वय झाले की हलका आहार घ्यावा असे म्हणतात. पण असा आहार म्हणजे नेमके काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. हलक्या आणि तरीही पोटाची भूक भागवणाऱ्या काही पदार्थाविषयी जाणून घेऊ या. न्याहरी हे दिवसातले पहिले अन्न. न्याहरीला रोज काय वेगळे करावे, त्यातही घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना सोसेल आणि तेवढय़ापुरते पोटही भरेल, असा आहार कुठला, हे प्रश्न जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी पडतातच. फार वेगळे काही न करताही वृद्धांना चालेल अशी हलकी न्याहरी करता येते.
पोळी आणि तिळाची चटणी.
पोळी किंवा ब्रेडवर मध आणि चिमूटभर दालचिनीची पूड घालून खाता येईल. *ज्यांना अंडे चालते अशांसाठी ब्रेड आणि उकडलेले अंडे. *ब्रेडला नेहमीचे लोणी लावण्यापेक्षा थोडेसे ‘पीनट बटर’ (शेंगदाण्याचे लोणी) किंवा ‘अल्मंड बटर’ (बदामाचे लोणी) लावून खाता येईल. यातले पीनट बटर आता सहजतेने मिळू लागले आहे. बदामाचे लोणी घरी करता येते. बदाम भिजवून त्याची साले काढावीत आणि थोडेसे पाणी घालून ते गंधासारखे बारीक वाटावेत. ४-५ दिवस टिकणारे हे बदामाचे लोणी ब्रेडवर लावता येईल. साध्या लोण्यात किंवा बाजारात मिळणाऱ्या ‘टेबल बटर’मधून अधिक कोलेस्टेरॉल शरीरात जाण्याची भीती शेंगदाणा व बदामाच्या लोण्यात कमी असते.
*सकाळच्या न्याहरीला सूपसारखा उत्तम आणि ताजेतवाने करणारा पदार्थ नाही. गाजर, मटार, टोमॅटो, कोबी अशा रोज घरात असलेल्या भाज्या वापरून पटकन आपल्या आवडीच्या चवीची सूप बनवता येतील.
*जेवणाच्या आधी अकरा वाजताच्या सुमारास अनेक वृद्धांना काही तरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा मधल्या वेळेसाठी फळे किंवा सुकामेवा उत्तम. फळांच्या रसांपेक्षा फळे खाल्ली तर त्यातून तंतुमय पदार्थदेखील मिळतात. दातांनी चावण्यास काही समस्या नसेल तर थोडा सुकामेवा जरूर खावा. *दुपारच्या जेवणात वरण किंवा आमटी, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर हे सगळे पदार्थ असायला हवेत. पण पोटाला जड होऊ नये म्हणून जेवण प्रमाणातच केलेले बरे. जेवणात पुदिन्याची चटणी वगैरे पदार्थ चव तर आणतातच, पण पोटाला पाचकही ठरतात. * दुपारच्या चहाच्या वेळी लाह्य़ा हे उत्तम अन्न. ज्वारीच्या, साळीच्या किंवा मक्याच्या लाह्य़ा, खाकरा, चुरमुरे हे पदार्थ हलके ठरतील. चावण्यास अडचण नसलेल्यांनी खारे दाणे, फुटाणे खाण्यासही हरकत नसावी. जी मंडळी चहा पीत नसतील त्यांनी त्याऐवजी एखादे फळ खावे किंवा ताक प्यावे.
*रात्रीच्या वेळी भाजी आणि भाकरी हे जेवण चांगले. भाजी-भाकरी पोटाला हलकी आहेच, शिवाय त्यातूनही तंतुमय पदार्थ मिळतात. दोन्ही वेळच्या जेवणात ताक घेतले तर पोटाला शांत वाटते. *अनेक वृद्धांना डाळी किंवा उसळी अधिक प्रथिने असल्यामुळे पचत नाहीत. अशांसाठी हे पदार्थ करताना त्यात लसूण, आले, जिरे, मिरे आणि दालचिनी पावडर घातली तर पचनासाठी फायदा होऊ शकतो.
*ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी पोळी किंवा भाकरी करताना त्यात एका पोळी-भाकरीला १ चमचा एरंडेल तेल घालून पाहावे. भाकरीत सहसा तेल घातले जात नाही, परंतु त्यातही एरंडेल तेल घालून चालते.
*अपचनाचा, आमवात यांचा त्रास टाळण्यासाठी सुंठ आणि साखर यांचे एकास चार या प्रमाणात मिश्रण करून ठेवावे. येता-जाता या मिश्रणाची एक-एक चिमूट तोंडात टाकावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता
Leave a Reply