नवीन लेखन...

व्यक्त मी अव्यक्त मी

व्यक्त होणं समाजहितासाठी महत्वाचे सुनील जोशी यांचा “व्यक्त मी अव्यक्त मी” काव्यसंग्रह जीवनाच्या विविध पैलूच्या भावना समर्थपणे व्यक्त करणारा काव्यसंग्रह प्रा. सुनील जोशी पृ. 112 किं. 100 रू. ISBN : 978-93-80232-40-9 बालपणीच्या पहिल्या हुंकारापासून माणसाचं व्यक्त होणं सुरू होतं आणि आयुष्यात घडणार्‍या चांगल्या वाईट प्रसंगात प्रत्येक माणूस व्यक्तीपरत्वे व्यक्त होत असतो. नव्हे आयुष्यभर व्यक्त होण्याचा त्याला ध्यास लागलेला असतो. त्यामुळेच व्यक्त होणं हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण समजले जातं. अव्यक्त राहणं म्हणजे व्यक्त होण्याकडे कानाडोळा करणं. अव्यक्ततेची अनेक कारणं असू शकतात. पण व्यक्त होता येत असलं तरी अव्यक्त राहणं, जाणूनबुजून अव्यक्त राहणं हेच आपल्याला समाजात आजकाल बघायला मिळतं. अव्यक्तता ही बेफिकीरीतून किंवा संकोचातून निर्माण होता कामा नये. त्यामुळे अव्यक्तता झुगारून जमेल तसं व्यक्त होणं हेच समाजहिताच्या दृष्टीनं महत्वाचं असतं. असाच व्यक्त-अव्यक्ताच्या द्वद्वांचा प्रवास दर्शविणारा “व्यक्त मी अव्यक्त मी” हा श्री. सुनील विनायकराव जोशी यांचा कवितासंग्रह वाचनात आला. श्री. जोशी यांचा हा पहिला कवितासंग्रह नचिकेत प्रकाशन, नागपूरतर्फे नुकताच प्रकाशित झाला. कविता संग्रहात एकूण 55 कविता आहेत आणि या कवितांची श्रद्धा, राधा कृष्णार्पणमस्तु, वेदना-संवेदना, वऱ्हाडी झटका, गंध मोगर्‍याचा, मन माझं पाखरू आणि व्यक्त मी अव्यक्त मी अशा सात विभागात विभागणी करण्यात आलेली आहे. या सप्तरंगातून श्री. सुनील जोशी यांनी आपल्या अंतर्मनातल्या सुप्त भावना काव्यसंग्रहात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक विभागाच्या सुरूवातीला त्यांनी संक्षिप्त विवेचन केलं आहे. श्री. जोशी यांचा मुळ पिंड शिक्षकाचा. दृष्टिकोन तंत्र शिक्षणाचा आहे आणि त्याकरिता त्यांनी विज्ञानाची कास धरणं अपरिहार्य आहे. पण असं असलं तरी कवितेमधून व्यक्त होत असतांना त्यांनी ईश्वरनिष्ठा, प्रेयसभाव, सामाजिक जाणिवा, वऱ्हाडी मातीशी असलेलं नातं, नैसर्गिक गंध आणि आत्मशोधाच्या वाटेवर असलेलं अपुरेपण यांच्याशी फारकत घेतल्याचं कुठेही जाणवत नाही.

विज्ञाननिष्ठ असूनही ते तर्कट नाहीत. त्यांच्या कविता प्रज्ञाधिष्ठीत नाहीत. साध्या, सरळ, सोप्या शब्दात ते या कवितासंग्रहात व्यक्त होताना दिसतात आणि हेच या कवितासंग्रहाचं यश आहे. आपलं व्यक्त होणं समाजाला रूचेल की नाही ही भीड आणि संकोच सोडून श्री. सुनील जोशी यांनी आपलं व्यक्त होणं प्रकाशित केलं आहे आणि एका प्रकाशपर्वाची त्यांच्या आयुष्यात रूजुवात झाली आहे. हे त्यांच्या आत्मशोधाच्या वाटेवरच पहिलं पाऊल आहे. त्यांच्या काव्यप्रवासाचं आपण स्वागत करू या आणि त्यांच्या पाऊलवाटेचा महामार्ग होवो ही सदिच्छा देऊ या! उत्कटता हा प्रत्येक कवितेचा आत्मा असतो. उर्मी आल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो. उर्मीयुक्त कविता तरल भावना निर्माण करते आणि जातीवंत कविता ती समाधान देते. उर्मी निसर्गदत्त देणगी असते. श्री. सुनील जोशींचा कवितेत कवितेचा ॠशीा आहे. त्यांच्या भक्तीमार्गी कविता मनाला भावतात. राधा-कृष्णाचे नाते त्यांनी आपल्या कवितेत तन्मयतेने रंगविले आहे.

सामाजिक आशयाच्या आणि बोली भाषेतल्या कविता त्यांचा माणसाबद्दलचा अनुभव जसजसा वाढत जाईल तसतशा अधिक प्रगल्भ होत जातील. मुक्तछंदाचाही एक वेगळा छंद असतो. त्याचा अभ्यास श्री. जोशी यांनी केल्यास त्या प्रकारावर त्यांना पकड साधता येईल. त्यांच्या अनेक कविता प्रश्नार्थक वाटतात. रसिकांनी त्यांची आपापली उत्तरं शोधावित असं श्री. जोशी त्यांच्या कवितेतून सुचवतात. श्री. सुनील जोशी यांचे कवितेवर आत्यंतिक प्रेम आहे. त्या प्रेमापोटी त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांची शब्दसंपदा दिवसेंदिवस वृद्धींगत होवो आणि त्यांच्या जीवनानुभवाचे कवितेतून प्रकर्षाने चिंतन होवो हीच एकमेव अपेक्षा. कदाचित त्यातूनच त्यांना आत्मशोधाचा किनारा गवसेल. त्याकरिता त्यांना शुभेच्छा! एक अतिशय देखणा काव्यसंग्रह आणि त्याला साजेसे सुरेख मुखपृष्ठ असा सर्वांगसुंदर पहिलाच काव्यसंग्रह प्रकाशित केल्याबद्दल नचिकेत प्रकाशनाचे मन:पूर्वक अभिनंदन. आता यापुढे नचिकेत प्रकाशनाकडून उत्तम काव्य तसेच कथा संग्रहाची अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. मिलींद वि. देशपांडे व्यक्त मी अव्यक्त मी : प्रा. सुनील जोशी भ्र.: 9273807046 पाने : ११२, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..