नवीन लेखन...

वैश्विक नातं

वाफाळलेल्या कॉफीचा कप हातात धरून सरीता खिडकीच्या काचेतून बाहेर बघत बराच वेळ बसून होती. 3.30 वाजून गेले होते, tea-time संपला होता. तिला मात्र जावेसेच वाटत नव्हते. “आपले म्हणावे असे हक्काचे क्षण मिळणं इतकं अवघड का असते?” नकळत ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात मोबाइलला वर boss चा मेसेज झळकला, “see you in conference room at 4 pm”. सरिताने एक दीर्घ उसासा टाकला.” It’s ok सरिता, time to go now” स्वतःला निक्षून सांगत ती उठून उभी राहिली.

बाहेर रिमझिम पाऊस सुरु झाला होता. तिच्या मनात मात्र आठवणींच्या जोरदार सरी कोसळत होत्या. 5 वर्षांपूर्वी झालेली तिची अन राजीवची भेट क्षणात तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेली. आठवणींचा पट पसरु लागला तोच तिने स्वतःला सावरले अन आपल्या केबिनकडे निघाली. आजची मीटिंग महत्वाची होती. तिचे आधीचे दोन प्रोजेक्ट delay झालेले होते. तिच्या परफॉर्मन्स वर शंका घेणं सुरु झालेलं होतं. गेल्या 4 वर्षात झालेल्या तिच्या प्रगतीवर जळणारे सहकारी या संधीचा फायदा घेण्यासाठी सक्रिय  झाले होते. त्यांचाहि बंदोबस्त करावा लागणार होता. हातापायातले त्राण गळून गेले होते जणू. कसेतरी उसने अवसान आणत, डेस्क वरून डायरी अन पेन घेऊन ती कॉन्फरेन्स रूम कडे चालू लागली.

मीटिंग सुरु झाली होती. सरिताने दार उघडले अन तिच्या कानावर बॉस चे शब्द आदळले, “शिल्पा, मी विनंती करून थोडा वेळ मागून घेतला आहे. दुसरी संधी मिळणार नाही तेंव्हा…सरिताकडे असलेला प्रोजेक्ट तू स्वतःकडे घे आणि लगेच काम सुरु कर”. सरिताच्या सर्वांगातून एक सणक गेली. आजपर्यंत बॉसच्या तोंडी असलेलं नाव क्षणात मागे पडलं होतं.

सरिता आत येऊन खुर्चीत बसली. थोडावेळ शांततेत गेला. बॉस बोलणार तोच सरिता म्हणाली, “मी ऐकले आहे सर. शिल्पाला मी आजच सर्व डीटेल्स देऊन टाकेल. माझ्यामुळे प्रोजेक्ट डीले झाला त्याचं मलाहि वाईट वाटतय. पण…” सरिता चूप झाली. शिल्पाच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा पसरली. सरिताचा आजहि दबदबा होता आणि शेवटच्या क्षणीसुद्धा सरिताने बॉसला कन्व्हिन्स केलं तर प्रोजेक्ट हातातून जाण्याची भीती होती परंतु सरिताने काहीही आढेवेढे न घेता प्रोजेक्ट सोडला होता. शिल्पाने प्रकाशकडे बघून कॉलर वर करण्याची अॅक्शन केली. तिची १.५ वर्षाची मेहनत आज फळाला आली होती.

“कम ऑन, लेट्स डू इट फास्ट देन. वी डोन्ट हॅव मच टाईम इन हॅन्ड.” बॉस चुटकी वाजवत ऊठला तसे सर्वच उभे राहिले अन एक-एक करून बाहेर पडू लागले. सरिता बसूनच होती. सर्व निघून गेल्यावर ती उठली पण बॉसने हाताने खुणवून तिला थांबायला सांगितले. ती थबकली. तिच्या अवती-भवती सर्वकाही गरगरू लागलं होतं.  आर्किटेक्चर मध्ये विशेष रुची असल्याने वडिलांचा विरोध असतांना तिने B. Arch. केले होते. शेवटच्या वर्षाला असतांना कॅम्पस सिलेक्शन मधून एक मोठ्या कंपनीत तिला ऑफर आली होती. ज्या व्यक्तीने तिचं सिलेक्शन केलं होतं, तिच्या कामावर खुश होऊन तिला दरवर्षी प्रमोट केलं होतं त्याचं व्यक्तीने तिच्या हातातला प्रोजेक्ट आज काढून घेतला होता.

“काय झालं सरिता? गेल्या २ महिन्यांपासून मी आॅब्जर्व्ह करतो आहे, तुझं लक्ष कामावरून हटलं आहे.” बॉसने खुर्चीत बसत विचारलं. सरिता शांतच होती. काय बोलावे याचा तिला अंदाज येत नव्हता. बॉसने हाताचे कोपरे टेबलवर टेकवले आणि सरिताच्या बोलण्याची वाट पाहू लागला. सरिता अजूनही शांतच होती.

