांकडे आणि घडामोडींकडे अतिशय डोळसपणे पाहत आले आणि त्यांना त्यातून आपली कला कलाकलाने बदलत नेता आली. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असे प्रतिभावान कलावंत निर्माण झाले, म्हणूनच तर ही कला आजही नवे काही शोधण्याच्या धडपडीत उभी राहू शकते. प्रबंध- गायकीपासून ते आज प्रचलित असलेल्या ख्याल- गायकीपर्यंत हजारो कलावंतांनी आपल्या समिधा या सर्जनाच्या कुंडात अर्पण केल्या. आपण काही वेगळे करतो आहोत आणि त्याला भूत, वर्तमान व भविष्याचा संदर्भ आहे, असा कोणताही हट्ट न बाळगता ते आपली कला सतत काळाच्या पाटीवर घासून पाहत राहिले. त्यामुळेच तर संगीत प्रवाही राहिले आणि त्यातील नव्याचा शोध घेण्याची ऊर्मीही टिकून राहिली.

कलावंतांचे प्रकार दोन. एक म्हणजे कला जिवंत ठेवणारे. आपल्या वकुबानुसार परंपरेने जे मिळाले, ते जसेच्या तसे टिकवून ठेवण्यासाठी सारे आयुष्य अर्पण करणारे कलावंत कमी प्रतीचे मुळीच नसतात. ते परंपरा राखण्याचे फार मोठे कार्य करीत असतात. ते आवश्यकही असते. परंपरेने आलेले सारे काही आपल्या गुरुजनांकडून मिळत असताना प्रत्येकाची म्हणून एक क्षमता असते. गुरूकडून सगळे जसेच्या तसे मिळाले तरीही ते समजून घेणे, त्याची जोपासना करणे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुणांच्या आधारे ते टिकवून ठेवणे, हे काम झाले नसते तर कलेची अवस्था किती बिकट झाली असती! अशा कलावंतांमुळे ती जिवंत राहण्याचे आणि काही प्रमाणात पुढील पिढीत संक्रमित होण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू राहिले. दुसऱ्या प्रकारातील कलावंत हे केवळ सर्जनाची जोपासना करणारे आणि संगीतात आपल्या बौद्धिक क्षमतेने मोलाची भर घालणारे. तेही परंपरेनेच निर्माण झालेले असतात. त्यांनाही गुरूचा वरदहस्त लाभलेला असतो. त्यांचे वेगळेपण असे की, ते मिळालेल्या ज्ञानावर स्वत:च्या प्रतिभेचे पांघरूण घालून ते अधिक चमकदार करतात. असे करताना ते संगीताला काही पावले पुढे नेत असतात. त्यातील शैथिल्य दूर करत त्याला अधिक वेगाने प्रवाहित करत असतात. त्यासाठी त्यांच्यापाशी कमालीच्या वरच्या दर्जाची बौद्धिक क्षमता असते, काळापुढचे पाहण्याची दृष्टी असते आणि परिसरातील सर्वच घटनांचे त्यांना आकलन असते. जन्मल्यापासून जे काही अनुभवाला आले, त्यातून नवे काही शिकण्याची ही ऊर्मी त्या कलावंताला आधीच्या कलावंतांच्या खांद्यावर बसून अधिक दूरचे पाहण्याची शक्ती प्रदान करत असते. दूरचे पाहण्यासाठी जशी दीर्घ दृष्टी आवश्यक, तशीच नवसर्जनाची प्रतिभाही! मानवी जीवनाला आपल्या संशोधनाने नवी झळाळी प्राप्त करून देणाऱ्या महान संशोधकांकडे जी प्रतिभा असते, त्याहून हे दुसऱ्या प्रकारातील कलावंत तसूभरही कमी नसतात. न्यूटन, आर्किमिडीज यांच्यासारखे शास्त्रज्ञ आणि असे थोर कलावंत यांची बरोबरी करणे त्यामुळे अजिबातच गैर ठरणार नाही. घराण्याची शिस्त, गुरुकृपेने मिळालेले संस्कार आणि स्वकर्तृत्व यांचा संगम घडवीत एखादा कलावंत जेव्हा काळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या अशा प्रयत्नांना जेव्हा रसिकांची भरभरून दाद मिळते, तेव्हा संगीत खऱ्या अर्थाने काही अंतर पुढे गेलेले असते. त्यासाठी परंपरेत नवता ओतण्याचे सामथ्र्य लागते. त्याचा योग्य तो वापर करण्याचे कौशल्य लागते. ती नवता केवळ चूष असता कामा नये असा आग्रह असावा लागतो. रसिकांना सतत काहीतरी नवे द्यायला हवे, या हट्टाग्रहापायी जे नवनिर्माण होते ते काळाच्या कसोटीवर टिकून राहणे फार अवघड