अष्टांगहृदयात मासानुमासिक पाठांचे दहा कल्प सगर्भावस्थेच्या दहा महिन्यांसाठी वर्णन केलेले आहेत. प्रचलित कालमापन पद्धतीचा विचार करता हा मुद्दा जरा संभ्रम निर्माण करणारा वाटला. प्रचलित कालमापन पद्धतीचा विचार करता हा कालावधी सुमारे ९ महिने व ९ दिवसांचा ठरतो. प्राकृत मानवी गर्भावस्थेचा काळ २८० दिवसांचा असतो हे जगमान्य, सर्वसंमत व प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे. हे कोडे उलगडण्यासाठी आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, कुंडलीशास्त्र आणि अन्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा केल्या. कोणी चांद्रमासाच्या कालगणना पद्धतीचा विचार दर्शविला पण मराठी विश्वकोशानुसार तोदेखील २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे २.९ सेकंद असा आहे. उपमास, पातिक मास, सांपातिक मास, हिजरी मास अशा अनेकविध कालगणनेचा सांगोपांग विचार केला तरीही त्यामध्ये भेद असल्याचे लक्षात आले. विविध धर्मियांच्या कालमापन पद्धतींचा विचार केला तरीही हा कालावधी तंतोतंत दहा महिन्यांचा होत नाही असे लक्षात आले. मग आणखीन काही जुन्या ग्रंथांकडे नजर वळवली. पाहता पाहता अनेक ठिकाणी गर्भावस्था दहा महिन्यांचीच असल्याचे उतारे मिळाले. अगदी ऋग्वेदापासून ते सात्यानारयानाच्या पोथीपर्यंत अनेक ठिकाणी दहा महिन्यांविषयी संदर्भ आढळले. आयुर्वेदात हा काळ सांगितला आहे म्हणून आयुर्वेदात ह्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आणि आश्चर्य म्हणजे ह्याचे अगदी चोख उत्तर मिळाले. त्यातून प्राप्त झालेले निष्कर्ष संदर्भासहित येथे देत आहोत. ज्या आयुर्वेदाचा आपण चिकित्सेसाठी उपयोग करणार आहोत त्याचाच विचार कालगणनेसाठी केला तरच चिकित्सा संपूर्णपणे यशस्वी आणि फलदायी होईल अशा विश्वासाने आम्ही “औषधी गर्भसंस्कार” पुस्तकाची व तदांतर्गत पाठांची शास्त्रशुद्ध रचना आखली. हा विचार आयुर्वेदातील प्रथितयश मान्यवर व अभ्यासू मंडळापुढे मांडल्यावर त्यांनी देखील ह्या विचारांचे स्वागत व कौतुक केले.
मासिमासि रजः स्त्रीणां रसजं स्रवति त्र्यहं l अष्टांगहृदय, शारीरस्थान १/७
ह्या श्लोकानुसार स्त्रीला नियमितपणे दर महिन्याला ३ दिवस ऋतुस्राव होतो. प्रत्यक्ष प्रमाणानुसार हा काळ २८ दिवसांचा असल्याने श्लोकाचा गर्भितार्थ १ ऋतुचक्र म्हणजे १ महिना असा ठरतो. गर्भावस्थेचा कालावधी २८० दिवसांचा व ग्रंथकर्त्यांच्या मते १० महिन्यांचा. ह्यावरून स्पष्ट होते की २८ दिवसांचे ऋतुचक्र म्हणजे १ महिना व अशी १० खंडित ऋतुचक्रे म्हणजेच प्राकृत गर्भावस्थेचा काळ अर्थात १० महिन्यांची गर्भावस्था. सोनोग्राफीमध्ये गर्भाची वाढ दर्शवितांना “अमुक आठवडे” असेच विवरण जाते. म्हणून ४० आठवडे असो किंवा २८० दिवस असो, कालगणनेचा हा विचार शास्त्रसंमत व आयुर्वेदोक्त सिद्धान्तांशी तंतोतंत जुळणारा आहे असे स्पष्ट दिसते.
गर्भावस्थेचे दहा महिने ह्याबद्दल अन्य काही ग्रंथात सापडणारे संदर्भ –
१) दशमासं गर्भवासः संदर्भ – काश्यप संहिता, शारीर स्थान, अध्याय १ श्लोक २
गर्भात उत्पन्न होणारे भिन्न भिन्न अवयव, रचना, यंत्रणा ह्यांचे प्रमाण देऊन “हे दहा महिन्यांपर्यंत गर्भात राहतात” असे ग्रंथकर्त्यांनी म्हटले आहे
२) . . . नवमे दशमे मासि नारी गर्भं प्रसूयते. . . . संदर्भ – भावप्रकाश, पूर्वखंड अध्याय २, श्लोक ३७८
आठव्या महिन्यात ओज अस्थिर असते. पुढे नवव्या महिन्यात ते स्थिर होऊन दहाव्या महिन्यात प्रसूती होते. गुल्मादिकांसारखे विकार झाल्यास हा काळ अकरा किंवा बारा महिन्यांपर्यंत वाढू शकतो.