“मला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट नाहीये. परंतु आजपर्यंत तू केलेलं काम जेंव्हा मी आठवतो तेंव्हा आजची सरिता मला वेगळी भासते. रेकोर्ड टाईममध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट करणारी सरिता हीच का हा प्रश्न गेले ४ दिवस मी स्वतःलाच विचारतो आहे. सोपं नव्हतं माझ्यासाठी तुझ्या हातून प्रोजेक्ट काढून घेणं पण…. माझा नाईलाज झाला. मी काही मदत करू शकतो का एवढंच मला पहायचं आहे त्यामुळे तू हवं तर माझ्याशी discuss करू शकतेस.” बॉस.

“राजीवसोबत बिनसलं आहे सर. माझं जॉब करणं त्याला खटकतं हल्ली.” सरिताने डोळे पुसले.

“खटकतं? कसं शक्य आहे? मागच्या वर्षी आपल्या अवार्ड फंक्शनला आला तेंव्हा भेटला होता राजीव मला. तुझ्याबद्दल भरभरून बोलत होता तो. मग अचानक असं काय झालं ?

“गेल्या वर्षापासून माझी जबाबदारी वाढली होती. काम संपत नव्हते म्हणून मी घरी काम नेत होते… थोडं घराकडे दुर्लक्ष व्हायचं माझं, कधी कोणी पाहुणे आले तर मला थोडा स्ट्रेस यायचा. चिडचिड व्हायची. त्यामुळे… ” सरिता समोरच्या खुर्चीत बसली.

“हम्म् , असं आहे तर.” बॉस खुर्चीत रेलून बसला. “तुला कामात हरवलेलं पाहून खुपदा मला विचार यायचा, माझे जुने दिवस आठवायचे. मी पण असाच झपाटल्यासारखं काम करायचो. पण त्याने अडचणी वाढतात असा माझा अनुभव आहे.” बॉस थोडा हरवल्यासारखं वाटला.

“पण सर हेच तर लाईफ आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात, आवडत्या कंपनीत काम करायला मिळत आहे यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल? आणि हेचं वय आहे काम करायचं.” सरिता थोडी मोकळी बोलू लागली.

“तुम्ही सोबत मूव्हीला कधी गेला होतात?” बॉसने विचारलं.

“मूव्ही? नाही सर, गेल्या ८-१० महिन्यात नाही जमलं जाणं. मागच्याच महिन्यात त्यावरून वाद झाला होता आमच्यात. त्यानंतर तर परिस्थिती आणखीनच बिघडली. वाईट याचं वाटत आहे कि घरातल्या विवादांमुळे माझं कामावरून लक्ष विचलित झालं.” सरिताने एक दीर्घ उसासा सोडला.

“तुला अजूनही प्रॉब्लेम नाही समजला सरिता, आश्चर्य आहे !” बॉस

“प्रॉब्लेम म्हणजे?” सरिता गोंधळली.

“मला आजही आठवतंय, इंटरव्ह्यू मध्ये मी तूझ्या हॉबीज् विचारल्या होत्या आणि त्यात तू अॅस्ट्रॉनॉमी वाचायला आवडतं असं सांगितलं होतं. आठवतंय तुला?” बॉसने विचारलं. बॉसने अचानक विषय बदललेला पाहून सरिता आणखीनच गोंधळली. गप्पच राहिली.

“कमाल आहे, आठवत नाही तुला?” बॉसने पुन्हा एकदा विचारलं.

“आठवतं सर, पण… त्याचे इथे….. काय?” तिने प्रतिप्रश्न केला. बॉस जागेवरून उठला, हातात मार्कर पेन घेऊन त्याने white-board वर एक चित्र काढले..” हे काय आहे, सांगता येईल?”

“मधे सूर्य आहे आणि त्याभोवती पृथ्वी फिरते आहे…” सरिताला अजूनही लिंक लागत नव्हती.

“सूर्य पृथ्वीला सतत आपल्याकडे ओढत असतो, बरोबर?” बॉस.

“हो, तो gravitational force असतो..”सरिता.

“तरीही पृथ्वी सूर्यावर जाऊन आदळत नाही, कारण माहिती आहे तुला?” बॉसने विचारलं.

“हो, कारण पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याने दुसरा एक फोर्स तयार होतो, centripetal force.. त्यामुळे पृथ्वी सूर्यावर आदळत नाही.” बॉसला भलतेच काहीतरी का सुचत आहे अशावेळी असा मनाशी विचार करत सरिताने अनिच्छेनेच  उत्तर दिले. ह्यापेक्षा महत्वाचे प्रश्न तिच्या समोर उभे होते.

