मराठी भाषेचा विकास व्हावा, तिचे संवर्धन व्हावे, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापुरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने अनोखी संकल्पना साकारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्या आवारात मराठी ग्रंथदालन उभारण्याची योजना आकारास येत आहे. या योजनेचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात
ग्रंथदालन उभारण्याच्या कामाची पायाभरणी सहकार, संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाली. जिल्हाधिकारी कार्यालयास दररोज लोक भेट देतात. त्यामुळे मराठी पुस्तकांची विक्री चांगल्या प्रकारे होऊ शकेल. अशा प्रकारच्या ग्रंथदालनामुळे मराठी भाषेचा प्रसार तर होईलच त्याचबरोबर वाचन संस्कृतीही वाढीस लागेल असा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक राजन गवस म्हणाले, मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार व्हायचा असेल तर पुस्तके आणि ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी ग्रंथदालन झाल्यास मराठी पुस्तके सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
राज्य शासनाने मराठी भाषा विभाग सुरु केला आहे. मराठी भाषेच्या प्रसारासाठी मराठी पुस्तके सर्वदूर ग्रामीण भागात पोहाचणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर वगळता अन्य ठिकाणी सर्व मराठी पुस्तके एकत्रित उपलब्ध होतील अशी पुस्तक विक्री केंद्रे उपलब्ध नाहीत. या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पुढील तीन वर्षात अशी केंद्र कार्यान्वित झाली तर तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी, सामान्य नागरिक यांना तालुका मुख्यालयी सर्व पुस्तके, ललीत साहित्य, शब्दकोष, विज्ञान-तंत्रज्ञान, शेती, उद्योग, व्यापार व वाणिज्य आदी विषयांची पुस्तके पाहण्यासाठी, चाळण्यासाठी व आवडली तर विकत घेण्यासाठी उपलब्ध होतील. यातून मराठी प्रकाशन व्यवसाय वाढीस लागेल आणि मराठी भाषेचा आणि वाचन संस्कृतीचा प्रसार होणार आहे.
या योजनेमुळे मराठी पुस्तके ग्रामीण भागात वाचकांना खरेदीसाठी सहज उपलब्ध होतील व त्यातून पुस्तक विक्री वाढू शकेल. मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होऊ शकेल.
जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार / पंचायत समिती कार्यालयात पुरेशी मोकळी जागा उपलब्ध आहे. तेथे ५०० ते ६०० स्क्वेअर फुटाची इमारत (जिल्हा स्तरावर) किंवा ३०० ते ५०० स्क्वेअर फुटाची इमारत (तालुका स्तरावर) बांधण्यात येईल. तेथे पुस्तक प्रदर्शन व विक्रीसाठी एक हॉल, छोटे कार्यालय, पुस्तके ठेवण्यासाठी गोडावून व स्वच्छतागृह यांचा समावेश असेल. हॉल सुयोग्य विक्रेत्यास सार्वजनिक बांधकाम विभाग ठरवेल त्या भाड्याने देण्यात येणार आहे.
— बातमीदार
Leave a Reply