३) तस्मिन्नेकदिवसातिक्रान्तेSपि नवमं मासामुपादाय प्रसवकालमित्याहुरा द्वादशान्मासात. संदर्भ -चरक, शारीर ४/२५
आठवा महिना पूर्ण झाल्यानंतर नवव्या महिन्यापासून पुढे बाराव्या महिन्यापर्यंत केव्हाही प्रसूती होऊ शकते. ह्या सर्व काळाला प्रसवकाळ समजावे. ह्यापेक्षा अधिक काळ राहिल्यास विकृती समजावी. दहा महिन्यांच्या काळाला प्राकृत समजावे. अर्थात दहा महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भाची वाढ परिपूर्ण होते.
४) दशमेच प्रसूयेत तथैकादशमे S पिवा. संदर्भ – हारित संहिता, षष्ठ स्थान १/२३
प्रसूती दहाव्या महिन्यात होते, परंतु क्वचित अकराव्या महिन्यातही होते.
ह्या विषयातील आयुर्वेदाचा मूळ वेद म्हणजे ऋग्वेद. ह्यातही खालील वर्णन आढळते.
विष्णुर्योर्नि कल्पयतु त्वष्टा रूपाणि पिंशतु।
आ सिव्चतु प्रजापतिर्धाता गर्भं दधातु ते ।।
गर्भ धेहि सिनीवालि गर्भं धेहि सरस्वति।
गर्भं ते अश्विनौ देवावाधत्तां पुष्करस्त्रता।।
हिरण्ययी अरणी यं निर्मन्थतो अश्विना।
तं तो गर्भं हवामहे दशमे मासि सूतवे।। (ऋग्वेद १०.१८४.१-३)
वरील श्लोकाचा अर्थ मा. वेदाचार्य श्री मोरेश्वर विनायक घैसास ह्यांच्या शब्दात :
* सर्व व्यापक परमेश्वर तुझ्या गर्भाशयाला गर्भधारण करण्यास समर्थ करो. सर्वोत्पादक परमात्मा सर्व आकाराला प्रकाशित करो. प्राणदाता प्रजापती गर्भाला प्राणशक्तीने परिपूर्ण करो. सर्वाधार विधाता गर्भाला दृष्टपुष्ट करो.
* हे चंद्रशक्ते, हे सरस्वती, तुम्ही गर्भाला स्थिर करा. हे प्रिये, सुवर्ण कमळाच्या माळा धारण करणारे अश्विनीकुमार देव तुझ्या गर्भाचे पोषण करो.
* हे स्त्रिये, अश्विनीकुमार ज्या गर्भाकरिता सुवर्णमय अरणी मंथन करते झाले त्या गर्भाला तुझ्या करिता दहाव्या महिन्यात प्रसूतीकरिता बोलवितो.
* हे नेजमेश (स्कंदग्रहापैकी एक) तू गर्भाला पिडा करणारा आहेस म्हणून तू परत जा. जर तू येणारच असलास तर उत्तम संतती घेऊन ये आणि संततीची इच्छा करणा-या माझ्या स्त्रियेच्या ठिकाणी गर्भाला स्थापन कर.
* हे नेजमेश, जशी ही पृथ्वी उत्तान होऊन स्वरलोकी सिंचित केलेले तुष्टीरूप रेत ग्रहण करून धान्यरूप गर्भाला धारण करते, तसा तू त्या गर्भाला दहाव्या महिन्यात प्रसूत होण्याकरिता धारण कर.
* हे नेजमेश, परमात्मा स्वरूप विष्णूच्या श्रेष्ठ रूपाने युक्त अशा संततीला ह्या स्त्रियेच्या वीर्याच्या ठिकाणी दहाव्या महिन्यात प्रसूत होण्याकरिता स्थापन कर.
* हे प्रजापते, उत्पन्न झालेला दुसरा कोणीही सर्व विश्वांना ग्रहण करण्यास समर्थ झाला नाही. म्हणून ज्या इच्छेने तुज करिता हवन करितो ते आमचे इच्छित पूर्ण होवो.
५. सत्यनारायण पूजा कथेत असलेले वर्णन –
दशमे मासि वै तस्याः कन्यारत्नमजायत l सत्यनारायण पूजा कथा, अध्याय तिसरा, श्लोक १३
साधुवाण्याच्या ह्या गोष्टीत सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने लीलावती गर्भवती झाली व दहाव्या महिन्यात प्रसूत झाली असा उल्लेख दिसतो.
