खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्लारी, मल्लारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे.
<>
श्रीक्षेत्र माळेगावचा खंडोबा म्हणजे लोकांचा देव. माळेगांवचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा आहे, मराठवाडय़ाची ही सर्वात मोठी ग्रामदेवता आहे.म्हणूनच खरीपाची कापणी झाली की शेतकरी आणि कष्टकर्यांना वेध लागतात ते माळेगावच्या यात्रेचे…नांदेड ते लातूर मार्गावर असलेल्या माळेगावला लातूर आणि परभणी जिल्ह्यंाच्या सीमा लागूनच आहेत. माळावर वसलेल्या या गावात प्रवेश करताच खंडोबाच्या मंदिराच्या परिसरातील भव्य कमान नजरेस पडते. कमानीच्या उजव्या हातास मंदिराची इमारत आहे. मंदिराचे बांधकाम साधारण सतराव्या शतकातील आहे. माळेगाव काही काळ बहामनी तर काही काळ निजाम राजवटीखाली होते. निजामी राजवटीत मंदिराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्यांचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद यांच्याकडे होती. मंदिराभोवती मोठे आवार आहे. मंदिराच्या दगडी महाद्वाराला लागून छोटा बुरुज आहे. प्रवेशद्वारापर्यंत मोठा सभामंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी एका दगडी ओटय़ावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. हे मुखवटे खंडोबाभिमुख आहेत. येथून खंडोबा व म्हाळसेचे दर्शन होते. मुख्य मंदिर हेमाडपंती बांधणुकीचे असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस एका हाती गदा व दुसर्या हातात डमरु धारण केलेल्या द्वारपालाचे कोरीव शिल्प आहे. गाभार्यात एका आयाताकृती उंच दगडी ओटय़ावर स्वयंभू वेदी असून त्यावरील चौरंगावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. या मुखवटय़ासमोर एक तांदळा आहे. प्राचीन काळी बिदर येथील व्यापार्याने या तांदळ्याची प्रतिष्ठापना केली असल्याचे प्रचलित आहे. मुख्यव्दारापाशी व्दारपालाच्या जागी विष्णूची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. १८ व्या शतकाती
हा िलालेख मराठी भाषेत आहे. माळेगाव यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते.पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते. माळेगावची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष (कृ.) महिन्याच्या १४ व्या दिवशी भरवली जाते.निजाम राजवटीमध्ये देखील ही यात्रा भरवली जात असे. त्या काळात निजामाकडे या यात्रेचे व्यवस्थापन होते.माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी अशी यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान लोककला आणि मल्लांना प्रोत्साहन मिळावे म्हणून तमाशा कलामहोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात येत असतात. ही यात्रा उत्कृष्ठ प्रतीच्या पशुधनाच्या व्यापारासाठी देशात प्रसिध्द आहे. नांदेडचे स्थानिक लाल कंधारी वळूदेखील येथील पशुप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असते. येथील घोडय़ांचा व्यापार विशेष प्रसिध्द आहे. यात्रेचे महत्त्व लक्षात घेता शासनातर्फे यात्रेकरूंसाठी विविध सुविधा याठिकाणी करण्यात आल्या आहेत. जनप्रबोधन करणारे विविध विभागांचे प्रदर्शन स्टॉल्स हा देखील यात्रेच्या नव्या परंपरेचा एक भागच आहेत.यात्रेच्या वेळी भरविली जाणारी जातपंचायत हे या यात्रेचे खास वैशिष्टय आहे. या पंचायतीचे निर्णय संबंधितांकडून मान्य केले जातात. अत्यंत सोप्या पध्दतीने या पंचायतीसमोर भटक्या समाजातील अनेकांच्या समस्या मांडण्यात येतात व त्यावर निर्णय होतो. गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, नंदीवाले, पांगूळ, वासुदेव, वैदू आदी जातींची पंचायत सभा या ठिकाणी भरते. अनेक अभ्यासकांसाठी हा आकर्षणाचा विषय आहे.यात्रेतील बाजारही पर्यटकांचे आकर्षण आहे. मुर्त्या, छायाचित्रे, लाकडी खेळणी, कोसल्याचा पटका, शेला, पागोटं, जाड धोतर, घोंगडे, घोडय़ाचा साज, इतर प्राण्यासाठी लागणारं म्होरकी, कासरा, गोंडे, घुंगरू, घागर माळा, तोडे, वेसण, खोबळे यासारख्या अ
ेक वस्तूंनी ही बाजारपेठ फुलते. विविधरंगी वस्तूंबरोबरच विविधरंगी संस्कृतीचे दर्शनही या यात्रेत घडते. अनेकांना एकतेच्या सुत्रात गुंफणार्या यात्रा आणि देवस्थानाच्या ठिकाणी राज्याच्या एकात्मिक संस्कृतीचा महोत्सव अनुभवता येतो. यावर्षीदेखील २ ते ६ जानेवारी दरम्यान ही यात्रा होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या यात्रेत मोठय़ा प्रमाणात भरविण्यात येणार्या कृषि प्रदर्शनाचे नवे आकर्षण राहणार आहे. यात्रेकरूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष आरोग्य पथक ठेवण्यात आले आहे. ‘येळकोटच्या’ गजरात यात्रेला सुरुवात झाली आहे. भाविकांच्या वाढत्या उत्साहाला लोककला महोत्सव आणि कुस्त्यांच्या फडाचे वेळी निश्चितपणे उधाण येईल. लोककला आणि लोकसंस्कृतीचे अद्भूत दर्शन या यात्रेच्या निमित्ताने घडणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक खेळ, जनावरांचा बाजार, ग्रामीण लोकसंस्कृती अशा विविध अंगाने सजलेली ही यात्रा लोकजीवनाचा अध्याय पर्यटक आणि अभ्यासकांसमोर मांडणारी अशीच आहे.
`महान्युज’ च्या सौजन्याने
— डॉ. किरण मोघे
Leave a Reply