गुंडांच्या वसाहतीत त्यांचे घर. घराच्या जवळ अतिशय प्राथमिक अवस्थेतील टेनिस कोर्ट आणि त्यावर सराव करणाऱ्या दोन लेकी आणि बाप. अचानक गोळीबार सुरू व्हायचा. या तिघांना लपायलाही जागा नसायची. अनेकदा तिघेही कोर्टवरच लोळण घेऊन आपला बचाव करायचे. गोळीबार, गरिबी, प्राथमिक सुविधांचा अभाव असे सर्व विरोधीच वातावरण आणि त्या सर्वांवर मात करणाऱ्या विल्यम्स भगिनी, त्यांचे वडील रिचर्ड यांनी अमेरिकेच्याच काय; पण महिला टेनिसविश्वात नवा अध्याय लिहिला. झोपडीवजा घर ते काही मिलियन डॉलरमधील कमाई असा त्यांचा प्रवास आजही सर्वांना अचंबित करून सोडणारा आहे. जगभरातील महिला टेनिसपटूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे.
रिचर्ड विल्मस कृष्णवर्णीय. प्रगत अमेरिकेत सर्व प्रकारची अवहेलना सहन करून जगणारा. प्रसंगी चोऱ्या करणारा आणि जगणारा. त्याची ओरेन्सशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर. दोघेही गरिबीचे चटके सोसत मोठे झालेले. ओरेन्स तर तीन मुलांची आई. नवऱ्यापासून विभक्त झालेली. रिचर्ड दूरचित्रवाणी वाहिन्यांवर टेनिस बघतो. तेथील बक्षिसांची रक्कम पाहून अवाक् होतो. ओरेन्सला म्हणतो, आपल्याला आणखी दोन अपत्ये हवी आहेत. मी, दोघांना विश्वविजेते घडवेन. मी उत्तम प्लॅनर आहे… त्याने बाजारात जाऊन टेनिसची काही जुनी पुस्तकेही विकत घेतली. दोघांनीही टेनिसचा अभ्यास सुरू केला.
व्हीनसचा जन्म 17 जून 1980 चा. पुढील वर्षी सेरेनाचा. वयाच्या चौथ्या वर्षापासून रिचर्डने या दोघींच्या हाती रॅकेट सोपविली. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला त्यांचे तीन खोल्यांचे झोपडीवजा घर. सारा परिसर गुंडगिरीने व्यापलेला. गोळीबार, हाणामाऱ्या, खून असे प्रकार नित्याचे. गुन्हेगारीच्या या चिखलात विल्यम्स नेटाने दोन कमळे फुलवित होता. कृष्णवर्णीय आणि गोरे अशा संघर्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी. तासन् तास सराव सुरू असायचा. प्रशिक्षक नव्हता. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील सामने, काही सामन्यांच्या कॅसेट, मिळेल ती रॅकेट, अनवाणी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती अशा आयुधांवर जग जिंकण्याचा हा प्रवास सुरू झाला.
वयाच्या साडेचार वर्षापासून दोघींनी स्पर्धात्मक टेनिस खेळायला सुरवात केली. पुढील पाच वर्षांत दोघींनी अमेरिकेतील ज्युनिअर गटाच्या सर्व स्पर्धा जिंकल्या. दोघींचे वडीलच प्रशिक्षक. त्यांनी दोघींना अतिशय आक्रमक घडविले. फक्त “जिंका‘ हाच कानमंत्र दोघींना दिला. दोघीही उंचीने ताडमाड होत्या. व्हीनस तर वयाच्या अकराव्या वर्षीच सहा फूट उंचीची झाली होती. तिची उंचीच तिला प्रतिस्पर्धांवर मात करण्यासाठी मोठी मदत करीत होती. दोघींचा सर्व्हिसचा भन्नाट वेग पाहूनच दोघी टेनिसमधील आश्चर्य आहेत, असा गवगवा अमेरिकेत झाला होता आणि घडलेही तसेच. दोघीही आपला आक्रमक खेळ, वेगवान सर्व्हिस, दीर्घ व्हॉलीज करण्याची क्षमता यांवर जागतिक विजेत्या झाल्या. टेनिसच्या सम्राज्ञी झाल्या. ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या पहिल्या दोघी बहिणी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली. पैसा आणि प्रसिद्धीने पायाशी लोळण घेतली. दोघीही अनेक सामन्यांतून आमने-सामने आल्या. एकमेकींविरोधात खेळतानाही त्यांनी आपल्यातील जिगर कायम ठेवली.
सेरेना म्हणते, “”व्हीनस माझी आदर्श आहे. तिची प्रगती मला सतत प्रोत्साहित करते. तिचा पराभव मला चुकांमधून खूप काही शिकवून देतो. मी तिचा हात धरूनच मोठी झाले. माझे वडील आणि ती माझे पहिले गुरू आहेत.‘‘
व्हीनस एका मुलाखतीत म्हणते, “”आमच्या प्रसिद्धीनंतर आमच्या वागणुकीत फरक पडला नव्हता; पण माध्यमातून उलटसुलट बातम्या येतात. आम्ही त्याला फारशी किंमत देत नाही. माझ्या कुटुंबाला माहीत आहे, की आम्ही कशा आहोत. अशा अफवा नंतर वाहूनही जातात आणि आता तसेच होते आहे.‘‘
टेनिसशिवाय इंटेरिअर डिझाइनरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्हीनसने स्वतःची कंपनी उघडली आहे. त्याशिवाय तिने अभिनयाचा शौक अनेक मालिकांमधून पूर्ण करून घेतला आहे. ती म्हणते, “”मी टेनिसस्टार झाले नसते तर मोठी अभिनेत्री झाले असते. नाटक माझ्या अंगातच आहे.‘‘
सेरेना विल्यम्स अधिक धार्मिक आहे. त्या संदर्भातील वाचन हा तिचा आवडीचा विषय आहे.
— दीपक गायकवाड
Leave a Reply