नवीन लेखन...

संस्कृतीचा पुजारी

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जाण्याने आठवणींचा मोठा पट डोळ्यांसमोर उभा राहतो. राजकारणात व्यस्त असूनही त्यांना साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांचीही उत्तम जाण होती. ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री असताना त्यांचा आणि माझा पहिला स्नेह जमला आणि पुढे तो वृद्धिंगतच होत गेला. देशाच्या किंवा राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण

करण्याची जबाबदारी साहित्यिक, कलाकार यांच्याबरोबरच राजकारण्याचीही असते, याची त्यांना उत्तम जाण होती. आज संस्कृतीचा हा पुजारी निघून गेल्याचे मोठे दु:ख मनात सलते आहे…

राजकीय क्षेत्रातील व्यस्तता, त्यातील ताण, विरोधकांचा दबाव यासारख्या सार्‍या भानगडी सांभाळतही त्या क्षेत्रात कसे प्रसन्न राहता येते याचे उत्तम उदाहरण म्हणून विलासराव देशमुख यांचा उल्ले़ख करावा लागेल. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मनाला बसलेल्या धक्क्याबरोबर त्यांचे हे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे उभे राहिले. एक सुसंस्कृत, सदासस्मित, सांस्कृतिक मूल्यांची प्रचंड जाण असणारे असे ते राजकीय नेते होते. शरद पवारांचे निष्ठावान ते दिल्लीतील स्वतंत्र सुभेदार असा संपूर्ण आलेख पाहिल्यानंतर त्यांचे नक्कीच कौतुक वाटत असेे. कॉंग्रेस पक्षाची, त्यांच्या राजकारणाची एक विशिष्ट अशी शैली आहे. माझ्या सुदैवाने त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव माझ्या गाठीशी आहे. त्या काळात त्यांच्या अनेक सद्गुणांचा अनुभव मला घेता आला. विलासराव विधानसभेत पराभूत झाले होते. त्यावेळी त्यांचे राजकारण आणि राजकीय कारकीर्द संपली, असे सार्‍यांना वाटत होते. त्यावेळी अनेकांनी या गोष्टीला दुजोरा देणारी विधाने करून विलासरावांना डावे लेखण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आपल्या कर्तृत्वाच्या आणि राजकीय अनुभवाच्या जोरावर ते उसळी मारून पुन्हा पुढे आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पटकावले. केवळ एकदाच नाही, तर तब्बल दोनवेळा त्यांनी हे पद भूषवले. कॉंग्रेसच्या सत्ताकारणात मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा सर्वांत जास्त कार्यकाळ त्यांना मिळाला. ही घटना अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल.

कॉंग्रेस पक्षासाठी आवश्यक असणारी सर्व कौशल्ये विलासरावांकडे होती, याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही. विलासरावांच्या स्वभाववैशिष्ट्यातील आणखी एक मोठा गुण म्हणजे ते कधी चिडत नसत. ते चिडून अद्वातद्वा बोलले, असे कधीही झालेले नाही, त्यांचा संयम सुटला, असे कधी पाहण्यातही नाही. अत्यंत शांत डोक्याने सार्वजनिक ठिकाणी वावरणारे, सभ्य, सुसंस्कृत नेता हे त्यांचे रूप त्यांच्या देहबोलीतून सतत व्यक्त होत असे. कुठल्याही प्रसंगात अतिशय संयमित शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करणे हा त्यांचा उत्तम गुण होता.

उत्तम विनोदबुद्धी

विलासराव अतिशय मिश्किल स्वभावाचे होते. त्यांच्याजवळ उत्तम विनोदबुद्धी होती. १९९२ मध्ये विलासराव महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री होते, त्या काळात मुंबईत कोकण कला महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाला त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार येणार होते; मात्र त्याच दिवशी नानासाहेब गोरे यांचे निधन झाले. त्यामुळे शरद पवारांना तेथे जावे लागले. त्यांनी विलासरावांना या कार्यक्रमाला पाठवले. त्यावेळी माझी आणि विलासरावांची पहिली भेट झाली. वास्तविक, त्या कार्यक्रमाला विलासराव अचानक आले; मात्र त्यावेळी त्यांनी कोकणी परंपरेचे वर्णन इतके बहारदारपणे केले की मीच काय पण, उपस्थित सर्वच जण त्यांच्या शब्दप्रवाहाने प्रभावित झालो. कोकणी माणसाचा बेरकेपणा, हुशारी, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये त्यांनी अतिशय अचूकपणे आणि मार्मिक पद्धतीने सांगितली. ऐनवेळी बोलण्याचा प्रसंग आलेला असतानाही उत्स्ङ्गूर्त आणि बहारदार बोलण्याची त्यांची सवय यावेळी माझ्या लक्षात आली.

या प्रसंगानंतर आमच्या भेटी प्रसंगानुसार होत होत्या आणि स्नेह वाढत होता. विलासरावांची भेट झाल्यानंतर त्यांची स्नेह देण्याची आणि स्नेह घेण्याची दुर्मिळ वृत्ती मला दिसून आली. त्यांच्या राजकारणाचा प्रवास मी दुरून पाहत होतो; पण त्याचबरोबर एक मित्र, एक चाहता म्हणूनही मी त्यांच्याकडे पाहात होतो. विलासरावांचा धीरोदात्तपणा वाखाणण्याजोगा होता. कितीही अडचणी आल्या तरी सकारात्मक दृष्टीने त्याचा मुकाबला करायचा, हे त्यांचे वैशिष्ट्य होता. त्यांनी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतही हात-पाय गाळले नाहीत, हार मानली नाही, हे पाहिल्यानंतर हा माणूस राजकारणात मागे राहणार नाही हे मी जाणलं. आयुष्यात येणारे अनेक चढउतार त्यांनी खूप सहजतेने घेतले आणि येणारी परिस्थिती कौशल्याने हाताळली. कुठल्या परिस्थितीत राजकारणावरील आणि जनमानसावरील पकड त्यांनी ढळू दिली नाही.

