नवीन लेखन...

वेगळा आणि सक्षम पर्याय अपरिहार्य !



सतत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर काढून लोकांनी एक नवा संघ उभारावा. गेली साठ वर्षे तोच तो डाव टाकून एक हारणारा जुगार या देशातील लोक खेळत आले आहेत, आता किमान एकदा तरी नवा डाव खेळून पाहायला हरकत नाही. ती या देशाची आजची खरी गरज आहे.

टीव्हीला मनोरंजनाचे साधन मानले जाते, टीव्हीवरील कोणत्याही वृत्तवाहिनीचे कार्यक्रम बघितले, तर हा दावा अगदी शंभर टक्के खरा असल्याचे स्पष्ट होते. कोणतीही वृत्तवाहिनी सुरू केली तरी त्यावर जे काही दाखविले जाते त्याला बौद्धिक तमाशाखेरीज दुसरे काहीही म्हणता येणार नाही. रोज कुठलातरी नवा घोटाळा बाहेर आलेला असतो, त्यावर विरोधी पक्षांचे अकांडतांडव सुरू असते आणि सत्ताधारी पक्षाचा तितकाच निलाजरा बचाव पाहायला मिळतो, मध्येच या सगळ्याची रंजकता वाढविण्यासाठी कुणी तरी राजीनामा देतो आणि मूळ पटकथेत नवे मनोरंजक उपकथानक जोडले जाते. आजपर्यंत ज्याचे नावही ऐकलेले नसते असा एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती मध्येच कुणावर तरी आरोप करते आणि छोट्या पडद्यावरच्या मसाल्यात अजूनच भर पडते. कुठे एखादा व्यंगचित्रकार कसल्यातरी उभ्या आडव्या रेषा मारतो आणि वाहिन्यांवरील करमणुकीच्या कार्यक्रमांची लांबी वाढवून जातो. हे जे काही सध्या सुरू आहे ते सगळेच अगदी उबग आणणारे आहे. एकाने घोटाळे करायचे, दुसर्‍याने ते दडपायचा प्रयत्न करायचा आणि तिसर्‍याने त्याविरुद्ध बोंबा मारायच्या यापलीकडे या देशाच्या राजकीय पातळीवर सध्या काहीही सुरू नाही आणि हा सगळा प्रकार इतका मनोरंजक आहे, की देशाची सूत्रे राजकीय मंडळींच्या हातात आहे, की तमाशा कलावंतांच्या असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अमुक एक पक्ष भ्रष्टाचारी आहे म्हणून जनतेने दुसर्‍या पक्षाकडे पर्यायाच्या दृष्टीने पाहावे, तर पहिला बरा होता असे म्हणण्याची पाळी लोकांवर येते. आता मुलायम सिंग वगैरे मंडळी तिसर्‍या आघाडीचे सूर आळवत आहेत; परंतु मुलायम, ममता, मायावती हे निव्वळ राजकीय “ब्लॅकमेलर” म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा करता येत नाही.

सध्या सुरू असलेल्या घोटाळ्यांमुळे काँग्रेस बदनाम होईल आणि पुढील निवडणुकीत आपलीच सरशी होईल, असे मांडे सध्या भाजपची मंडळी खात आहेत; परंतु त्या अंजली दमानियांनी थेट भाजप अध्यक्षांवरच आरोप करीत एकप्रकारे भाजपचे पितळ उघडे पाडले आहे. अर्थात अंजली दमानियांनी आरोप केला म्हणून भाजपचे हे रूप लोकांपुढे आले असे समजण्याचे कारण नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेस अगदी सख्खेच नव्हे, तर जुळे भाऊ शोभून दिसतात, हे सत्य लोकांना आधीच कळालेले आहे. केवळ भ्रष्टाचाराच्याच बाबतीत नव्हे, तर तथाकथित आर्थिक नीतीच्या बाबतीतही हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या “एफडीआय” वरून भाजपने सध्या काँग्रेसविरुद्ध एल्गार पुकारला आहे, त्या “एफडीआय” ला सर्वप्रथम प्रवेश भाजप शासनाच्या कारकिर्दीतच देण्यात आला. सिंगल ब्रॅण्डमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला रालोआ सरकारच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती आणि भाजपला पुरेसा वेळ मिळाला असता, तर किरकोळ व्यापार क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीलाही भाजप सरकारने परवानगी दिली असती. २००४ च्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने तसा स्पष्ट उल्लेख केलाच होता. इथे एकाला पर्याय म्हणून दुसरा असा कुणीच नाही. काँग्रेसऐवजी भाजप सत्तेवर आले, तरी तिच आर्थिक नीती राहणार आहे, तेच परराष्ट्र धोरण राहणार आहे, तोच भ्रष्टाचार राहणार आहे, केवळ अभिनेते बदलतील, बाकी सगळा चित्रपट तसाच राहणार आहे.

खरेतर केवळ पर्याय नाही म्हणूनच लोकांनी साठ वर्षे काँग्रेसला झेलले आणि अजूनही झेलत आहेत. मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळता राज्यात आणि केंद्रात सतत काँग्रेसचीच सरकारे राहत आली आहेत. सतत सत्तेवर राहण्याचा परिणाम असा झाला, की काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारचा उद्दामपणा आला. आम्ही काहीही केले तरी शेवटी लोक आम्हालाच निवडून देतात, या अति आत्मविश्वासातून काँग्रेसचे नेते निगरगट्ट झाले. मुंबईचे ते कृपाशंकर सिंग, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही अगदी उजळमाथ्याने फिरत असतात. मुख्यमंत्री आणि इतर बड्या नेत्यांच्या आसपास सतत घोटाळत असतात, त्यांच्या सोबत फोटोफ्रेममध्ये आपण कसे येऊ याची काळजी घेत असतात आणि त्यासाठी नको तितका लाळघोटेपणा करीत असतात. काँग्रेसच्या नेत्यांनाही त्याचे काही वाटत नाही. मध्यंतरी याच काँग्रेसच्या एका मंत्र्याच्या कर्तृत्वाची लक्तरे “सीबीआय” ने वेशीवर टांगली तेव्हा तशीच वेळ आली, तर आपण राजीनामा देणार नाही, तर तोंडावर फेकून देऊ, अशी विलक्षण स्वाभिमानाची भाषा वापरली होती आणि नंतर आपल्याला राजीनामा द्यावा लागू नये म्हणून कुणाकुणाचे पाय धरत ते फिरले त्याचा तपशील नसला, तरी त्यांच्या या कमालीच्या नतमस्तकतेला सध्या तरी यश मिळाल्याचे दिसत आहे, कारण “सीबीआय” ने गुन्हा नोंदविल्यानंतरही त्यांचे मंत्रिपद शाबूत आहे. कदाचित काँग्रेस श्रेष्ठींना त्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे मोठे आकडे पाहून हा खरा काँग्रेसी असल्याची साक्ष पटली असावी.