असते. संगीताचा गाभा न बदलता त्यात निर्मितीच्या शक्यता पडताळून पाहण्याची दृष्टी जेव्हा कलावंताकडे असते, तेव्हाच ती निर्मिती दीर्घकाळ टिकून राहणारी असते. भारतीय संगीतात घराणे या संकल्पनेच्या जनकांनी जे कार्य केले, ते या स्वरूपाचे म्हटले पाहिजे. घराणे म्हणजे केवळ एक नाव नसते. ती एका नव्या परंपरेची सुरुवात असते. आधीच्या परंपरेतूनच उगम पावलेली, आणि तरीही त्यापासून विलग होणारी ही नवीन परंपरा निर्माण करणे जेवढे अवघड, तेवढेच त्याचे टिकून राहणेही. प्रत्येक कलावंत काही नवे घराणे निर्माण करत नसतो. पहिल्या गटातील कलावंत आहे ते जपण्याचा प्रयत्न करत असतात, तर दुसऱ्या गटातील कलावंत आपल्या कर्तृत्वाने घराण्याच्या निर्मितीला हातभार लावत असतात. घराणे म्हणजे शैली. त्यामध्ये मांडणीचा जेवढा विचार असतो, तेवढाच संगीतातून व्यक्त होणाऱ्या नवनव्या कल्पनांचाही. स्वरांचा लगाव, त्यांची मांडणी, त्यातून समोर येणारे विविधरंगी आकृतिबंध आणि या सगळ्यातून व्यक्त होणाऱ्या संगीतातून काही नवे सांगण्याचा प्रयत्न.. हे सारे घराण्याच्या संकल्पनेत गृहीत असते. ‘आता नवे घराणे स्थापन करू या’ असे म्हणून ते तयार होत नसते, की सहज किंवा चुकूनही ते स्थापन होत नसते. सर्जनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची आणि त्यातील सौंदर्यतत्त्वांची नव्याने मांडणी करण्याची ताकद अतिशय मोजक्या कलावंतांच्या ठायी असते. या सौंदर्यविचारात सातत्य असते आणि त्याचा एक सहजसुलभ असा केंद्रबिंदूही असतो. पुढीलांसाठी हा केंद्रबिंदू सर्वात महत्त्वाचा. त्यातून त्यांना पुढे जाण्याचे इशारे मिळत असतात.

मुकुल शिवपुत्र भानुमत्येय या कलावंताच्या ठायी हे सारे गुण स्पष्टपणे दिसून येतात. काळाच्या पुढची पावले ओळखणाऱ्या आणि सर्जनाची अचाट ताकद असलेल्या या कलावंताला आजवरच्या आयुष्यात संगीताच्या दरबारात जे काही निर्माण करता आले, त्याची ओळख त्यांच्या कलेला सामोरे गेलेल्यांना निश्चितच असेल. भारतीय अभिजात संगीताचा व्यापक पट उलगडून दाखवत असताना आधुनिकतेचा जो स्पर्श त्यांच्या कलेतून दृग्गोचर होतो, त्यामुळे त्यांच्या कलेची उंची आणखीनच वाढते. उत्तर हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत या दोन समांतर जाणाऱ्या आणि तरीही परस्परपूरक असणाऱ्या संगीताच्या प्रवाहांना कवेत घेण्याची मुकुलजींची क्षमता अचंबित करणारी आहे. त्याबरोबरीनेच देशाच्या अन्य प्रांतांतील संगीत परंपरांना मुख्य प्रवाहापर्यंत आणताना त्यावर अभिजाततेचे संस्कार करण्याची त्यांची हातोटी लाजवाब अशीच आहे. ख्याल संगीतात रममाण होत असतानाच संगीताचा समग्र अभ्यास करत त्यातील लोकसंगीताचा वाटा ओळखणाऱ्या आपल्या गुरूंच्या- म्हणजे पंडित कुमार गंधर्व यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुकुलजींनी आपला संगीतप्रवास सुरू केला. त्यांच्यातील सर्जनशीलतेने आणि प्रतिभेने त्यांना अनेकदा आपल्या गुरूच्याही पुढे जाण्याचे बळ दिले. याचे कारण ते ज्या काळात आपले संगीत करीत आहेत, त्या काळातील सगळ्या संमिश्र आणि व्यामिश्र (कॉम्प्लेक्स) अडीअडचणींचे त्यांना पुरेपूर भान आहे. हे भान ते संगीतातून व्यक्त करू शकतात आणि तेथेच त्यांचे संगीत वेगळ्या वाटेने जायला सुरुवात करते. स्वर तेच, राग तेच, तालही तेच; पण सांगायचे मात्र तेच ते नाही- असे त्यांचे संगीत आहे. केवळ प्रयोगापुरते त्यांचे संगीत सीमित नाही, तर समग्र रसिकांना संगीताचा अपूर्व अनुभव देण्याची क्षमता त्यात सामावलेली आहे.

