रँग्लर परांजपे यांची नात तर शकुंतला परांजपे यांची कन्या असलेल्या सई परांजपें यांना साहित्याचा आणि लेखनाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचा जन्म १९ मार्च १९३८ रोजी झाला.त्या शाळेत शिकत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मुलांचा मेवा हे त्यांचे पुस्तक १९४४ साली त्यांच्या वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांचं बरचसं लेखन हे लहान मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्यांची बालनाट्येही अतिशय गाजली. अनेक बालनाट्यांना पुरस्कारही लाभले. लहान मुलांच्या मनाच्या पातळीवर येऊन त्यातील बाल्य हेरून त्या बाल्याचे सहज रूप रंगभूमीवर उभे करून आणि त्यात बालप्रेक्षकांना गुंगवून ठेवणे हे काम दिसतं तेवढं सोपं नाही त्यासाठी सिद्धहस्त लेखक आणि जातिवंत कलावंत असण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ही भूमिका आयुष्यभर मा.सई परांजपे यांनी उत्कृष्टपणे साकार केली. त्यांच्या काही बालनाट्याची नावं जरी वाचली तरी आपले बाल्य आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. शेपटीचा शाप, जादूचा शंख, झाली काय गंमत, पत्तेनगरी, भटक्यांचे भविष्य, हरवलेल्या खेळण्यांचे राज्य, जास्वंदी, माझा खेळ मांडू दे ही त्यांची काही गाजलेली बालनाट्य. याबरोबरच चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांना चांगलेच यश मिळाले. जादू का शंख आणि सिकंदर हे दोन बालचित्रपट चांगलेच गाजले. तर बालचित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शित केलेले चष्मेबद्दूर, स्पर्श आणि कथा हे चित्रपटही त्यांचा प्रभाव दाखवून गेले. याही चित्रपटात त्यांनी सहजतेतून सौंदर्य साधले होते आणि त्यामुळे एक कलात्मक चित्रपट म्हणून ते प्रेक्षकांना आवडून गेले. हिंदी सिनेसृष्टीतील एक क्लासिक सिनेमा म्हणजे ‘चष्मे बद्दूर’. सई परांजपे यांचं दिग्दर्शन, फारूख शेख, दीप्ती नवल यांचा सहज सुंदर अभिनय, यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांच्या ‘ऑल टाईम फेव्हरेट कलेक्शन’मध्ये आजही गणला जातो. त्यांच्या स्पर्श या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सई परांजपे यांचे चित्रपट, कथा
चष्मेबहादुर
साझ
https://youtu.be/zc9rozVQQ4I
Leave a Reply