“having only centripetal force is not important Sarita; but both the forces are equal and opposite. That’s the reason why our Earth does not collide on the Sun. And this only is the solution to your problem.” बॉस तिच्या मनाचा अंदाज घेत बोलून गेला.

“what? ह्याचा इथे काय संबंध सर?” सरिताला नीटसं समजलं नव्हतं.

“आपलं अस्तित्व नात्यांमुळे आणि नात्यांसाठी असतं, आपली उत्पत्तीसुद्धा नात्यातूनच होत असते जशी पृथ्वीची सूर्यापासून झाली आहे, बिग बँग थेअरी माहिती आहे ना तुला? जसा सूर्य पृथ्वीला सतत आपल्याकडे खेचत असतो तशीच हि नातीदेखील आपल्याला खेचत असतात. ती ग्रॅव्हिटी असते, तिथे एक खास आकर्षण असतं. पण त्याचवेळी आपल्या महत्वाकांक्षा, आपली स्वप्न, आपलं करिअर हे centripetal force प्रमाणे काम करत असतं. ते आपल्याला आपली नाती-गोती विसरून फक्त पुढे जायला सांगत असतं. जर नात्यांचा जोर वाढला तर आपण सर्व सोडून घरी बसतो, आपल्या करिअरशी तडजोड करतो. असं खरंतर होऊ नये. मात्र जर आपल्या स्वप्नांचा, आपल्या महत्वाकांक्षेचा जोर वाढला तर नात्यांचे आकर्षण थिटे पडते आणि आपण आपल्या माणसांपासून दुरावतो, असंहि होऊ नये. याउलट, .” बॉस white-board एकटक पहात म्हणाला.

“पण सर दोन्ही कसं शक्य आहे? थोडंफार कमी जास्त होणारच, मग राजीवने समजून घ्यायला नको का? दोन्ही नाही होत बँलेन्स कधी-कधी?” सरिताने उद्विग्नतेने विचारलं.

बॉस खिन्नतेने हसला. “मलाही आधी असंच वाटायचं, घरच्यांनीच समजून घ्यायला हवं. शेवटी मी कोणासाठी करतो आहे? त्यांच्यासाठीच नं? पण, हे समजायला फार उशीर झाला सरिता की आपलं करियर, आपली स्वप्न आणि आपल्या महत्वाकांक्षा हे सगळं फक्त आपल्यासाठी असतं. स्वप्नांमागे पळणं आपल्यासाठी महत्वाचं असतं आणि घरच्यांसाठी महत्वाचे असतो ते फक्त आपण.. त्यांना आपल्या स्वप्नांशी काहीही देणं-घेणं नसतं. एक मात्र माझ्या अनुभवातून माझ्या लक्षात आलं, ग्रह- ताऱ्यांसारख्या निर्जीव वस्तूंना जे जमतं;  ते आपल्याला का जमू नये?” बॉसचे डोळे पाणावले होते. आवाज घोगरा झाला होता.

सरिता भांबावली. बॉस एकटा का राहतो या प्रश्नाचं उत्तर गेली ४ वर्ष तिला सापडलं नव्हतं. तिच्या ते आज लक्षात आलं होतं.. घर आणि करियर यात  बँलेन्स न करता आल्यामुळे त्याची पत्नी वेगळी झाली होती. त्याचं शल्य तिला बॉसच्या चेहऱ्यावर आज साफ दिसत होतं. ती नकळत उठून उभी राहिली. राजीव दूर गेला तर, या विचाराने तिला कापरं भरलं.

“पण सर, मला राजीव हवा आहे. तो माझ्यासाठी काय आहे ते त्यालाही माहिती आहे.” सरिताच्या आवाजात कंप होता.

“म्हणूनच राजीव तुला ओढतो आहे. तू दूर जाण्याची भीती जितकी वाढते आहे तितकाच राजीव तुला जवळ ओढण्यासाठी तडफडतो आहे. तुमच्यात जे वाद सुरु झालेत त्याचे हेच एकमेव कारण आहे. तेंव्हा, उशीर होण्याआधीच सावर, तुझा सूर्य तुला जर महत्वाचा वाटतो, तर तो खूप दूर निघून जाण्याआधी तुमच्या नात्यात समतोल कसा आणता येईल ते बघ.

पण हे ऐकण्याकरिता सरिता आता तिथे नव्हती. ती कधीच रूमच्या बाहेर पडली होती…. तिच्या सूर्याकडे झेपावली होती.

Avatar
About विनोद किशनराव राऊत 3 Articles
मानवी मन आणि त्याचे असंख्य पैलू हे माझे आवडीचे विषय असून त्याभोवती फिरणारं आयुष्य यावर मी मराठी ब्लॉग लिहितो. माझ्या ब्लॉगचे नाव वलयांकित.. शोध स्वतःचा! असे असून त्याची लिंक आहे https://www.valayankit.blog वाचकांनी थेट संपर्क करायला माझी हरकत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..