काही मराठी दैनिक मालिकांना हल्ली विरोधाचा सामना करावा लागत आहे, सध्याच्या मालिका हया वास्तवापासून कोसो दूर असतात. त्यामुळे त्या मालिकांतील कथानकांना आणि कथेतील पात्रांना आणि मुळात कथेला किती गंभीरपणे घ्यायचं याचा विचार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे कारण आता मालिकांतील कथानकांचा संबंध थेट समाजाशी, जातीशी आणि धर्माशी लावला जावू लागला आहे. हा मालिकांना विरोध करण्याच्या नावाखाली आता राजकारणही सुरू झालेले दिसते.
सध्या मालिकांची निर्मिती समाज हितासाठी केली जाते हा गोड गैरसमज कोण बाळगत असेल तर तो वेळीच दूर व्हायला हवा !
मालिका निर्मिती हा व्यावसाय आहे लोकांच मनोरंजन करण हाच त्याचा उद्देश आहे. सामाजिक बांधिलकी म्ह्णून जर मालिकांची निर्मिती झाली असती तर चांगले कथानक असणार्या पण टी.आर.पी. नसणार्या मालिका बंद झाल्या नसत्या नाही का ? मालिकेतील कथानक मला पटलं नाही म्ह्णून ती मालिका बंद व्हावी असा आग्रह होत राहिला तर सर्वच मालिका बंद कराव्या लागतील आता काही पुरुषांना नाही आवडत पुरुषांनी साड्या नेसलेल्या म्ह्णून ते जर म्हणाले,’ ‘ज्या मालिकांत साड्या नेसलेले पुरुष आहेत त्या मालिका बंद कराव्या तर ते शक्य आहे का ?’ एका मालिकेत एक मराठी मुलगी एका हिंदी भाषिक तरुणाच्या प्रेमात पडताना दाखवली म्ह्णून मालिका बंद करावी अथवा त्यामुळे मराठी अस्मितेला धोका पोहचला हे कसं शक्य आहे त्या मालिकांतील ती एक काल्पनिक तरूणी करोडो मराठी मुलींची प्रतिनिधी होऊच कशी शकते ?
हया मालिका पाहतोय कोण मराठी प्रेक्षकच ना ? याचा अर्थ त्यांना या कथानकात काहीच चुकीच वाटत नाही का ? त्या मालिका पाह्णार्यांना त्यात काही चुकीच वाटत नसेल तर इतरांनी उगाच आदला – आपट करून काही उपयोग आहे का ? मालिकांची कथा कधीही पूर्ण लिहलेली नसते त्यामुळे त्यात कधीही कोणताही बदल करण शक्य असतं. त्यामुळे अशा मालिकांना फक्त विरोधासाठी विरोध करणारे तोंडघशी पडण्याची शक्यताच अधिक असते.
आता काही दिवसापुर्वी भुताखेतावरील एका मालिकेला विरोध झाला होता त्याच काय झालं आता कथानकाने अचानक जे वळ्ण घेतल त्यामुळे अचानक विरोध मावळला उलट त्यामुळे कदाचित त्या मालिकेचा टी.आर.पी. वाढायलाही मदत झाली असेल.
ज्या मालिकेतील कथानक आपल्या आवडत नसेल ती मालिका आपण पाहावीच का ? आणि ती इतरांनी पाहू नये असं आपल्याला वाटत असल्यास ते का करावे हे पटवून देण्याची क्षमताही आपल्यात असायला हवी नाही का ? या मालिकांत काम करणारे कलाकारही मराठीच आहेत ना ? त्यांना भान नसेल का आपण काय करत आहोत याचे ? विरोधासाठी विरोध करण्याची समाजाची मानसिकता आता या बाबतीतही बदलायला हवी. न आवडणार्या मालिका आता आपोआप बंद होतात कारण टी.आर.पी. या मालिकांना आवर घालण्याचे हत्यार आहे. मालिका बंद करण्याचे आवाहन करण्यापेक्षा मालिका पाहू नका असे आवाह्न करणे सोप्पे आहे नाही का ? त्यामुळे कोणाचेच काही नुकसान होणार नाही आणि आपला उद्देश जर योग्य असेल तर तो साध्य ही होईल नाही का ? फक्त विरोधासाठी विरोध केल्याने या मालिकांचा टी.आर.पी. वाढण्यास मदतच होते. म्ह्णजे विरोधकांचा विरोध फक्त विरोधासाठी असेल तर याचा त्या मालिकेला फायदाच होतो आणि मग चुकीचे पायंडे पडायला सुरुवात होते.
टी.आर.पी. जास्त असणार्या सर्वच मालिका पाहण्यासारख्या असतातच असं नाही त्यांच्यातही बर्याचदा कल्पनातीत आणि अशक्यप्राय असणार्या गोष्टी दाखविण्याचा अट्ट्हास केलेला असतो. या मालिकांना विरोध करणार्यांची भुमिका बरोबर असेल पण तो व्यक्त करण्याची पद्धत बदलायला हवी ! विरोधासाठी म्ह्णून विरोध न करता आपला विरोध या मालिका डोळे फाडून पाहणार्यांना पटवून देत राहायला हवं तोपर्यत जोपर्यत ते त्यांना पटत नाही. या अशा मालिकांमुळे समाजमनावर फार मोठा परिणाम वगैरे होईल असं कोणाला वाटत असेल तर तसं काही होत नाही. कारण मालिका आवडते म्ह्णून पाहणारे जितके असतात तितकेच आवडत नसतानाही पाहणारे असतात. मालिकेला टी.आर.पी. मिळतोय म्ह्णजे त्या मालिकेला समाजमान्यता मिळतेय असं ही या मालिकांची निर्मिती करणार्यांनी समजू नये.
आज समाजातील एक गट या मालिकांच्या विरोधात बोलतोय. भविष्यात संपुर्ण समाज बोलू लागला तर मालिकांची निर्मिती करणे अवघड होऊन बसेल याच भानही मालिकांची निर्मिती करणार्यांनी ठेवायला हवं आज जरी फक्त विरोधासाठी विरोध होत असला तरी तो तसाच राहील याची खात्री देता येत नाही…
— लेखक – निलेश बामणे
मो. 8652065375
गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
दिनांक – 15 मे 2016
Leave a Reply