दसर्याच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात. आशा, आनंद आणि उत्सुकता यांचा संगम हे दसर्याचं वैशिष्ट्य. दसर्याच्या मुहुर्तावर पांडव, प्रभू श्रीराम, मराठे-पेशवेशाहीने विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळेच या सणाला विजयोत्सव म्हटलं जातं. नातेबंधांमध्ये जल्लोष निर्माण करणार्या या सणाविषयी…
Advt1Left
नवरात्रीचे नऊ दिवस जागर करून झाल्यानंतर विजयादशमीचा विजयोत्सव अर्थात दसरा साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये हा सण भलताच उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्ताने विविध परंपरांना उजळणी मिळत आहे. मांगल्याचे प्रतिक असणारा हा सण जितक्या जोशात साजरा होतो तितकाच जोश हा सण साजरा करण्यामागील संकल्पनांमध्ये आढळतो. या सणाला शेकडो-हजारो वर्षांची परंपरा आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक महत्त्वाचा मुहुर्त. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या मुहुर्तावर करण्याची पद्धत आहे. कोणत्याही नव्या कामाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी दसरा हा उत्तम दिवस मानला जातो. त्यामुळे संपूर्ण देशात या दिवसाचं आगळं महत्त्व आहे. देशभर हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्यामागे अनेक पौराणिक, ऐतिहासिक कथा आहेत. देशभर हा सण महत्त्वाचा आहेच. पण, महाराष्ट्राच्या दृष्टीने त्याचं आणखी वेगळं महत्त्व आहे.
दसर्याची काही ठोस वैशिष्ट्ये सांगितली जातात. सीमोल्लंघन हे त्यापैकीच एक. दसर्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. आपल्याकडे आपट्याची पानं वाटून प्रतिकात्मक सीमोल्लंघन केलं जातं. तथापि, मराठ्यांच्या राज्यात प्रतिकात्मकच नव्हे तर प्रत्यक्ष सीमोल्लंघन केलं जात असे. दसर्याच्या मुहुर्तावर वेगवेगळ्या मोहीमा आखल्या जात. मराठ्यांचे शिलेदार राज्याच्या सीमा ओलांडून पराक्रम गाजवण्यासाठी बाहेर पडत. अन्य प्रदेशात जाऊन नियंत्रण मिळवत. दसर्याच्या मुहुर्तावर असं सीमोल्लंघन करून मराठे शिलेदारांनी मोठा पराक्रम गाजवला. देशाच्या चारही सीमा ओलांडून तेथील भागावर प्रभुत्त्व मिळवलं. काही वेळा हे नियंत्रण प्रत्यक्ष तर काही वेळा अप्रत्यक्ष होतं.
केवळ
सांकेतिक सीमोल्लंघन न करता मराठ्यांनी प्रत्यक्ष सीमा ओलांडल्या. महाराष्ट्रातील शूर शिलेदारांनी अनेक ठिकाणाहून दसर्याच्या मुहुर्तावर प्रत्यक्ष सोनं लुटून आणलं. अशा प्रकारे सीमोल्लंघन करून मराठ्यांनी देशातील तीन चतुर्थांशपेक्षा जास्त भूप्रदेशावर नियंत्रण मिळवलं होतं.
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. दसराही त्याला अपवाद नाही. या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे संस्कार त्यातून घडतात. समाज ही एक मोठी शक्ती आहे. एकट्या व्यक्तीपेक्षा समुहाची ताकद फार मोठी आहे, हे सण-उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनावर ठसतं. ‘पवित्र सुदिन उत्तम दसरा’ असा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. देशभर वेगवेगळ्या ठिकाणी दसरा साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. म्हैसूरचा दसरा तेथील मिरवणुकीमुळे प्रसिध्द आहे. आजही तेथे शाही पध्दतीने दसरा साजरा केला जातो. पूर्वी राजे-महाराजे दसर्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी बाहेर पडत. प्रजेला सोनं वाटत असत. या निमित्ताने राजा आणि सर्वसामान्य प्रजा यांची भेट होत असे. राजाला प्रतिकात्मक सोनं देण्यासाठी प्रजेची अलोट गर्दी उसळत असे. आजही अनेक ठिकाणी शाही पध्दतीने दसरा साजरा केला जातो.
दसर्याच्या आधी नऊ दिवस, नऊ रात्री जागवल्या जातात. ही देवीची म्हणजे शक्तीची पूजा असते. विश्वातील वाईट गोष्टींचा नाश करून देवी चांगल्या गोष्टींचं रक्षण करते, अशी श्रद्धा आहे. अप्रतिम सौंदर्य, सामर्थ्य आणि स्वातंत्र्य यांचं प्रतिक म्हणजे दुर्गादेवी असं मानलं जातं. ती एक स्वयंभू शक्ती आहे. देशभर तिची पूजा होते. भारताच्या पूर्व भागात या पूजेचं विशेष महत्त्व आहे. गाढ श्रद्धेप्रमाणेच आशा, आनंद आणि उत्सुकता यांचा संगम हा विजयादशमीचा विशेष आहे. वेदिक काळात देवीला फारसं महत्त्व दिलं गेलेलं दिसत नाही. तथापि, हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील संशोधनावरून वेदपूर्व काळापासून देवी अस्तित्त्वात होती, असं लक्षात येतं. दर वर्षी सप्टेंबर किवा ऑक्टोबर महिन्यात, शरद ऋतुमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. भारतातील सण-उत्सव आणि ऋतु यांचा उत्तम मेळ घालण्यात आला आहे. शरद ऋतुमध्ये शेतात नवीन धान्य आलेलं असतं. आर्यांमध्ये इंद्र, वरुण, वसू, अग्नि, मित्र यासारख्या प्रभावी पुरुष देवतांची पूजा होत असे. पुढे त्यांनी आदिती, उषा, सरस्वती अशा देवींची उपासनाही सुरु केली. सृजनासाठी ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’ यांची सारखीच गरज असते, हे त्यांच्या लक्षात आलं. पुढच्या काळात उमा, पार्वती, अंबिका, कात्सायनी, भद्रकाली अशा देवींची उपासना सुरू झाली. ठिकठिकाणी देवीची मंदिरं उभी राहिली. महादेवाच्या बरोबरीने देवीचं नाव घेतलं जाऊ लागलं. शिव हा वेदपूर्वकाळातील देव असावा, असं वाटतं. बौध्दकाळात देव-देवतांचं महत्त्व कमी होऊ लागलं होतं. त्या काळात शक्तीच्या पारंपरिक पूजेबरोबर इतर प्रथांचा समावेश झाला असावा. यावरुन भारतवर्षामध्ये शक्ती उपासना फार प्राचीन असावी, असं म्हणता येतं. पोथ्या, पुराणांमध्ये आदिमायेच्या पूजेचे उल्लेख आढळतात. प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी देवीची पूजा
ेली होती. रावणाचा वध झाला झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ दसरा किवा विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळेच हा सण म्हणजे दुर्जनांवर सज्जनांनी मिळवलेल्या विजयाचा आनंदसोहळा आहे. महिषासूरमर्दिनीने महिषासुराला मारलं या आनंदाप्रित्यर्थही हा उत्सव साजरा केला जातो. याचाच अर्थ दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींनी मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दसर्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
(अद्वैत फीचर्स)
— डॉ. सदानंद मोरे
Leave a Reply