नवीन लेखन...

श्रद्धा, संपत्ती आणि आपत्ती

 
पद्मनाभस्वामी मंदिरातील अमाप संपत्तीचे काय करावे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. मूळात मंदिराच्या संपत्तीचे विश्वस्त मंडळ नीट जतन करू शकत नाही, त्यामुळे सरकारने या मंदिराचा कारभार ताब्यात घ्यावा, या जनहित याचिकेनंतरच सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या तळघरातील दालने उघडण्याचा आदेश दिला होता. आता सरकारच्या हाती हे घबाड लागलेच

आहे तर अशा इतर अनेक घबाडांचा शोध घेऊन सरकारने आपल्या देशाचे दारिद्र्य काही प्रमाणात तरी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा.

आपल्याकडे देवस्थानांच्या श्रीमंतीची चर्चा अगदी रंगवून रंगवून केली जाते. कोणता देव किती श्रीमंत आहे, कोणत्या देवाला किती कोटी मिळाले, अशा प्रकारच्या चर्चेत लोकांना रस असतो. त्यामुळेच भक्ताने एखाद्या देवाला चांदीचा मुकूट दिला, सोन्याचा हार दिला किंवा रत्नजडीत सिंहासन दिले, अशा प्रकारच्या बातम्यांना ठळक प्रसिद्धी मिळते. त्यातही शिर्डी आणि तिरूपती या दोन देवस्थानांमध्ये श्रीमंतीची स्पर्धा लागल्यासारखे या देवस्थानांच्या संपत्तीचे आकडे वेळोवेळी जाहीर होत असतात. लालबागचा राजादेखील गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोट्यावधीची उलाढाल करीत असतो. मुंबईतील प्रभादेवीचे सिद्धी विनायक मंदिरही मधे मधे गाजत असतेच. देवस्थानांच्या श्रीमंतीची आपल्याकडे जेव्हा चर्चा होते तेव्हा शिर्डी आणि तिरूपती या दोन देवस्थानांचाच प्रामुख्याने उल्लेख होतो; परंतु आता ही श्रीमंत देवस्थानेही गरीब वाटावीत इतकी प्रचंड संपत्ती देशाच्या अगदी दक्षिण टोकावर असलेल्या केरळातील पद्मनाभस्वामी मंदिरात आढळून आली आहे. या देवस्थानाच्या गुप्त कक्षांमध्ये आजवर बंदिस्त असलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू झाली असून पहिल्या दोन कक्षातच सहा लाख कोटींपेक्षा (6,00,000,0000000/- 6 वर बारा शुन्ये) अधिक संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही संपत्ती अतिप्रचंड अशीच म्हणावी लागेल. अद्याप पूर्ण संपत्तीची मोजणी झालेली नाही, ती झाल्यावर कदाचित हा आकडा 25 लाख कोटीपर्यंत जाऊ शकतो. आपल्या देशाचे वार्षिक अंदाजपत्रकच बारा लाख कोटींचे आहे, (12,00,000,0000000/- 12 वर 12 शुन्ये) हे लक्षात घेता केवळ एका मंदिराच्या तळघरात सापडलेल्या या संपत्तीची विशालता स्पष्ट होऊ शकते. आज आपल्या देशावर 15 लाख कोटींचे कर्ज आहे. भारतातील केवळ एक मंदिर हे कर्ज पूर्ण फेडू शकते, यावरून पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघ होता, असे
े म्हटले जायचे ते योग्यच होते, असे समजायला हरकत नाही. पद्मनाभस्वामी मंदिरात ही संपत्ती दीडशे वर्षांपासून पडून आहे. या खजिन्यात सोने, चांदी, ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपोलियन बोनापार्टच्या काळातील दुर्मिळ अशी नाणी, ब्रट्ठाट्ठादेश, श्रीलंका येथील मौल्यवान हिरे असा बराच ऐवज आहे. खरे तर यातील अनेक जिनसांची खरी किंमत त्या त्या विषयातील तज्ञच सांगू शकतील. याचा अर्थ दीडशे वर्षांपासून आपल्याकडे इतकी संपत्ती कुजत असताना आपण जगभर कर्जाची भीक मागत फिरत होतो. सोन्याचा कटोरा हाती घेऊन