एका देदीप्यमान अशा परंपरेचे पाईक होत असतानाच मुकुलजींना कुमारजींच्या प्रयोगांचे महत्त्व समजत होते. केवळ गंमत म्हणून, किंवा काहीतरी नवे म्हणून ‘ऋतुराज महफिल’ सादर होत नसते. केवळ बालगंधर्वाची नक्कल करण्यासाठी ‘मला उमजलेले बालगंधर्व’ निर्माण होत नसते. वर्षांऋतूचे स्मरण करण्यासाठी ‘गीतवर्षां’ हा कार्यक्रम तयार होत नसतो. त्यामागे एक सुस्पष्ट असा सांगीतिक विचार असतो. त्या विचारांना परंपरेची एक भक्कम बैठक असते. परंपरेचा अभ्यास करताना प्रत्येक गोष्ट निर्मितीच्या पातळीवर तपासून पाहण्याची संशोधक वृत्ती असते. मुकुलजींकडे असलेल्या या दृष्टीचे मूळ कुमारजींच्या वैचारिक योगदानात आहे. पण जे मिळाले तेवढय़ावर मुकुलजी समाधानी राहिले नाहीत. कारण त्यांची प्रतिभा त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी खुणावत होती. परंपरेत नवता मिसळण्यासाठी अधिक जग पाहण्याची ऊर्मी त्यातूनच आली. विरक्तीच्या बरोबरीने आलेली अनुरक्ती आणि त्याला मिळालेली डोळसपणाची संगत यामुळे सारा भारतवर्ष आरस्पानी पाहताना या कलावंताला अनुभवांची श्रीमंती अनुभवता आली. त्यातील खाचाखोचा, बारकावे, संगीताच्या विविध परंपरा, जगण्याच्या अनेक शैली, विचार करण्याच्या वेगवेगळ्या रीती या साऱ्यांचे आकलन करण्याची जिद्द त्यांच्या ठायी होतीच. आणि एवढय़ावरच हे सारे थांबणे शक्य नव्हते, कारण या सगळ्या विचारांचा त्यांना आपल्या संगीतात उपयोग करायचा होता. ते संगीताच्या अमूर्त चौकटीत मांडायचे होते. विचार नवा असून उपयोग नसतो, त्याला सर्जनाची साथ लागते. मुकुलजींनी नेमके हेच केले. संगीतातील आधुनिकतेच्या पुढे जाण्यासाठी त्यांनी विचार आणि सर्जन एकत्रितपणे उपयोगात आणले.

