नवीन लेखन...

श्री दत्तसंप्रदाय – विविध पंथ आणि परंपरा

श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपराही मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत.

श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे.

निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे.

दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच दत्त संप्रदायाची भूमिका मांडण्यात आली आहे.

श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.

श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश

कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी

हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो. कारंजा (लाड) जि. अकोला या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते.

गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे – त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..