प्राणी जगतातील धोके उलगडणारे शास्त्रीय पुस्तक मानवाच्या शक्तीचा, बुद्धी चा आणि लालसेचा परिणाम म्हणून या पृथ्वीतलावर अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा काही निवडक प्राण्यांची माहिती देणारे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक. ले. गो. बा. सरदेसाई यांनी. पृ.112 किं.110 रू. ISBN : 978-93-80232-45-4 नचिकेत प्रकाशनाचे विनाशाच्या वाटेवरील प्राणी हे श्री. गो.बा. सरदेसाई यांचे एक छोटेखानी वैज्ञानिक माहितीवर आधारित असलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. शोध मंगळाचा, यमदूती सुनामी आणि सजीवांचे जीवनकलह या धर्तीवरचे हे आणखी एक पुस्तक आहे. यात एकूण 41 प्राण्यांचे वर्णन केले गेले आहे. त्यांचे 2 विभाग करून पहिल्या भागात पूर्णपणे नष्ट झालेल्या आणि दुसर्या भागात नष्टप्रायतेकडे वाटचाल करणारे म्हणजे संकटग्रस्त प्राण्यांचा समावेश आहे. सुरवातीलाच पुस्तकाच्या प्रयोजनाबाबत लेखकाने वाचकांना सजग केले आहे. 4 अब्ज वर्षांच्या कालावधीत असंख्य सूक्ष्मजीव, वनस्पती व प्राणी पृथ्वीवर उत्पन्न झाले आणि नष्ट झाले. 1 लक्ष वर्षांपूर्वीच्या काळात नष्ट झालेल्या प्राण्यांना नष्ट करणारी कारणे म्हणजे जंगलातील वणवे उल्कापात, पूर वगैरे होती. पण पृथ्वीवर मानवाचा अवतार झाल्यामुळे त्याच्या पोटाची भूक, वापरायच्या वस्तू आणि सुविधा यासाठी होणारी जंगलकटाई ही अनेक प्राण्यांना नष्ट करणारी कारणे ठरतात. त्यामुळे पृथ्वीवरील जीवजंतूंची बेसुमार हत्या होते आणि काही प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे माणूस हा जीव सृष्टीच्या विनाशाचा महत्वाचा घटक ठरतो, असा इशारा ते देतात. नष्ट झालेल्या प्राण्यात 14 व्या शतकातील क्वागा हत्ती पक्षी व नंतरचे डीडी, टास्मानियन लांडगा, मोआ, प्रवासी कबुतर व स्टेलरची सागरगाय या प्राण्यांचे वर्णन येते. युरोप, उत्तर-दक्षिण,अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटाटिर्रकाच्या बर्फाळ भागातील अशा सर्वच भागातील प्राण्यांचे (नष्ट व नष्टप्राय वर्गातील) वर्णन या 41 प्राण्यांतून घडते, आणि हे प्राणी नष्ट होण्याची कारणेही लेखक देतात. संकटग्रस्त म्हणजे अजून काही प्रमाणात अस्तित्वात असणारे पण योग्य काळजी न घेतल्यास नष्ट होऊ शकणार्या प्राण्यांबाबतची शास्त्रीय माहिती हे पुस्तक देते, ती उद्बोधक आहे, तशीच मनोरंजकही आहे. निसर्गातील वैविध्य तर त्यामुळे कळतेच. परंतु जीवनकलहाची धारही उमजून येते. गोरिला हा मानवसदृश प्राणी, ज्याची कातडी अन् कवटी मिळावी म्हणून माणूस त्याची कत्तल करतो. ओरांग उटाण हा आग्नेय आशियातील प्राणी. हाही एक प्रकारचा कपि म्हणजे माकड पण लहानसा 120 से. मि. उंचीचा आणि सवयींचे बाबत मानवाशी साम्य असणारा. हा प्राणी खिळे ठोकणे आणि नटबोल्टचे नट सैल आणि घट्ट करू शकतो म्हणून युरोपीय लोक पिले पळवून नेतात, परिणामी अनेक प्राणी मरतात, तसेच शशकर्ण बॅन्डीकूट हा ऑस्ट्रेलियातील प्राणी त्याच्या केसाळ कातडीसाठी मारला जातो. काकापासारखा उडू न शकणारा पक्षी त्याच्या रंगीबेरंगी पिसांसाठी मारला जातो. या प्राण्याला 2 मोठे सुळे (हत्तीप्रमाणे) असतात, त्याच्या कातडीखाली खूप जाडीचा चरबीचा थर असतो त्या चरबीसाठी ह्या प्राण्यांना त्यांच्या शंभरहून अधिक समूहातून ओढून मारून टाकले जाते. प्राण्यांच्या मृत्यूचे कारण, त्यांच्या शरीरातील मांस, चरबी किंवा कातडी, केस, खुरे, दात असे काहीही असले तरी त्याच्याशी मानव जमातीची लोभी प्रवृत्तीच कारणीभूत होते, हे कळले की मन विषण्ण होते.