भीक मागण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. यावरून एक बाब स्पष्ट होते की भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. इथल्या 70 टक्के लोकांचे दैनिक उत्पन्न बिसलेरीची बाटली विकत घेण्याइतपत म्हणजे 20/- रु. सुद्धा नाही आणि इथल्या केवळ एका मंदिरात जागतिक बँकेलाही कर्ज देण्याइतपत संपत्ती नुसती पडून आहे. देशातील इतर बड्या देवस्थानांमध्येही अशीच प्रचंड संपत्ती आहे. या देशात देवाच्या, धर्माच्या अगदी बुवा-बाबाच्या नावावरदेखील प्रचंड पैसा गोळा होऊ शकतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. सत्यसाईबाबांच्या यजुर मंदिरात प्रचंड संपत्ती सापडल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. सत्य साईबाबांची एकूण संपत्ती किती आहे याचा हिशेब अजूनही लागलेला नाही. त्यांच्या खासगी कक्षात करोडो रूपये रोख स्वरूपात आढळून आले होते. इतरही अनेक धार्मिक-अध्यात्मिक बुवा-बाबांकडे अशीच कोट्यावधीची संपत्ती आहे. आपल्याकडचे आसाराम बापू, सुधांशु महाराज वगैरेंसारखे अनेक महाराज “फाईव्ह स्टार” जीवन जगताना दिसतात. एकेका प्रवचनासाठी लाखोंची देणगी हे महाराज मागत असतात आणि वर्ष-वर्ष त्यांच्या तारखा मिळत नाहीत, यावरून त्यांची एकूण आवक स्पष्ट व्हावी. आपल्याकडे सध्या विदेशातील काळा पैसा देशात आणण्याचा मुद्दा जोरात आहे. तो पैसा येईल ते
्हा येईल, किंवा कदाचित येणारही नाही; परंतु सध्या आपल्याकडील मंदिरात कुजत पडलेल्या ह्या अमाप संपत्तीचा विनियोग तरी व्हायला नको का? एकीकडे दोन-पाच हजाराच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि दुसरीकडे केवळ एका मंदिरात लाखो कोटींचा खजिना कुलूपबंद अवस्थेत गेल्या दिडशे वर्षांपासून पडला आहे, हे चित्र किती दुर्दैवी म्हणायला हवे. देवाच्या, धर्माच्या नावावर जमा झालेल्या पैशाचा विनियोग कसा केला जातो, सरकार नियुक्त विश्वस्त मंडळ त्या पैशाची कशी वाट लावते, हे शिर्डी येथील सरकारी विश्वस्त श्रीमती लेखा पाठक ह्यांनी केलेल्या घोटाळ्यावरुन उघड झालेच आहे. शेगावसारखी काही अपवादात्मक उदाहरणे वगळली तर कुठेही या देवस्थानाच्या खर्चात पारदर्शकता दिसून येत नाही. मिळकत किती खर्च किती आणि तो कशावर याचा कोणताही ताळेबंद नसतो. धर्म आणि श्रद्धा या लोकांच्या वैयिक्तक बाबी असतात. लोकांनी श्रद्धावान असायला कुणाची हरकत असण्याचे कारण नाही; परंतु ही श्रद्धा डोळस असली पाहिजे. देवाच्या नावावर आपण आपल्या कष्टाचा पैसा दान करीत असू तर ते दान सत्पात्रीच असायला हवे, त्या पैशाचा सदुपयोगच व्हायला हवा, तसा तो होतो किंवा नाही हे लोकांनी पाहायला हवे. भाविकांच्या दानातून उभी झालेली आणि देशभरातील मंदिरात साठून असलेली प्रचंड संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय राहत आला आहे. ही एकूण संपत्ती भारत सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षाही खूप मोठी आहे; परंतु सरकारचा त्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही. मूठभर विश्वस्तांच्या हातात ही संपत्ती एकवटली आहे आणि आपल्या मनाप्रमाणे ते या संपत्तीचा विनियोग करीत असतात. बरेचदा तर ही संपत्ती केवळ देवस्थानच्या तिजोरीत पडून राहते. पद्मनाभस्वामी मंदिरात पडून असलेली

प्रचंड संपत्ती प्रत्यक्ष चलनात आली असती तर भारताला विदेशातून र्ज घेण्याची गर
जच उरली नसती. आता उडपी मंदिरातील खजिन्याचीही चर्चा रंगत आहे. सोरटी सोमनाथचे मंदिर मुसलमानांनी लुटून नेले होते, इतरही मंदिरे व खजिने इंग्रजांनी लुटून नेली त्यावरुन ह्या कुजत पडलेल्या संपत्तीच्या भव्यतेची कल्पना यावी. उलट ही संपत्ती विदेशी बँकांमध्ये ठेवून त्याच्या व्याजावर अनेक जनपयोगी योजना राबवित्या आल्या असत्या. पाणी प्रवाही असेल तरच ते स्वच्छ राहते, नितळ राहते आणि त्याच्या साठ्यात वाढ होत जाते, शिवाय ते एकाचवेळी अनेकांच्या उपयोगी पडते. संपत्तीच्या बाबतीत हेच म्हणता येईल. ती कुठेतरी पडून राहण्यापेक्षा चलनात राहिली तर तिच्यात वाढ तर होईलच, शिवाय एकाचवेळी अनेकांच्या उपयोगात ती पडू शकते. या संदर्भात एक साधे उदाहरण देता येईल, एखाद्या व्यक्तीला एका आठवड्यासाठी विदेशात जायचे असेल आणि त्याने आपली गाडी आठवडाभरासाठी विमानतळावर पार्क केली असेल तर त्या गाडीचा एक आठवडा कोणताच वापर होणार नाही, त्याऐवजी त्याने ती गाडी सहा दिवसांसाठी कुणाला तरी भाड्याने दिली तर त्याला त्यातून पैसेही मिळतील आणि गाडीचीदेखील देखभाल होईल. सहा दिवसासाठी ही गाडी घेणार्‍याला दुसर्‍या कोणत्या तातडीच्या कामाने चार दिवसासाठी विमानाने दुसरीकडे जायचे असेल तर तीच गाडी त्याने तीन दिवसासाठी तिसर्‍या एखाद्याला भाड्याने द्यावी. या सगळ्या प्रकारात आपल्याला एकूण तीन गाड्या वापरात असल्याचे दिसून येईल; परंतु प्रत्यक्षात एकच गाडी तीन लोकांनी हाताळलेली असते. पैशाचेही तसेच आहे, तो हस्ते-परहस्ते खेळता राहिला पाहिजे. इथे गाडीचा मालक एकटा असला तरी तीन लोकांनी ती वापरली, विदेशात असेच होत असते. तिथे रोख स्वरूपात फारसे व्यवहार होतच नाही. प्लॅस्टिक करन्सीद्वारे परस्परच अनेक व्यवहार होतात. पैसा तितकाच असतो, परंतु तो फिरता राहिल्याने एकाचवेळी अनेकांची क मे होतात. आपल्याकडेद
ेखील तसे व्हायला हरकत नाही. सरकारने देशभरातील मंदिरांमध्ये जमा असलेली सगळी संपत्ती ताब्यात घ्यावी आणि चलनात आणावी. ही संपत्ती चलनात आली, प्रवाहात आली तर केवळ पैशाअभावी रेंगाळलेले नद्या जोड प्रकल्प किंवा सौर उर्जेचे अनेक प्रश्न सहज सुटू शकतील. त्यात सिंचन, आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील प्रश्नांचाही समावेश आहे. सरकारने त्यादृष्टीने विचार करायला हवा. भारतातील काही निवडक बड्या मंदिरांचे, संस्थानांचे राष्ट्रीयीकरण सरकारने करायला हवे. या मंदिरातील संपत्तीवर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा नव्हे तर राष्ट्राचा अधिकार आहे. त्यामुळे त्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाला नव्हे तर राष्ट्राला पर्यायाने सरकारला असायला हवा. पद्मनाभस्वामी मंदिरातील या अमाप संपत्तीचे काय करावे, असा प्रश्न आता सरकारला पडला आहे. मूळात मंदिराच्या संपत्तीचे विश्वस्त मंडळ नीट जतन करू शकत नाही, त्यामुळे सरकारने या मंदिराचा कारभार ताब्यात घ्यावा, या जनहित याचिकेनंतरच सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या तळघरातील दालने उघडण्याचा आदेश दिला होता. आता सरकारच्या हाती हे घबाड लागलेच आहे तर अशा इतर अनेक घबाडांचा शोध घेऊन सरकारने आपल्या देशाचे दारिद्र्य काही प्रमाणात तरी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र, सरकारच मुळात राष्ट्रीय चरित्र्याचे व स्वच्छ हवे तरच हे करण्यात हशील अन्यथा “तेल गेले तुप गेले हाती आले धुपाटणे” अशी गत व्हायची.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..