घरदारावर निखारे ठेवून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर तन-मन-धनाने उतरले. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील. किती नावं घ्यावीत? या शाहिरांनी डफावर थाप देत उभा-आडवा संपूर्ण पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राचं
आंदोलन त्यांनी गावागावांत-घराघरांत पोहोचविलं…..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश मिळवण्यात कोटी-कोटी मराठी जनतेला दीर्घकाळ लढा द्यावा लागला. या उग्र आंदोलनाने दिल्लीचं तख्तही हादरलं आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी जनता, लेखणी आणि वाणीने लढणारे नेते तसंच उभा महाराष्ट्र जागा करणारे शाहीर, हे या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे नायक होते. विशेषत: शाहिरांचे योगदान हा तर या चळवळीतील अमूल्य व अविस्मरणीय घटक होता. घरादारावर निखारे ठेवून हे शाहीर तन-मन-धन अर्पून या लढ्यात उतरले. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील. किती नावं घ्यावीत? या शाहिरांनी डफावर थाप देत उभा-आडवा संपूर्ण पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन त्यांनी गावागावांत-घराघरांत पोहोचविलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन भरात होती. पोलिसांच्या अत्याचाराला न जुमानता लोक कलापथकांच्या कार्यक्रमांना हजर राहत होते. मोरारजी सरकारने जेव्हा तमाशावर बंदी घातली. तेव्हा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणाले, “मायबाप सरकारने तमाशावर बंदी घातली म्हणून आज आम्ही “माझी मुंबई” हे लोकनाट्य आपल्यासमोर सादर करीत आहोत. “मुंबई कुणाची” या लोकनाट्यात वर्णन केलेला सीमाभाग महाराष्ट्राला दुरावणार, ही व्यथाही त्यांचं काळीज पोखरत होती. यातूनच जन्माला आली एक अप्रतिम लावणी, “माझी मैना गावाला राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली ……. शाहीर” अमर शेख म्हणजे तर मुलुखमैदानी तोफच होती. त्यांच्या पहाडी स्वरांनी मराठी जनता या लढ्यात खेचली गेली. नाशिकच्या डॉ. सुधीर फडके यांनी लिहिलेले “गर्जा संयुक्त महाराष्ट्र भरती…..” हे गीत अमर शेखांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर गेलं. शाहीर साबळे यांची आंदोलनकाळातील
आठवण यासंदर्भात बोलकी आहे. मुंबई आकाशवाणीवर त्यांना एकदा पोवाडा सादर करण्यास बोल
वलं होतं.
त्यांच्या पत्नी भानुमती यांनी लिहिलेला तो पोवाडा होता. “महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभती खमी किती नरमणी जन्मले हिच्या कुसव्यास …” पोवाड्याची सुरुवात वाचली अन् तत्कालीन केंद्र संचालक म्हणाले, शाहीर, तेवढा महाराष्ट्र शब्द वगळा! तरीही थेट प्रसारणावेळी शाहिरांनी तोच पोवाडा, तसाच्या तसा सादर केला. लगेच केंद्र संचालकांनी दिल्लीला कळविलं. आमच्या सौजन्याचा शाहिरांनी गैरफायदा घेतला आणि शाहीर साबळे यांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम बंद झाले. हीच लोकनाट्ये मग शाहिरांनी गावागावांत नेली.
संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा करुन ते प्रत्यक्षात आणणारे गजाभाऊ बेणींसारखे अनेक शाहीर यात आहेत. या कलापथकांनी ठिकठिकाणी मोर्चे काढले आणि संयुक्त महाराष्ट्राचे रणशिंग फुंकलं. शाहीर शंकरराव निकम, शाहीर अनंतराव मुठे, बी. मेघराज, प्रताप परदेशी, गजाभाऊ बेणी, शाहीर करीम शेख, भिका पाटील, रतन जाधव, हरिभाऊ खैरनार, शाहीर सूर्यवंशी अशा कित्येक शाहिरांनी जिल्ह्याजिल्ह्यांत जागल्याचं काम केलं.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply