आज शैलेंद्रला जाऊन पन्नास वर्षं झाली. त्याच्या जीवनाच्या शोकांतिकेवर आतापर्यंत अनेकदा लिहिलं गेलयं. त्याचा शोकात्म शेवट आठवला की मन हमखास खिन्न होतं. म्हणून ठरवलं की आज त्याच्या फक्त आनंददायी आठवणींची उजळणी करायची आणि मस्त गाणी ऐकायची !! आणि मग जाणवलं की एक tragic end सोडला तर त्याचा सगळा कलाप्रवास म्हणजे एक “सुहाना सफर”* आहे.
मग मी गेलो या सफरीवर ….
मधुमती पासूनच सुरुवात केली :
मधुमतीमधलं, टूटे हुए ख्वाबोंने हमको ये सिखाया है हे काळजाला हात घालणारं गाणं त्यानं अवघ्या दहा मिनीटांत लिहिलं होतं आणि नंतर ते मधुमतीचं एक हायलाईटच बनून गेलं .
त्याच्या बंगल्याशेजारी हेमंतकुमारला चित्रपट दुनियेत सगळेजण, ”राजा ‘साली’वाहन” असं म्हणायचे. कारण त्याच्या चार अविवाहित मेव्हण्या ( हिंदीत : साल्या) काही दिवस त्याच्या बंगल्यावर राहत असत. एके रात्री शैलेंद्र स्वतःच्या बंगल्याच्या गेटपाशी अडखळून पडला. त्याने मद्यपान केले होते . तो पडलेला पाहताच शेजारी गच्चीत उभ्या असलेल्या हेमंतकुमारच्या मेव्हण्या जोरात हसल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेंद्रनं गाणं लिहिलं :
जंगलमें मोर नाचा किसीने न देखा
हम जो थोडीसी पीके जरा झूमें…
रंगोली चित्रपट चालू असताना त्याचं आणि शंकर-जयकिशन यांचं थोडं भांडण झालं. हे तात्पुरतं भांडण रसिकांसाठी बरंच फायदेशीर ठरलं, कारण शैलेंद्र लिहिता झाला :
छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते है, तुम कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल .
बूट पॉलिशच्या एका सिच्युएशनवर, शैलेंद्र विचार करत, सोफ्यावर बसला होता. घरात काही पाहुणे आले होते.
तेवढ्यात त्याचा दोन वर्षांचा मुलगा, अर्धवट खाल्लेला लाडू, इवल्याश्या मुठीत धरून त्याच्या समोर आला आणि पाहुण्यांना पाहून सोफ्याच्या मागे लपला. तेव्हा पाहुण्यांनी त्याला विचारलं , ‘बाळा, तुझ्या मुठीत काय आहे ?’
हे ऐकताच शैलेंद्रच्या लेखणीतून शब्द प्रकटले,
“नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमें क्या है
मुठ्ठीमें है तकदीर हमारी
हमने किस्मतको बसमें किया है”
कधी नव्हे तो एकदा ‘राज कपूर’ बरोबर वादविवाद झाला . शैलेंद्रनं लगेच आव्हान दिलं,
” हम भी है तुम भी हो दोनो है आमने सामने*”
( नंतरची ओळ मात्र चित्रपटाच्या प्रसंगाला साजेशी) .
आवारा ची कथा ऐकायला ‘राज’ त्याला, के ए अब्बास यांच्याकडे घेऊन गेला . अब्बास म्हणजे त्या काळातलं बडं प्रस्थं ! शैलेंद्र अगदीच नवखा ! अब्बासनी शैलेंद्रकडे बघितलं सुद्धा नाही. सलग दोन तास ते कथा ‘सुनवत’ राहिले. शेवटी राजने शैलेंद्रला विचारलं “क्यों कवीराज, कुछ समझमें आया?”
शैलेंद्र खाडकन म्हणाला ,
“गर्दीशमें था, आसमान का तारा था, आवारा था”
त्या दोघांनी चमकून शैलेंद्रकडे पाहिलं . या शब्दांनी फक्त टायटल साँग तयार झालं असं नाही तर चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचं स्वरूपही ठरुन गेलं.
पुढे हे गाणं रशियात सुद्धा इतकं लोकप्रिय झालं की तिथल्या ‘कँसर वॉर्ड’ या सुप्रसिद्ध कादंबरीदेखील या गाण्याचा उल्लेख आला.
” आवारा” नंतरच्या चित्रपटांत, राज कपूरच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करणारी बहुतेक सगळी गाणी शैलेंद्रनं लिहीली : मेरा जुता है जापानी, ‘होटोंपे सच्चाई रहती है’, ‘ मेरा नाम राजू घराना अनाम’ इ. मुकेश हा राज कपूरचा ‘प्रकट’ आवाज होता तर शैलेंद्र हा ‘आतला’ आवाज !
एकदा शैलेंद्र आणि जयकिशन रस्त्यावर फिरत होते आणि समोरून एक अप्रतिम सौंदर्यवती येताना दिसली. ‘ती पाहताच बाला कलीजा खलास झाला’ अशी अवस्था जयकिशन यांची झाली. ते तिच्याकडे वळून वळून पाहत असताना, शैलेंद्र मागून उद्गारला :
‘मुडमुडके न देख मुडमुडके
शैलेंद्रच्या अशा ‘सुखद स्मृतींनी’ मनात दाटी केली. मग, “घायल मनका पागल पंछी उडनेको बेकरार’ मधील असह्य वेदना कुठल्या कुठे उडून गेली . “शैलेंद्र” म्हटलं की मनावर दाटून येणारी काजळी विरून गेली.
ताजंतवानं होऊन उठलो. “अनाडी”ची रेकॉर्ड काढली आणि लावली ,
के मरके भी किसीको याद आयेंगे
किसीकी आसूओंमें मुस्कुराएंगे
कहेगा फूल हर कलीसें बार बार
जीना इसीका नाम हैं
धनंजय कुरणे , कोल्हापूर
9325290079)
14.12.2016
Leave a Reply