श्रावणात जलधारा बरसत असताना सूर्य नारायण मात्र ढगांच्या आड रुसून बसतो. बाहेर ही अवस्था तर शरीरातील सूर्य नारायण म्हणजेच उदरस्थ पाचकाग्नी ही थोडा मंदच असतो, तो जड पदार्थ पचवण्यास समर्थ नसतो आणि तरीही असा आहार घडलाच तर मात्र अजीर्ण,अतिसार,ताप याला पर्याय नाही. जवळपास सर्वच जण याचा अनुभव घेतात.(म्हणूनच वैद्य वर्गात या महिन्यास सिझन असं म्हणतात. ) या मुळेच एका दगडात दोन पक्षी मारावेत तसे आध्यात्म व आरोग्य दोन्ही सांभाळायला उपवासाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे.
या काळात पाचकाग्नी ला विश्रांती ची गरज असते,पण आपण खरंच ती अपेक्षित विश्रांती देतो का? की कामात बदल म्हणजे विश्रांती तसं खाण्यात बदल म्हणजे उपवास असं करतो? त्या दिवशीची खिचडी,साबुदाण्याचे वडे असे पदार्थ आठवले की याचे उत्तर मिळेल. मग अशा पदार्था ऐवजी गरम पाणी, एखादे फळ खाऊन केलेला उपवास निश्चितच लाभदायक.
दिवसभराच्या उपवासाचं जाऊदे पण उपवास सोडताना तर श्रीखंड, पुरी,जिलेबी सारखे पदार्थ तर आपण घेतोच आणि ते सुद्धा दिवसभराचा उपवास भरून निघेल असं भरपेट. हे म्हणजे 2-3 महिने विश्रांती घेतलेल्या खेळाडूस थेट ऑलिंपिक च्या मैदानावर उतरवल्या सारखे. ज्याप्रमाणे असा खेळाडू मोठे आव्हान पेलू शकत नाही तसाच दिवसभर विश्रांतीने थोडा मंदावलेला अग्नी ही पंच- पक्वान्नानी सजलेला जड आहार पचवू शकत नाही. याबद्दल चुलीचं उदाहरण बघू. चुलीमधे बराचवेळ काही सरपण घातलं नाही तर आग विझते, मग पुन्हा पेटवताना आपण कागदाचे कपटे, काटक्या वगैरे टाकून आग पेटवतो व मग मोठ-मोठी लाकडे टाकली तरी ती सहज स्वाहा होतात. तसचं उपवास सोडतानाही मंदाग्नीचा विचार करून हलके, ताजे जेवण (उदा. गरम भात, तूप, वरण ) असा आहार घेतल्यास आहार पचतो, पाचकाग्नी वाढतो व आपण दुसर्या दिवसांपासून जो काही आहार घेऊ तो पचवण्यास सक्षम ही होतो.जर उपवासा मागची ही आयुर्वेदिक अग्नी संकल्पना समजून घेऊन उपवास केला तर आध्यात्म व आरोग्य दोन्ही ही हेतू साध्य होतील व आनंदाने म्हणता येईल
– “श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहिकडे॥
क्षणात येई सरसर शिरवे,
क्षणात फिरूनी उन पडे ॥
— वैद्य प्रसाद सणगर,
कोल्हापूर
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
Leave a Reply