संगीत विश्वात सरदार मलिक यांना ‘सुरांचा सरदार’ म्हणून ओळखलं जात असे. हिंदी सिनेसृष्टी मध्ये भरीव काम करुन सुध्दा पहिल्या पाच मध्ये नाव न मिळवु शकलेला एक संगीतकार म्हणजे सरदार मलिक.
सरदार मलिक उत्तर प्रदेशमधील अल्मोडा गावचे. आयुष्यभर सर्वधर्मसमभावाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यासाठी ‘सरदार’ नाव धारण केलं. ते स्वत: सरदार, पत्नी बिल्किस तर मुलं अन्नू, अबू आणि डेबू. हिंदुस्थानी संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी अल्लाउद्दीन खाँ साहेबांकडे गिरवले. उस्ताद अली अकबर खाँ, पंडित रविशंकर हे त्यांचे गुरुबंधू होते. गायनाचं शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी पंडित विष्णुपंत शिराळी यांच्याकडून घेतलं. उदय शंकर यांच्याकडे नृत्यकला शिकले. पुढे सरदार मलिक संगीत दिग्दर्शनाकडे वळले. १९४७ मधील जयंत देसाईंचा ‘रेणुका’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. ‘नायक मुबारक’साठी त्यांनी पार्श्वगायनही केलं; पण चित्रपट अपयशी ठरला. पुढे काही काळ ते एच.एम.व्ही.त काम करत होते. सरदार मलिक यांची संगीतकार म्हणून ओळख झाली ती ‘ठोकर’(१९५३)पासून.
‘ठोकर’मधलं तलतच्या आवाजातील शम्मी कपूरवर चित्रित झालेलं ‘ऐ गमे दिल क्या करू’ हे गीत माधुर्य, अर्थपूर्ण शब्द सौंदर्यामुळे मन वेडावून टाकत होतं. इंटरव्हलनंतर हाच मुखडा घेऊन पुढचा भाग आशाच्या आवाजात आहे. एक गाणं, तोच विचार दोन वेळा चित्रपटात द्यायची कल्पना सरदार मलिक यांचीच! हा चित्रपट पाहायला निर्माते-दिग्दर्शक पी. एन. अरोरा आले होते. ही दोन्ही गाणी ऐकून ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी ‘चोर बाजार’ या पुढच्या चित्रपटासाठी मलिकना करारबद्ध केलं. ‘हुई थी हम से नादानी, तेरी महफिल में आ बैठे, जमीं की खाक होकर, आसमां से दिल लगा बैठे.’ केवळ आपल्या आवाजाच्या जादूने भावनांमधील विविध छटांचा आविष्कार करण्याच्या बाबतीत त्या काळात लता मंगेशकरांना तोड नव्हती. ज्याला नाव देता येणार नाही, अशी एक अप्रतिम छटा त्यांनी सरदार मलिक यांच्या या गाण्यातून व्यक्त केली आहे. ‘झुक झुक जाए नजर शरमाए, किसी को कहां न जाए’ हसरत जयपुरीची ही हळुवार भावना गीता दत्तच्या आवाजात त्यांनी तितक्याच समर्थपणे पेश केली आहे.
विष्णुपंत शिराळींच्या गायकीचा जबरदस्त प्रभाव सरदार मलिक यांच्यावर होता. झोपाळयासारखा स्वरांचा चढ-उतार करत ते गाण्याची लज्जत वाढवत असत. त्यांच्या गायकीची झलक सरदार मलिक यांनी ‘आब-ए-हयात’मधील हेमंतकुमारच्या गाण्यातून दाखवली आहे. ‘मैं गरीबों का दिल हूं वतन की जुबां.’ वेळात वेळ काढून हेमंतकुमार यांनी सरदार मलिक यांच्यासाठी पार्श्वगायन केलं. हेमंतकुमार यांचं हे एक विशेष उल्लेखनीय गीत आहे. चोखंदळ रसिकांनी सरदार मलिक, आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतलेली काही गाणी ऐकल्यास त्यांना हा ‘सुरों का सरदार’ काय होता, याची थोडीफार कल्पना येईल. धीरूभाई देसाईंचा ‘सारंगा’ म्हणजे त्यांच्या प्रतिभाशक्तीचा उत्कृष्ट नमुना. रसिक श्रोत्यांसाठी जणू मेजवानीच. ‘पिया कैसे मिलू तुमसे, मेरे पाव पडी जंजीर’ (लता-रफी) या गाण्यातील अगतिक विरहिणी, ‘लागी तुमसे लगन साथी छुटे ना’ (मुकेश-लता) यातील लाडीक नखरा, लताच्या ‘कोई घर आएगा प्यार जगाएगा’मधील ढोलकीची रसपूर्ण साथ, सुमन कल्याणपूरच्या गाण्यातील मधुर दर्द आणि शेवटी लक्षात राहतो, तो मुकेश. ‘हाँ दिवाना हूँ मैं, गम का मारा हुआ इक बेगाना हूँ मैं..’ सरदार मलिक यांनी मुकेशच्या आवाजाचा अतिशय कुशलतापूर्वक उपयोग केला आहे. त्याच्या आवाजातील वजन कमी करून दिलेलं ‘सारंगा तेरी याद में, नैन हुए बेचैन’ हे गाणं म्हणजे, मुकेशच्या कारकिर्दीतला मानबिंदू आहे.
सरदार मलिक यांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवून गाण्याच्या यशाचं श्रेय तारशहनाईवादक डी. एम. टागोर यांना दिलं आहे. टागोर यांना सर्व वादक कलाकार दुखींदा म्हणून ओळखत असतं. ते तारशहनाई वाजवताना इतकी व्याकूळता निर्माण करत, की ऐकणा-याच्या डोळय़ांतून अश्रू पाझरत असत. ‘सारंगा’ चित्रपटाने जितका बिझनेस केला, त्यापेक्षा अधिक बिझनेस त्याच्या ध्वनिमुद्रिकांनी केला. मा.सरदार मलीक यांनी सहाशेच्यावर गाण्यांना संगीत दिले आहे. संगीतकार अन्नु मलिक हे मा.सरदार मलीक यांचे चिरंजीव. सरदार मलीक यांचे निधन २७ जानेवारी २००६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अरुण पुराणिक
Leave a Reply