शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य जगासमोर आणले. सिनेमा संगीतमध्ये एक काळ असा होता की, या वाद्याशिवाय पार्श्व संगीताला पूर्णत: येऊच शकत नसे. रम्य हिमपर्वत दाखवायचा, तर तिथे संतुर हवेच! लोकसंगीतात वापरल्या जाणार्याा संतुरमध्ये पं. शिवकुमार शर्मांनी आपल्या संगीताच्या गरजेनुसार काही सुधारणा केल्या आणि फार मोठ्या अपेक्षेने हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या दरबारात आणले. श्रोत्यांनी त्यांना अपेक्षेबाहेर प्रोत्साहन दिले. त्यानंतर शिवकुमारांनी याच वाद्याच्या जोरावर अनेक चित्रपटांनाही संगीत दिले. त्यात ‘सिलसिला’ हा अप्रतिमच! संतुरला एका उंचीवर नेऊन ठेवणार्यार शिवकुमारांनंतर अनेक कलाकारांनी या वाद्याची कास धरून नंतर नाव कमावले आहे. त्यातल्या पं. उल्हास बापट यांचा उल्लेख खास म्हणून करावा लागेल. त्यांनी तर प्रत्येक रागानंतर स्वर जोडणी करायला लागू नये म्हणून हार्मोनियमप्रमाणे क्रोमॅटिक स्केलचे खास संतुर बनविले आहे. म्हणजे काय सांगायचे झाले, तर सा नंतर ओळीने कोमल तीव्र सर्व स्वर जोडून तीन सप्तकांची योजना केली आहे. ही तरी खूप छान सोय झाली.
संतूर हे जम्मू काश्मिरमधले तिथल्या ‘सुफीयाना मौसिकी’ या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर तिथली परंपरा होती, स्वर तारांच्या खेचीतून निर्माण होतो हा तंतुवाद्यातला सर्वसामान्य नियम आहे. या नियमाला धरून शेकडो वाद्ये जगभरात उत्पन्न झाली. खरेतर या वाद्यांची गणती करावी लागेल. जितक्या संस्कृती तितकी वाद्ये, असा हा भाग आहे. धनुर्वीणेचे असेच अनंत प्रकार आहेत. हार्प हे आजही वापरले जाणारे याच वर्गातले वाद्य आहे. याचप्रकारच्या वाद्यामध्ये वेगळेपणा दाखविणारे स्वरमंडल हे अत्यंत लोकप्रिय वाद्य आपल्याला नेहमी पहायला मिळते. हे वाद्य विशेष करून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक/गायिका आपल्या हातात धरून गाताना वाजवीत असतात. शिवाय सिनेमाच्या, मालिकांच्या अथवा नाटकांच्या पार्श्वयसंगीतासाठीही याचा उपयोग हमखास केला जातो. या वाद्यात वेगळेपणा आहे, असे म्हटले. याचे कारण हे वाद्य धनुराकृती नसून एका बंद पेटीप्रमाणे याचा आकार असतो. वरची बाजू मोकळी असते आणि दोनही बाजूंनी तारा खेचणारे खिळे ठोकलेले असतात. ही पेटी मंद्र स्वरांकडे रुंद असते, तर तार स्वरांकडील बाजू निमुळती असते. जास्त रुंदीचा भाग साधारण दीड फूट, तर कमी रुंदीचा भाग नऊ ते दहा इंच असतो. अशाचप्रकारचे कानून नावाचे एक वाद्य इराणी संगीतात वापरले जाते. काही अभ्यासकांच्या मते हे वाद्यच स्वरमंडलाचे प्रेरक वाद्य आहे. तान के कप्तान असा ज्यांचा हिंदुस्थानी संगीतात लौकिक आहे, असे तानरसखाँ यांनी याचा वापर प्रथम आपल्या गायनात केला, असे म्हटले जाते. पतियाळा घराण्याच्या सर्वच कलाकारांनी स्वरमंडल आपल्या गायनासोबतीला खास करून वापरले आहे. बडे गुलाम अलीखाँसाहेब, सलामत नझाकत, मुनव्वर अली यांनी हे वाद्य अधिक लोकप्रिय केले. कालांतराने स्वरमंडल घेऊन गायची एक स्टाईलच निर्माण झाली. अजय पोहनकर, पं. जसराज, निर्मला देवी, परवीन सुलताना आणि अलीकडे उस्ताद राशीद खाँ या सर्वांनी स्वरमंडलाचा जाणीवपूर्वक वापर केला आणि आपल्या स्वरांना एक साज चढविला. या वाद्यामध्ये रागाप्रमाणे स्वर नियुक्त करावे लागतात. शुद्ध स्वर अधिक असणार्याा रागानंतर कोमल स्वर अधिक असणारा राग गायचा असल्यास स्वरजोडणी करायला थोडा वेळही लागत असतो. तेव्हा श्रोत्यांना थोडी कळ काढावी लागत असते.
संतुर दिसायला असेच पण तंत्रामध्ये सर्वस्वी भिन्न असे संतुर हे वाद्य खूपच लोकप्रिय असे आहे. पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला काश्मीरच्या खोर्या तून हिंदुस्थानी संगीताच्या व्यासपीठावर आणले. तसे पाहता हे वाद्य प्राचीन आहे. अनेक पिढ्यांपासून हे वाद्य काश्मीरमध्ये वाजविले जाते. वैदिक ग्रंथात वनवीणा नावाच्या एका वाद्याचा उल्लेख आहे. त्यात शंभर तारा असत. छोट्या काठ्यांनी तारांवर आघात करून ते वाजविले जात असे. संतुर या वाद्यालाही शततंत्री वीणा असे नाव आहे. एक प्रकारच्या खास काठ्यांनी तारांवर आघात करून यावर स्वरनिर्मिती केली जाते. काठ्यांच्या टोकावर एक बाक असतो, ज्यामुळे स्वराघात नाजूक होतात. चतुर्भुज आकाराची एक पेटी असणारा या वाद्याचा आकार असतो. वरील भागात दोन दोन मेरूंच्या पंधरा ओळी असतात. एका मेरूवर एकाच स्वरांच्या चार तारा जोडलेल्या असतात. याशिवाय काही संतुरांमध्ये सिंपथेटिक (सहायक ध्वनी) तारांचीही सोय केलेली असते. डलसिमर या इलेक्ट्रॉनिक वाद्याशी याचे साधर्म्य असते.
नंदन हेर्लेकर /पुढारी
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Thank u it’s very nice an this wide information is very useful thank’s alot