साहित्य परंपरेची उत्तम जाण

२००६ मध्ये ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी मला देऊ केले. अशोक चव्हाण हे त्यावेळी सांस्कृतिक मंत्री होते. त्यांचा मला याबाबत ङ्गोन आला. यासंदर्भात माझी विलासरावांची मुंबईत भेट झाली. या भेटीत महाराष्ट्राच्या विशाल साहित्यसंस्कृती क्षेत्राकडून, माझ्याकडून त्यांना कोणत्या अपेक्षा आहेत, याबाबत त्यांनी सांगितले. आमच्या दोघांमध्ये झालेल्या या चर्चेमधून त्यांना महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेची, चित्रपट, नाटक, कला या प्रत्येक क्षेत्राची उत्तम जाण असल्याचे मला दिसून आले. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील जी मुले नव्याने लिहू लागली आहेत त्यांच्याबाबतही त्यांना माहिती असल्याचे जाणवले. त्यांचे हे विचार खूप प्रगल्भ आणि जाणकार मुख्यमंत्र्याचे आहेत, याची जाणीवही मला झाली. त्यांच्याशी बोलताना मंडळाचे अध्यक्ष म्हणून माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, हे त्यांनी अतिशय मोकळेपणाने आणि सविस्तरपणे सांगितले. त्यावर मी त्यांना म्हणालो की, हे अध्यक्षपद तुम्ही मला देऊ केले आहे. ते मी स्वीकारतो; पण त्यासाठी मला स्वातंत्र्यही हवे आहे. जेणेकरून मी चांगले काम करू शकेन.’ वास्तविक, मी असे विचारल्यावर ते आश्‍चर्यचकित किंवा संभ्रमित होतील असे मला वाटले होते; परंतु त्यांनी मला तात्काळ संपूर्ण मोकळीक दिली. वास्तविक पाहता, मुख्यमंत्री अनेक अटी घालत असतात; पण विलासरावांनी अशा कोणत्याही अटी मला घातल्या नाहीत, तर उलट मी घातलेल्या अटी त्यांनी मान्य केल्या आणि मला काम करण्याची मोकळीक दिली. हा त्यांच्या सांस्कृतिक मोठेपणाच म्हणावा

लागेल. त्याचबरोबर त्यांच्या सहवासातून राजकारणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही मला दिसली.

विलक्षण स्मरणशक्ती

विलासरावांचे आणखी एक स्वभाववैशिष्ट्य म्हणजे आपल्या मित्रांच्या, जवळच्या व्यक्तींबाबतच्या लहान लहान गोष्टी त्यांच्या लक्षात राहायच्या. एवढ्या प्रचंड व्यापात ते या गोष्टी लक्षात कशा ठेवायचे याबद्दल कुतूहल नक्कीच वाटायचे. मला आठवते, २००० मध्ये बेळगावला साहित्य संमेलन होते. माझा वाढदिवस त्याच दिवशी म्हणजे २८ एप्रिल रोजी होता. त्यावेळी साहित्य संमेलनाला विलासराव येणार म्हणून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभे होतो. ते आल्यानंतर मला बघून लगेच म्हणाले, ‘आज तुमचा वाढदिवस. त्याबद्दल तुमचं अभिनंदन.’ एवढ्या गर्दीतही त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली. त्यानंतरही पाच वर्षे दरवर्षी न चुकता ते मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ङ्गुलं पाठवत आणि ङ्गोनवरून अभिनंदन करत होते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हटला पाहिजे.

एकदा कोकणवासियांनी माझा वाढदिवस कोकणात कणकवली येथे साजरा केला. तेव्हा तेथील लोकांनी त्यांना आग्रहाने आमंत्रित केले आणि लोकांची इच्छा म्हणून एवढा मोठा माणूस त्या समारंभाला आला. पुन्हा तीन-चार वर्षांनंतर कोकणातीलच करुळ या माझ्या जन्मगावी आम्ही लहानशा ग्रंथालयाच्या उद्घाटनाला त्यांना आमंत्रित केले. त्या छोटेखानी समारंभातही ते मित्राप्रमाणे आले. तेथील ग्रंथसंपदेबद्दल अतिशय मार्मिक बोलले. यावरून त्यांचा नम्रपणा, वागण्यातील सहजता दिसून आली. माझा दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तेव्हाही त्यांनी स्वतःहून माझे अभिनंदन केले. माझ्याशी सहृदयतेने मित्रत्वाच्या नात्याने बोलले. ‘मी २८ एप्रिलला तुम्हाला ङ्गोन केला होता; पण तो लागला नाही. पण काही हरकत नाही. थोडे उशिरा का होईना; पण आता तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो’ असे म्हणाले. खरोखरच विलासरावांसारख्या इतक्या मोठ्या पदावर असणार्‍या आणि सतत व्यापात असणार्‍या माणसाला या सर्व गोष्टी कशा लक्षात राहू शकतात, याबाबतचे कुतूहल नेहमीच राहिले.

विलासरावांसोबतच्या अशा बर्‍याच आठवणी सांगता येण्यासारख्या आहेत. त्यांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील.

– मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

(गोव्याहून प्रकाशित होणार्‍या दैनिक नवप्रभा या वृत्तपत्रातून साभार)

— मधु मंगेश कर्णिक (दैनिक नवप्रभा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..