गेल्या तीन वर्षापासून माझा संपादकीय भूमिकेतून वाचकांशी आणि लेखकांशी थेट संपर्क येत आहे. मी वाचकांच्या रुची बद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो पण त्या माझ्या व्यक्तीगत अनूभवातून सांगत आहे हे येथे लक्षात घ्यावे.
‘प्रेम’ या विषयावरील साहित्य आणि त्या भोवती गुंफलेल्या साहित्य वाचण्यात मराठी वाचकांना रुची अधिक दिसते. त्यानंतर आरोग्याशी निगडीत साहित्य वाचण्यात वाचकांना रुची दिसते कारण आता आपल्या आरोग्या बाबतची जागरूकता लोकांच्या मनात वाढू लागली आहे. त्यानंतर चित्रपट, नाटक , क्रिकेट, आणि सध्याच्या दैनदिन मालिका यांच्या विषयी वाचण्यात वाचकांना रुची दिसते. त्यानंतर उरलेल्या वाचकांना राजकारण वगैरे विषयांवर वाचण्यात रुची दिसते. आर्थिक, सामाजिक वगैरे विषयांवरील साहित्य वाचण्यात रूची असणारा एक वेगळाच गट आहे.
संपादकीय भूमिकेतून मला आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्ह्णजे आज लोकांना भरमसाठ वाचायला नाही आवडत. लोकांची आज थोडक्यात बरच काही सांगणारे आणि शिकवून जाणारे साहित्य वाचण्यात अधिक रुची दिसते. वेळेचा अभाव हे एक कारण असेलही कदाचित त्या मागे. मराठी वाचकांना आजकाल शंभर लेखकांचे शंभर विषयांवरील शंभर लेख वाचायला आवडतात पण एकाच लेखकाचे एकाच विषयावरील शंभर पानांचे विचार वाचायला काही मोजक्याच वाचकांना आवडतात त्यामुळेच तर मराठी साहित्यात मराठी दिवाळी अंकाचे महत्व दिवसेन दिवस वाढत आहे.
लघूकथा लोकांना वाचायला आवडत नाहीत अशी ओरड होते पण तस नाही आज वाचकांची रुची डोळ्यासमोर ठेऊन कथा लिहल्या जात नाही हेच कारण असावं कदाचित. बोध देणारे साहित्य वाचकांना वाचायला आवडते पण ते एका मर्यादेपर्यत. त्या साहित्याकडे कोणीही वाचक मनोरंजन या दृष्टीने पाहत नाही. आजच्या वाचकांची मनोरंजन करणारे साहित्य वाचण्याकडे रुची अधिक दिसते. ती रुची लक्षात घेऊनच बोध दाखवणार्या साहित्याची निर्मिती भविष्यात करावी लागेल.
लहान मुलांची वाचनाची रुची लक्षात घेता लहान मुलांनीच् लिहले साहित्य येत्या काळात लहान मुलांना वाचायला आवडेल असं मला व्यक्तीशः वाटत.
वाचकांची जशी रुची असते तशी रुची काही बाबतीत काही संपादकांनाही असते. त्यांना वाचकांना बोध देणारे, त्यांच्या फायद्याचे, त्यांच्या हिताचे ,एकूणच समाजाच्या हिताचे आणि देशाच्या हिताचे रक्षण करणारे साहित्याला प्रोत्साहन देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या हया रुचीचा वाचकांनीही सन्मान करायलाच हवा !
भविष्यात वाचकांची रुची सांभाळत – बोधपर साहित्य निर्माण करणारे संपादकच पुढे दिसतील असं चित्र आज तरी स्पष्ट दिसतय.
— निलेश बामणे
नमस्कार.
वाचकांच्या रुचीबद्दल विचारपूर्वक लिहिलेला लेख. वाचकांच्या रुचीबद्दल मी नंतर लिहीनच. पण तूर्तास असें विचारायचें आहे की तुम्ही कुठल्या प्रकाशनअअाचें संपादन करता? ( मलाही त्यात कदाचित लिहितां येईल, अर्थात् वाचकांच्या रुचीशी माझी रुची जुळत असेल तर).
– सुभाष स. नाईक