बदलत्या जीवनशैलीचा, नवनव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्याने प्रस्थापित होत असलेल्या निष्ठांचा कलांशी फार जवळचा संबंध असतो. वास्तुकलेपासून ते नाटय़कलेपर्यंत हा संबंध अधिक सुस्पष्टपणे दाखवता येतो. संगीतासारख्या अमूर्त कलेत हे सारे मांडणे फार अवघड असते. अतिशय तरल असलेल्या संवेदना अभिजाततेच्या कसोटीवर पारखून घेण्याची क्षमता कलावंताकडे असेल तरच हे शक्य होऊ शकते. मुकुलजींकडे या क्षमता निश्चितपणे आहेत. ते अतिशय संवेदनशीलतेने आजूबाजूचे जग न्याहाळत असतात, त्यातील बदल टिपत असतात. मनाच्या आतल्या गाभाऱ्यात साठवलेली ही निरीक्षणे कलात्मकतेच्या पातळीवर तपासून घेण्याची त्यांची स्वत:ची खास अशी शैली आहे. हे सगळे बदल संगीतासारख्या कलेतून व्यक्त करण्यासाठी आवश्यक असणारी तरलता आणि बुद्धिचातुर्य कुमारजींकडे होते. त्यांना जगातल्या सगळ्याच गोष्टींचे अपार कौतुक आणि कुतूहल असे. मग ती अजिंठा-वेरुळची लेणी असोत, की माळव्याच्या लोकधुना असोत. निसर्गाचे चक्र इतक्या सर्जनशीलपणे पाहणारा कुमारजींसारखा कलावंत विरळा. त्यांच्या ‘ऋतुरंग’ मैफलीपासून ते ‘गीत वसंत’, ‘वर्षांगीत’, ‘गीत हेमंत’ यांसारख्या अनेक कार्यक्रमांतून त्यांचे निसर्गप्रेम ओतप्रोत व्यक्त होत असे. कुमारजी या सगळ्या गोष्टींकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहत असत. त्याचा असर त्यांच्या कलेतून आविष्कृत होई. सामान्य माणूस परिसरातील बदलांकडे जसा पाहतो, त्यापेक्षा कलावंताची नजर वेगळी असते. मुकुलजींकडे ती आहे. ते सर्जनाचा विचार त्याच पद्धतीने करतात. त्यामुळे नवआधुनिकतेचे आव्हान पेलण्याची त्यांची क्षमता अचाट म्हणावी अशीच. ही क्षमता सौंदर्याने प्रेरित होऊन जेव्हा अधिक उठावदारपणे कलेतून व्यक्त होते, तेव्हा हे सारे नवेच नवे असल्याचा साक्षात्कार आस्वादकाला होतो. मुकुलजींना निसर्गापासून ते नवतंत्रज्ञानापर्यंत आणि राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेकविध गोष्टींबद्दल कुतूहल आहे. ते आपल्या कलेतून व्यक्त करण्यासाठी ते विविधांगांनी त्या विषयांना भिडण्याचा प्रयत्न करतात. निसर्ग आणि संगीताचा संबंध तर जन्मदत्त. त्याची उकल करता करता परंपरेने आलेले ज्ञान पुन्हा एकदा तपासून पाहण्याची कुमारजींची ऊर्मी मुकुलजींकडेही आहे. त्यामुळे अभ्यासाकडेही सर्जनात्मकतेने पाहण्याची त्यांची दृष्टी अनेकदा अचंबित करते.
कलेच्या क्षेत्रात काळाबरोबर राहणे हीसुद्धा अतिशय अवघड वाटावी अशी, परंतु अपरिहार्य घडणारी गोष्ट असते. गेल्या काही दशकांत जगण्यातील गुंतागुंत अनेक कारणांनी वाढत असताना आणि चहूबाजूंनी जगण्याच्या सगळ्याच क्षेत्रांत आक्रमणे होत असताना, आपले ध्यान जराही ढळू न देता, त्यांच्याकडे तटस्थपणे आणि कलात्मक नजरेने पाहणे, हे उंचीच्या कलावंताचे लक्षण. स्थितप्रज्ञतेच्या बरोबरीनेच सौंदर्याच्या रसरशीतपणाकडेही पाहता येणे, ही अशा कलावंताची खूण. मुकुलजींमध्ये या खाणाखुणा दिसतात. म्हणूनच भारतीय अभिजात संगीतातील आजच्या अडचणीच्या काळात त्यांचा संगीतविचार अधिक महत्त्वाचा आणि त्यांची कलाही तेवढीच महत्त्वाची आहे. अभिजाततेचा परिसस्पर्श लाभलेल्या या कलावंताच्या कलाबाहय़ गोष्टींबद्दल होणाऱ्या चर्चापेक्षा संगीत हीच त्यांची ओळख बनून राहणे म्हणूनच आवश्यक.

मुकुंद संगोराम
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..