कृषीक्षेत्राची वाढण्यासाठीची जंगलकटाई, घरे बांधण्यासाठी लागणारा लाकूडफाटा, वाळूचा उपसा, पर्सेस, जोडे, बॅगा यासाठी होणारी हत्या इतके सांगण्यासाठी हे पुस्तक आहेच, पण सामान्य वाचकाला नकळत प्राणी-त्याच्या सवयी, आढळण्याच्या जागा, खाण्यापिण्याची साधने, राहण्याच्या जागा याबाबतही विपुल माहिती हे पुस्तक थोडक्या शब्दात देते. प्रत्येक प्राण्यासाठी 1-2 पाने मजकूर असून त्यात त्या प्राण्याचा प्राणीवर्ग, रूप, रंग, वैशिष्ट्ये देण्याला जो प्रयत्न लेखकाने केला आहे. त्याचवेळी त्या प्राण्याचे जीवनविश्र्वच उलगडून जाते. घागरीत सागरदर्शनाप्रमाणे छोटे पण माहितीपूर्ण असे हे पुस्तक आहे. वाचता वाचता कळणारी माहिती रंजनापेक्षा जागरूक करणारे चित्तभान उजळते, हे या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य. सिंह या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे कळपातील मोठा नर व इतरही नर शिकारीत भाग घेत नाहीत. माद्या शिकार साधतात. गवताआड लपतछपत जाऊन प्राण्याला घेरतात, पाठलाग करून मारतात-ओरबाडतात शिकार पूर्ण झाली की नरसिंह पुढे येतात आणि लचके तोडून मांस खातात पण कळपात साम्राज्य मात्र राहते ते सिंहाचे, सिंहिणीचे नाही आहे की नाही सृष्टीची गंमत. माळढोक हा पक्षी बहुपत्निक आहे त्याच्या जनानखान्यात 5-6 माद्या असतात. अस्वल फळे, मध कीटक, पक्षांची प्राण्याची अंडी खातात, मांसाहार अगदी मर्यादित स्वरूपात करतात. आय आय प्राणी झाडाची साल कुरतडून, बुंध्याच्या भोकात बोटे खूपसून सुरवंट व इतर किडे खातात. ऍडॅक्स हा आफ्रिका खंडातील हरिण सदृश प्राणी जानेवारीत दक्षिणेकडील सरोवराजवळ जातात. गवत व रानटी फळातून त्यांना प्राणी मिळते. मोजेबंद सर्प बिळात (30-40 जण) चिकटून राहतात. त्यामुळे त्यांना उब मिळते. रेशमी चमकदार पायमोज्यांप्रमाणे हे दक्षिण अमेरिकेतील सर्प मानवी वसाहतींमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ऑस्ट्रेलियातील बांबट प्राण्याचे डोळे ओलसर असतात.
सिंह पुच्छ मर्कट ही माकडे पूर्वी कर्नाटकात होती. आता क्वचित कुठे आढळतात. एका झाडावरून दुसर्या झाडावर जाताना अजिबात आवाज करीत नाहीत. ह्याचा शत्रू बिबट्या वाघ आहे. नील तिमी हा निळा देवमासा हा दक्षिण ध्रुवाजवळील सागरात असतो. हा एक सस्तन प्राणी मासा आहे. मादीची गर्भधारण 323 दिवसांची असते. तिला 6.7 मीटर लांब, 2 टन वजनाचे एकच पिल्लू होते. स्पेक्टॅकल्ड बेअर याच्या डोळ्याभोवतीच्या रंगीत वलयाने जणुकाही त्याने चष्मा घातल्याप्रमाणे दिसतो. समुद्र गाय (ड्युगांग) हे निकोबार जवळील आढळणारी प्राणी कळपाने राहतात. (समुद्रात हिंडतात) बीव्हर प्राण्याचे घरटे पाण्यात बांधले जाते. कॉन्डार पक्षी घरटे बांधत नाहीत. माद्या अंडी, उंच जागी असणार्या खडकांचा आडव्या रूंद कंगोर्यात घालतात. कोआला प्राण्याला पाण्याची गरज नसते. ऑस्ट्रेलियातील हा प्राणी ठराविक जातीचीच पाने खातात. तीही फार कोवळी नाही, फार जरडही नाहीत अशीच त्यांना हवी असतात. योग्य आहार न मिळाल्यास हे प्राणी उपोषण करतात व प्राणत्याग करतात. प्राण्यांचा आकार, रंग, वसतीस्थान, शास्त्रीय नाव, शास्त्रीय वर्गीकरणातील स्थान, खंड देश व राहण्यास व जगण्यास आवश्यक हॅबीटॅट/परिसर या सर्वांसह त्यांच्या आवडीनिवडींचे वर्णन करून त्यांच्या नाशासाठी पर्यायाने त्यांच्यातील एखादी चांगली गोष्टच कशी कारणीभूत होते हे गो.बा. सरदेसाई यांनी आटोपशीरपणे वर्णिले आहे. कुमारवयातील मुलांसाठी हा एक बौद्धिक मेवाच आहे. प्रौढांनाही पुष्कळ काही नवे कळते.
“जिवंत बहुबोलके अतिसुरम्य ते उत्पलनरे धरूनि नाशिले खचित थोर बुद्धिबळ” या टिळकांच्या ओळींची प्रचिती हे पुस्तक वाचून येते. उत्तरा हुद्दार विनाशाच्या वाटेवरील प्राणी 15, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर 440 022 लेखक : गो. बा. सरदेसाई पाने : ११२, किंमत : ११० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply