नवीन लेखन...

श्रेष्ठ कोण? मुलगा की मुलगी?





११ जून २०१० ला संध्याकाळी ‘सपट परिवार महाचर्चा‘मध्ये ‘मुलगा श्रेष्ठ की मुलगी?‘ या विषयावर झाली. अशा विषयावर चर्चा ठेवण्याचे कारण सुरुवातीलाच स्पष्ट केले गेले, ते असे की, नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी होती- ७७ टक्के, तर मुलांची ६८ टक्के! अलीकडे निरनिराळ्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्यांत मुलीच आघाडीवर दिसतात. सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना त्या कुठंच कमी पडताना दिसत नाहीत. यामुळेच चर्चेला हा विषय निवडला गेला होता.

स्त्रियांच्या बाजूला प्राचार्य कविता रेगे (साठ्ये महाविद्यालय), मनीषा पाटणकर (सांगली- जिल्हाधिकारी) अश्विनी वैद्य आणि नाशिकमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी. पुरुषांच्या बाजूला होते- अॅड् उज्ज्वल निकम, बोर्डात प्रथम आलेला चैतन्य गानू, एक मानसशास्त्रज्ञ, तसेच एक उद्योजक. अन्य आमंत्रितांमध्ये पालक, महाविद्यालयांतील प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी होते.

विषयाला धरून चर्चा फारच अल्प काळ झाली. जे काही मुद्दे मांडले गेले, ते वरवरचे, उथळ होते. त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न झालाच नाही. महाचर्चेमध्ये सहभागी होणारी मंडळी बरीच असतात. शिवाय टेलिफोनवरूनही काही मान्यवर सहभागी होतात. त्यावेळी चर्चा अनावश्यक वळण घेते. त्यात वेळ जातो आणि मूळ मुद्द्याला सोडून चर्चेचे स्वरूप परस्परांचे मुद्दे खोडण्यात होते.

या चर्चेत आलेले मुद्दे असे होते- १) मुलींमध्ये चिकाटी आणि परिश्रम करण्याची वृत्ती जास्त असते, तर मुले चंचल असतात. श्रम घेण्याची त्यांची तयारी नसते. २) मुलींचा नैतिक मूल्यांचा पाया मुलांपेक्षा भक्कम असतो. ३) पुरुष महिलांपेक्षा जास्त भ्रष्टाचारी असतात. ४) मुलींचे प्रमाण हजारी ८५० ते ९०० आहे. अनेकदा मुली गर्भावस्थेत नष्ट केल्या जातात. म्हणजे आईच्या गर्भातही

त्या सुरक्षित नसतात. ५) मुलेदखील चिकाटीची व परिश्रम करणारी असतात. पण हा मुद्दा काही साधार सिद्ध

करता आला नाही. कारण अशी वृत्ती असलेली मुले संख्येने कमी असतात. म्हणून मुली परीक्षांमध्ये आघाडीवर असतात.

जीवशास्त्रीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या फरक असले तरी बौद्धिक दृष्टीने मुलगा आणि मुलगी सारखेच असतात. तरीही आज निकालांमध्ये मुलींचे वर्चस्व आढळते. याच्या कारणांच्या मुळाशी जावेसे वाटले.

यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- मुलींची पूर्वापार जडणघडण आणि मुलांची पूर्वापार जडणघडण. मुलींना संधी मिळताच त्या त्याचे सोने करतात. मुलांना वर्षानुवर्षे संधी मिळत आहे, मग त्याचे सोने करण्यात मुले मागे का?

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांवर खूप काळ अन्याय झाला. त्यांच्यातील गुणांना शतकानुशतके वाव मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने विकसित झाले नाही, हे जेवढे खरे, तेवढेच पुरुषप्रधानतेमुळे पुरुषांना जे अवास्तव स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे त्यांचेही प्रचंड नुकसान झाल. स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे पुरुषांच्या या कमतरता उघड होऊ लागल्या.

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केल्यानेच माणसातले सुप्त गुण उघड होतात. त्यामुळेच बर्‍याचदा दरिद्री, अनाथ, संकटग्रस्त वा अभावग्रस्त मुले ही सर्व तर्हेची अनुकूलता लाभलेल्या लक्ष्मीपुत्रांपेक्षा जास्त यश कमावतात. कारण काहीतरी मिळविण्याचे ध्येय त्यांच्यासमोर असते. हीच गोष्ट आजवर दडपल्या गेलेल्या महिलांबाबतीतही घडते आहे. त्यांना आपली गुणवत्ता टिकवून ठेवणे गरजेचे असते, तरच आपले शिक्षण पुढे चालू राहू शकते, याची त्यांना जाणीव असते. याउलट, मुलांना मोकळे वातावरण, स्वातंत्र्य, शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच त्यांच्यापुढे कमी आव्हाने असतात. यामुळे त्यांच्यात जिद्द, प्रेरणाच राहात नाही.

दुसरे कारण- मुलींना ‘सातच्या आत घरात‘च बंधन पूर्वीपासूनच होते. तसेच दिवसाही त्यांनी उगीचच गप्पाटप्पा, फिरणे वगैरेत अनावश्यक वेळ काढू नये अशी अपेक्षा- नव्हे सक्तीच होती. अर्थातच त्यामुळे मुलींना घरातला वेळ विधायक कामांसाठी देता येई. याउलट, मुलांना उशिरापर्यंत खुशाल बाहेर राहण्याची मुभा असल्याने उनाडपणा व व्यसनात ती सहजी सापडू शकतात. त्यांच्या संगतीबाबत पालकांना तेवढे जागरूक राहावेसे वाटत नाही. पूर्वी स्त्रिया घरात बंदिस्त होत्या तरी त्यांना दिवसभर भरपूर गृहकृत्ये असत. स्वैपाक, बालसंगोपन, दळण-कांडण, वृद्धांची सेवा, पै-पाहुणा. हे पूर्वापार संस्कार स्त्रीला स्वस्थ बसू देत नाहीत. ही पारंपरिक गृहकृत्ये करण्यासाठी अपार मेहनत व चिकाटी लागते.

याउलट, मुलांना शिक्षणाची संधी मिळाली तरी दैनंदिन व्यवहाराचे जीवनशिक्षण त्यांना मिळाले नाही. घरातील अति महत्त्वामुळे आपण कसेही वागलो तरी चालेल, आपले तेच बरोबर, अशी वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली. अनिर्बंध वर्तणुकीचे संस्कार या पुरुषप्रधानतेमुळेच झाले.

या महाचर्चेत व्यवस्थापन विषयातले तज्ज्ञ कोलते यांनी, व्यवस्थापनात मुलीच मुलांपेक्षा अधिक सरस ठरतात, असे विधान केले. ते पटण्यासारखेच होते. याला कारण त्यांना गृहव्यवस्थापनाचे लहानपणापासून मिळणारे बाळकडू! एकत्र कुटुंबपद्धतीत घरातील ज्येष्ठांशी वागताना वापरण्याचे कौशल्य, पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना पाळायचे शिष्टाचार, स्वैपाक करताना वापरावी लागणारी कल्पकता, प्रयोगशीलता, कृतिशीलता, कौशल्य, काटकसर, नियोजन, घरखर्च भागवताना पैशाची बचत आणि आर्थिक नियोजन, घरातली विविध कामे एकाच वेळी पार करताना करावे लागणारे वेळेचे नियोजन, तत्परता- या सर्वांमुळे स्त्रियांमध्ये आपसूकच व्यवस्थापन कौशल्य रुजत जाते. या संस्कारांमुळे स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व घरी असूनही एकांगी झाले नाही. यामुळे मानसशास्त्रीय तत्त्वानुसार, संधी मिळताच ‘ट्रान्स्फर ऑफ ट्रेनिंग‘ होऊ शकते. उलट, पुरुषवर्ग अशा प्रशिक्षणापासून वंचित राहिला. त्यांचा फावला वेळ अनुत्पादक गोष्टींत जातो. कलाकौशल्याची आवड निर्माण होत नाही. ती जोपासली जात नाही. बेफिकीर वृत्ती वाढीला लागते.

संधी मिळताच स्त्रियांना या जीवनशिक्षणाचा उपयोग, कलागुणांचे संस्कार

शिक्षणातही कामी येतात. त्यामुळे परीक्षा तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर राहू लागतात.

महाचर्चेत म्हटल्याप्रमाणे, पुरुषांकडे पूर्णपणे झुकलेला लंबक पूर्णपणे स्त्रियांकडे झुकूनदेखील चालणार नाही. समाजातल्या

कुठल्याही एकाच गटाची प्रगती ही अंती समाजहिताच्या दृष्टीने हानीकारक असते. स्त्री आणि पुरुष दोघांचेही व्यक्तिमत्त्व सर्वांगीण, परिपूर्ण झाले, तरच समानता खर्‍या अर्थाने अस्तित्वात येईल. समाजहितासाठी ती पोषक ठरेल. एकमेकांच्या साहाय्याने दोघांनीही या शापातून आपली मुक्ती करून घेतली, तर हा श्रेष्ठत्वाचा प्रश्न शिल्लकच राहणार नाही.

— भालचंद्र हादगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..