नवीन लेखन...

‘श्रेयसी प्रजा’ काळाची गरज !

सन २००८ ऑगस्ट मध्ये घडलेल्या ‘निकिता मेहता’ घटनेचा मागोवा घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रपंच.

ह्या केसमध्ये गर्भपात विषयक वादात कायद्याला डावलून निसर्गानेच पूर्णविराम दिला. परंतु त्यातील मूळ प्रश्न मात्र कायमच राहिला. जगातील विविध देशांमध्ये हा विषय निरनिराळ्या रूपात चर्चिला जातो. ह्याच अनुषंगाने निकिता मेहता सारख्या केसेसमध्ये पुढे जन्मभर वादविवाद नको म्हणून गर्भपातासारख्या विषयावर जनता संवेदनशील होते.

व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असल्यामुळे माझ्या वीस वर्षाच्या अनुभवांवरून मला असे वाटते की, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस असले पाहिजे. प्रेम, विवाह, मातृत्व, घटस्फोट आणि गर्भनिरोध ह्यांसारखे निर्णय अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे असून त्यामधे इतरांनी ढवळाढवळ करू नये. धर्माचा उपसर्ग तर त्यास आजिबात येऊ देऊ नये. वैज्ञानिक प्रगतीचे उद्दिष्ट आणि उपयोग दोन्ही केवळ मानवी-जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने असावे. त्याचप्रमाणे आपल्या खाजगी जीवनात कोणी कोणता निर्णय घ्यावा ह्या बाबतीत किमान कायद्याचा किंवा सरकारचा हस्तक्षेप असू नये. सुख हेच जीवनाचे अंतिम सत्य असल्यास दु:खदायक श्रद्धा अनैतिक ठरू शकते.

स्वत:चे सुख अधिक महत्वाचे की, नव्याने या जगात प्रवेश करणारा जीव?  ह्या जीवाचे आगमन झाल्यावर त्याला जन्मभर दु:खच भोगावे लागणार असल्यास त्याला जन्म देण्याचे प्रयोजन तरी काय? नवा जीव जन्माला घालणे हीच मानवी जीवनाची सार्थकता समजणे कितपत योग्य आहे? नव्याने ह्या जगात येणाऱ्या जीवाला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभावे ही अपेक्षा आई-वडिलांसाठी अवास्तव म्हणता येईल का?

निकिता मेहताचे गर्भपात प्रकरण कोर्टाने फेटाळले आणि काही दिवसांतच निकिताचे बाळ पोटातच गेले, जन्मण्याआधीच नाहीसे झाले. ह्या संदर्भातले कायदे आज काही नव्याने झालेले नाहीत. प्रश्न आहे तो केवळ लोकांच्या भावनेपोटी असे कायदे बदलावेत का? पूर्ण आरोग्यमय असलेले बाळ आपल्या पोटी जन्माला यावे अशी प्रत्येक मातेची स्वाभाविक अपेक्षा असते. त्यात काहीही चूक नाही पण दुर्दैवाने काही व्यंग असलेले, मतिमंद बाळ जन्माला येणार हे आधी कळले तर कोणतीही आई त्याला जन्माला घालण्यास स्वेच्छेने तयार होणार नाही. सामाजिक दडपणाखाली असे मूल जन्माला घालणे ही गोष्ट वेगळी. अशा वेळी समाज किंवा इतर नातेवाईक फक्त सल्ले देण्याचे काम बजावत असतात. यापेक्षा अधिक अपेक्षा त्यांच्याकडून न केलेलीच बरी. अशा वेळी कायद्याचा आधार घेऊन गर्भपात करणे योग्य राहील असे माझे व्यक्तिगत मत आहे. इतरांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आत्म्याचे अमरत्व वर्णन करणे व आपल्या घरातील प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यावर आत्म्याच्या अमरत्वाचे भान विसरणे ही तर नेहमीचीच बाब !

ह्या जगात कितीतरी अनैतिक गोष्टी चालतात. मुलामधे जन्मजात दोष, शारीरिक अथवा मानसिक दोष खूप जिकीरीचे आहे. आपला समाज अशा मुलांबाबत प्रगल्भ नाही. आपल्यानंतर आपल्या बाळाची काळजी घेणारा कोण ही चिंता अशा मुलांच्या पालकांना नेहमीच असते. काही मुले स्वबळावर जीवनाला आकार देतात. पण त्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे कौटुंबिक, सामाजिक वातावरण सक्षम असावे लागते. न्याय देऊन न्यायालयाचे काम संपुष्टात येते. पण त्या कुटुंबाला खूप मोठ्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागते. ह्या बाबतीत आयुर्वेदातील ‘श्रेयसी प्रजेचा’ मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो. त्याचा उहापोह नक्कीच व्हायला हवा. म्हणून हा लेख प्रपंच.

मार्गाधारे वर्तावे विश्व हि मोहरे लावावे !

या भावार्थ दीपिकेतील वचनाप्रमाणे आप्तस्वकीयांनाही त्याच मार्गाने जाण्यास प्रवृत्त करावे. गरज निर्माण झाली की शोधाशोध किंवा संशोधन सुरु होते. म्हटलेच आहे की, ‘गरज ही शोधची जननी आहे.’ प्रचंड महागाईच्या काळात अनेक अपत्यांना जन्म देण्यापेक्षा ‘एक किंवा दोन अपत्येच पुरेत’ असा बहुतेकांचा निर्णय असतो. म्हणून होणारी संतती सदगुणी, सुंदर, दीर्घायु, बुद्धिमान, आरोग्यसंपन्न व व्यंगरहित असावी. ‘श्रेयसी प्रजेचे’ वर्णन करताना महर्षी चक्रपाणी म्हणतात.