वरील संदर्भ पाहता स्त्रीचे ऋतुचक्र व गर्भावस्था ह्यांच्या अनुषंगाने २८ दिवसांचा काळ म्हणजे एक महिना समजणे निश्चितच योग्य ठरते.
आता ह्या विषयाकडे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनेही पाहूया:
गर्भधारणेसाठी अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी जी यंत्रणा स्त्री शरीरात कार्यरत असते त्याला रजःप्रवृत्ती म्हणतात. दर महिन्याला फलकोशाच्या पोषणासाठी गर्भाशयाच्या आतील स्तर (एन्डोमेट्रियम) सज्ज होत असतो. फलधारणा न झाल्यास हा स्तर बाहेर टाकला जातो. ह्या क्रियेला मासिक रजःस्राव किंवा मासिक पाळी म्हणतात. ही प्रक्रिया वयाच्या १३-१४ वर्षापासून सुमारे ५० वर्ष वयापर्यंत दरमहा होत असते. एका ऋतुस्रावाच्या पहिल्या दिवसापासून पुढच्या ऋतुस्रावाच्या पहिल्या दिवसाच्या काळाला ऋतुचक्र म्हणतात. हे ऋतुचक्र बहुतेक २८ दिवसांचे असते, क्वचित थोडाफार बदल होऊ शकतो. ह्या ऋतुचक्रावर अंतःस्रावी ग्रंथींच्या हार्मोन्सचे नियंत्रण असते. मेंदूतील हायपोथेलेमस व पिट्युटरीच्या स्रावांचे कमी-अधिक संकेत स्त्रीबीजकोशावर प्रत्येक महिन्यात प्रभाव करीत असतात. ह्याच संकेतांमुळे स्त्रीबीजकोश व गर्भाशयाची स्थिती गर्भधारणेसाठी अनुकूल होते. प्रत्येक महिन्यात होणारी ही स्थित्यंतरे मुख्यतः इस्ट्रोजीन व प्रोजेस्टेरॉनच्या स्रावांमुळे घडत असतात. इस्ट्रोजीनमुळे गर्भाशयाच्या अंतस्त्वचेचे पोषण होते. ऋतुचक्राच्या मधोमध स्त्रीबीज परिपक्व झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण वाढू लागते. इस्ट्रोजीन सोबत कार्य झाल्याने फलधारणेसाठी सुयोग्य असे वातावरण तयार होते. विशिष्ट काळात प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण (इस्ट्रोजीन सह) झपाट्याने कमी होते व मासिक रजःप्रवृत्ती सुरु होते. ह्या अन्तःस्रावी ग्रंथींचे संतुलन बिघडले तर ऋतुचक्रामध्ये बदल होतात व वंध्यत्व निर्माण होते. गर्भधारणा हे ऋतुचक्र खंडित होण्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे. (भाषांतरित परिच्छेद)
http://www.webmd.com/women/tc/normal-menstrual-cycle-topic-overview
आयुर्वेदीय संहिता, ऋग्वेद, सत्यनारायण कथा व आधुनिक वैद्यकशास्त्र अशा विविध दृष्टीकोनातून “महिना म्हणजे काय” हे नक्की झाल्यावर आता व्यवहारातील प्रचलित भाषांचा आढावा घेऊया.
रुग्ण तपासणी करतांना वैद्य वर्ग ऋतुस्रावाबद्दल करीत असलेली विचारणा:
मराठीमध्ये : मासिक पाळी किंवा महिना बरोबर येतो का?
हिंदीमध्ये : माहवारी हुई क्या?
गुजराथीमध्ये : महिनो आव्यो के ?
म्हणूनच स्त्रीचे ऋतुचक्र व गर्भावस्था ह्यांच्या अनुषंगाने २८ दिवसांचा काळ म्हणजे एक महिना समजणे निश्चितच योग्य ठरते. ह्याच सिद्धांतांनुसार मासानुमासिक कल्पांचा उपयोग गर्भवतीने तंतोतंतपणे प्रत्येक महिन्यासाठी २८ दिवसांचे समीकरण लक्षात ठेऊन करणे जरुरीचे आहे. अशा दृष्टीकोनातून शास्त्रवर्णित श्लोक व संकल्पनांची काटेकोरपणे उकल करून चिकित्सेत वापर केला तर रुग्णहित व शास्त्र-प्रतिष्ठा अशा दोन्ही गोष्टी नक्कीच अधिक प्रभावी होतील.
लेखक : वैद्य. संतोष जळूकर, मुंबई
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज (इंडिया) प्रा. लि.
संपर्क : drjalukar@akshaypharma.com
मोबाईल : +91 7208777773
Leave a Reply