सांगायचे तात्पर्य हेच आहे की डावे, उजवे, वरचे, खालचे असे सगळेच राजकीय पक्ष त्या प्रत्येक पक्षातील काही दोन-चार सन्माननीय अपवाद वगळले तर एकजात लुटारू आहेत. इथे सामान्य जनतेच्या प्रश्नांशी थेट निगडीत असलेल्या अनेक कायद्यांवर साधी चर्चादेखील होत नाही आणि अचानक एका रात्रीतून “एफडीआय” चा निर्णय घेतला जातो. ज्या वॉलमार्टच्या विरोधात तिकडे अमेरिकेत “गो बॅक वॉलमार्ट” चे नारे दिले जातात त्याच वॉलमार्टचे पायघड्या घालून स्वागत करण्यास आपण उताविळ होतो. सावकारी प्रतिबंधक कायदा, गोहत्या बंदी कायदा अशासारख्या अनेक कायद्यांची विधेयके गेल्या कित्येक वर्षांपासून संसदेत रेंगाळलेले आहेत, त्यावर कोणताही पक्ष पोटतिडकीने बोलताना दिसत नाही आणि सामान्य लोकांच्या, शेतकर्‍यांच्या हिताशी ज्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही असे निर्णय मात्र अध्यादेश काढून घेतले जात आहेत. ही सगळी परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे. लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास आता ढळू लागला आहे. राजकारणी म्हटला, की तो भ्रष्टच असणार, इतक्या टोकाच्या विचारापर्यंत सामान्य लोक आले आहेत आणि लोकांच्या या आकलनात फारसे गैर असे काहीही दिसत नाही. सगळ्या राजकीय पक्षांचे किंवा त्या पक्षातील बड्या नेत्यांचे आपापसात गुळपीठ असते. आमची चार कामे ते करतात, त्यांची चार कामे आम्ही करतो, असे नीतीन गडकरी उगाच म्हणाले नसतील. अपघाताने का होईना ते सत्य बोलून गेले आणि हे सत्य केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही, इतरही अनेक नेते स्वार्थ असेल तिथे सगळे मतभेद, पक्षभेद विसरून गळ्यात गळे घालत असतात. लोकांना हे दिसते, समजते आणि म्हणूनच लोकांचे या मंडळींविषयी अतिशय प्रतिकूल मत झाले आहे. अशा परिस्थितीत या देशाचे चित्र चांगल्या अर्थाने बदलायचे असेल, तर एका सक्षम आणि वेगळ्या राजकीय पर्यायाची नितांत गरज आहे. अण्णा किं ा अरविंद केजडीवाल वगैरे मंडळी हा पर्याय देऊ शकत नाही, कारण त्यांची एकूण भूमिका अगदीच नकारात्मक आणि अव्यवहार्य आहे. ते भलेही आंदोलन करू शकतील, बोंबा मारू शकतील; परंतु सकारात्मक, रचनात्मक काही करू शकतील असे वाटत नाही. त्यामुळे आता विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी, विविध विषयांतील अभ्यासकांनी केवळ देशाचे हित हे एकमेव लक्ष्य समोर ठेवून एकत्र येणे आणि एक चांगला स्वच्छ पर्याय लोकांसमोर निर्माण करणे गरजेचे झाले आहे. सामाजिक क्षेत्रात निरिच्छपणे काम करणारे अनेक लोक आहेत, संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, अर्थक्रांतीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसे आहेत, शेतीचा वस्तुनिष्ठ अभ्यास असलेले अनेक लोक आहेत. कुठलीही राजकीय अभिलाषा नसलेल्या या लोकांनी देशाला योग्य दिशा देण्यासाठी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक, देशातील शेवटच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जाहीरनामा लोकांसमोर मांडावा, विकासाचा एक कालबद्ध “रोडमॅप” तयार करावा आणि किमान पाच वर्षांच्या एका कारकिर्दीसाठी लोकांनी आम्हाला संधी द्यावी, असे आवाहन लोकांना करावे. प्रस्थापित राजकीय पक्षांचा उबग आलेले लोक अशा गैरराजकीय; परंतु सत्तेच्या माध्यमातून देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या लोकांना पाठिंबा देतील किंवा लोकांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा, “राव गेले आणि पंत चढले” यापेक्षा वेगळे काही होणार नाही. सतत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर काढून लोकांनी एक नवा संघ उभारावा. गेली साठ वर्षे तोच तो डाव टाकून एक हारणारा जुगार या देशातील लोक खेळत आले आहेत, आता किमान एकदा तरी नवा डाव खेळून पाहायला हरकत नाही. ती या देशाची आजची खरी गरज आहे.

जुने प्रहार वाचण्याकरिता:फेसबुकवर प्रकाश पोहरे टाईप करा.प्रतिक्रियांकरिता: Email: prakash.pgp@gmail.com, Mobile No. ९१-९८२२५९३९२१

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..