श्रेयसी प्रजा इच्छतो इति अत्र श्रेयसी प्रजा

गुणवान पुत्रो, गुणवती च कन्या अभिप्रेतो !

गुणवान अपत्यप्राप्ती ‘क्वालिटी अश्युरन्स’ हेच ध्येय ठरविल्यावर नियोजन आणि व्यवस्थापन ओघाने आलेच. गर्भस्थापनेचे व गर्भावस्थेचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करणे ही माता पित्यांची जबाबदारी ठरते.

सामर्थ्यवान व निर्दोष वीर्य असलेला पुरुष, अविकृत रज, गर्भाशययुक्त स्त्री व श्रेष्ठ दर्जाचा पोषक आहार यामुळे ‘श्रेयसी प्रजा’ निर्माण होते. ऋतुकालानुसार उत्तम जमिनीत पोषक द्रव्यांचा वापर करून शेतीबागायत केली तर त्याचे फळही उत्तम मिळते. त्याचप्रमाणे सुयोग्य दिन गर्भस्थापनेसाठी निवडणे आवश्यक ठरते.

रजोदर्शनापासून सोळा रात्रींपैकी फक्त दहा रात्रीच गर्भाधारणेस प्रशस्त आहेत. रजोदर्शनापासून ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १२, १४, १५ ह्या दहा रात्रीत मैथुन केल्यास व्यंगरहित संतती प्राप्ती होते. समरात्री समागम केल्याने पुत्रप्राप्ती व विषम रात्री समागम केल्याने कन्याप्राप्ती होते असे आयुर्वेदाचे मत असले तरी ह्यावर अधुनिक पद्धतीने संशोधन झालेले नाही, म्हणून तूर्त हा वादाचा विषय आहे.

ऋतुकाली चौदाव्या रात्री संग केल्याने अत्यंत धर्मनिष्ठ, कर्मनिष्ठ, परोपकारी, दृढनिश्चयी, आत्मानुभवी महापुरुष जन्माला येतो. पंधराव्या रात्री समागमामुळे पतिव्रता कन्या जन्माला येते. सोळाव्या रात्री व्यवाय केल्याने सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण करणारा सर्वाधारभूत चक्रवर्ती राजा जन्माला येतो.

शुभ वार –  व्यंगरहित संततीसाठी – सोम, बुध, गुरु, शुक्र

शुभ तिथिप्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या अशा दहा तिथि गर्भधारणेसाठी वर्ज्य आहेत.

दोन्ही पक्षातील उरलेल्या वीस तिथि गर्भाधानासाठी शुभ आहेत.

अशुभ नक्षत्ररेवती, अश्विनी, पुण्य, अश्लेषा, मघा, चित्रा, मृग, मूळ ही नक्षत्रे गर्भाधानासाठी योग्य नाहीत.

मध्यम नक्षत्र – भरणी, कृतिका, आद्रा, पूर्वा, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा ही सात नक्षत्रे मध्यम स्वरुपाची आहेत.

सर्वश्रेष्ठ नक्षत्रे  – रोहिणी, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, स्वाती, अनुराधा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा ही अकरा नक्षत्रे गर्भधानासाठी सर्वश्रेष्ठ मानली आहेत.

शुभ मास – वसंत ऋतूतील दोन महिने व हेमंत – शिशीरातील चार महिने असे एकूण सहा महिने गर्भधानासाठी योग्य आहेत. इतर ऋतूंमधे प्रजास्थापनेसाठी व व्यंगरहित संततीसाठी मैथुन करू नये.

गर्भाधान व्यवस्थापन – विवाहानंतरच्या काळात गर्भाधानास योग्य अशा निवडलेल्या दिवसांच्या तीन महिने अगोदर स्त्री आणि पुरुष दोघांचीही वमन – विरेचन, स्नेहन / स्वेदनपूर्वक शरीरशुद्धी करावी. वमन – विरेचनानंतर संसर्जन क्रम विधिवत करावा. त्यानंतर पूर्ण आहार सुरु करावा. पंधरा दिवसांनी आस्थापन व अनुवासन बस्ति द्यावा. हे सर्व उपक्रम तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावे.

गर्भाधान – गर्भाधानासाठी सुनिश्चित दिवशी दोघांनीही उद्वर्तनादी सुगंधी द्रव्याचा वापर करून शुचिर्भूत व्हावे. श्वेत वस्त्रे परिधान करावीत. धूप, उदबत्ती, कापूर, इ. लावून घरात सुगंध पसरवावा. आनंद देणारे संगीत लावावे. मन प्रफुल्लित, आनंदित, प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करावे. मधुर, सात्विक असा आहार घ्यावा. शयनमंदिरात भडक रंग, हिंस्त्र प्राण्यांची चित्रे नसावीत. भिंती पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असाव्यात. डोके पूर्वेकडे येईल अशी शय्येची रचना असावी. पूर्वरात्र उलटल्यावर पादप्रक्षालन करून पुरुषाने उजवा पाय, स्त्रीने डावा पाय शय्येवर ठेवून चढावे. स्त्रीने पुरुषाच्या डाव्या बाजूला असावे. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने समागम करावा.

 आहारssचार  चैष्टिभि: यादृशीभि समन्तितौ |

स्त्रीन्युसौ स्मुपेयातां तयो पुत्रोsपि तदृश ||

आहार, आचार, विचार व चेष्टा इत्यादिकांनी युक्त होऊन स्त्री-पुरुष ज्या भावनेने एकत्र येत असतील तशीच संतति त्यांना निश्चित प्राप्त होईल.

 

लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..