(शांतता शिवी चालू आहे, हा एकपात्री प्रयोग पु. भा. भावे यांच्या “शांतता शिवी चालू आहे” या लेखावर आधारित आहे.)
(कुणीतरी वींगेतून धक्का मारल्यासारखा रंगमंचावर येतो आणि प्रेक्षकांना समोर पाहून बावरत म्हणतो)
नमस्कार मंडळींनो नमस्कार, कसं काय बरं आहे ना? काय आहे, पहिल्यांदा रंगमंचावर बोलण्यासाठी उभा राहील्याने मनाला थोडीशी धास्ती वाटून राहिली आहे. आजपर्यंत रंगमंचावर येण्याचा योगंच आला नाही हो. प्रेक्षकाच्या खूर्चीवर बसून कित्येक नाटक, सिनेमे पाहिली आहेत. पण आज मात्र राहवलं नाही. कारणंच तसं आहे. अरे देवा… बोलण्याच्या नादात मी स्वतःची ओळख करुन द्दायलाच विसरलो. स्वतःची ओळख करुन देण्याइतका मी काही मोठा वगैरे नाही हा, एरव्ही मी ट्रेनमध्ये चौथ्या सीटसाठी सुद्दा कधी कुणाशी भांडलेलो नाही. मी एक सर्वसामान्य रसिक आहे. पण आज मी माझी खंत घेऊन आलोय. नाटक, सिनेमा एकंदर कलाक्षेत्रात जो काही अश्लाघ्य प्रकार सुरु आहे ते पाहून माझ्यासारख्या रसिकाला फार वेदना होतात हो. कलेचा अपमान तो देवाचा अपमान असं मानणारी आमची जमात. पूर्वी नाटक कसं सुसंस्कृत असायचं. हळूवार वार्याची झुळूक आल्यावर मनास गुदगुल्या होतात तसे संवाद असायचे.
बायको(सुलोचना) – माझ्या वल्लभा. मी आपले नाव घेतले नाही हो. माझे दयित, माझे प्रियकर अशा विशेषणांच्या अर्थीच मी असे म्हणते हो वल्लभा. मग म्हणू ना वल्लभा म्हणून?
नवरा(वल्लभ) – म्हण हो माझ्या सुलोचने. पण मीही तुझे नाव ते आहे म्हणून सुलोचना म्हटले नाही हो. तुझ्या या मोहक नयनांची स्तुती विशेषणार्थी तसे म्हटले आहे, बरे का?
आहाहा.. काय ते शृंगारिक विनोदी गुदगुल्या करत अंगावर शहारे आणत हसवणारे संवाद. शृंगार आहे परंतु अश्लीलता कोठेही नाही. असे संवाद डर्टी पार्टी करणार्या पीढीला नाही कळणार हो. त्यांना “भाग भाग डीके भोस” सारखेच विनोद कळणार. काही लेखक तर आपल्या नाटकांमध्ये दळभद्री बिभत्स शिव्या हासडून मोठे झालेत. म्हणे वास्तववादी नाटके आम्ही लिहीतो. वास्तवात शिव्या असतात म्ह्णून त्याचा संहीतेत उपयोग करु नये. काही अपवाद असल्यास हरकत नाही. पण ते अपवादच असावेत. काही वर्षांपूर्वी चुंबन दृश्ये पडद्दावर दाखवावेत की नाही, हा वाद होता. आता सर्रास दाखवले जातात. प्रणयदृश्येही दाखवतात. उद्दा शौच, बलात्कार नि संभोग जसेच्या तसे दाखवले तर संकोच वाटून घेऊ नका, बरे का. शिरवाडकर, शांताराम यांचे शिव्यांपासून आणि चुंबनापासून कधीच काही अडले नाही. अहो, शिव्या नि नागवेपणा हे काही कलेचे अंग नव्हे. ते बेअकलेचे अंग आहेत. चुंबनांचे देखावे पडद्दावर पाहिले की तिटकारा वाटतो. अहो कुणाच्याही तोडांत तोंड घालायला कसे तयार होतात हे? आणि ह्यांच्या आईवडीलांनाही काही वावगे वाटू नये? आधूनिकीकरण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण मागासलेले कधी झालो हे आपल्यालाच कळले नाही. प्राचीन माणसाने कपड्यांचा शोध लावला व कपडे घालायला सुरुवात केली ह्याला प्रगती म्हणतात. पण कलेच्या नावाखाली कपडे काढणे ही प्रगती नव्हे अधोगतीच आहे. मी काही मागासलेल्या विचारांचा नाही. हे विज्ञानयुग आहे. आज जग वेगाने धावतंय त्या सोबत आपणही धावलंच पाहिजे. पण पैशांसाठी स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे उडवणे म्हणजे प्रगत होणे असेल तर आम्ही मागासलेलेच बरे. मला सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे जनता कसं काय हे सारं सहन करते. कदाचित जनतेलाही अश्लाघ्यपणाची नशा चढली असावी. पण ज्या दिवशी जनतेची नशा उतरेल त्या दिवशी ह्या कलेच्या दलालांना टींब टींब झाकण्यासाठीही कपडे मिळणार नाही. असो… मल्टीप्लेक्सच्या युगात माझ्यासारख्या सुज्ञ पण सर्वसामान्य रसिकाच्या मताला काही किंमत असेल असे वाटत नाही. बोलण्याच्या झींगेत बरेच काही बोलून गेलो. काही चुकले असेल तर क्षमा असावी. पण तुमच्यात जर खरा कलाकार, रसिक जिवंत असेल तर माझ्या बोलण्यावर विचार करावा. हे जर आपण इथेच नाही थांबवलं तर भविष्यातल्या नाटकांची नावे असतील, “शांतता, शिवी चालू आहे.”
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
ईमेल : smartboy.mestry5@gmail.com
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply