फेसबुकवरुन आलेली एका अज्ञात कवीची सुंदर रचना…
माॅलसमोरच्या भिकारणीचे केस
केवढे लांबसडक
कारमधून उतरणाऱ्या मॅडमचे केस
उंदराची शेपूट
कामवाली बाई किती तजेलदार
ताज्या मेथीच्या जुडीसारखी
मालकीण बाई नुसती रोगट
सगळ्या आजाराचं माहेरघर
मोलकरणीच्या देहाला सफरचंदाची गोलाई
ही मर्सिडीजवाली एकदम उसाचं चिपाड
मोठ्या साहेबाला होत नाही मूलबाळ
किती झाले वैद्य, हकीम,गंडेदोरे
रस्त्याच्या कडेला झोपडीत केवढा किलबिलाट
फूटपाथच्या बाजूला भरलंय गोकुळ
सायकोसोमॅटिक डिसिजेसवाल्यांना झालाय निद्रानाश
झोपेच्या गोळ्यांचा वाढतच चाललाय खप
धाडधाड चाललेल्या लोकलच्या आवाजात सुध्दा
फाटके लोक झोपलेयत डाराडूर फलाटावर
ड्रायव्हर चे केस कसे झुबकेदार
साहेब फिरवताय टकलावरून हात वारंवार
नोकर केवढा देखणा
मालक पाप्याचं पितर
कोणत्या तराजूत श्रीमंती मोजताय तुम्ही
मावत नाही सगळं जगणं नोटांमधे
सगळ्या सुखांवर नसते गव्हर्नरची सही
काही आनंद लपलेले असतात आसवातही
दोस्त ! खऱ्या जगण्याला भिडू दे तुझी जीभ
अस्सल जगण्याची चव चाख
कितीही मारली डिंग तरी
शेवटी उडणार आहे वाऱ्यावर प्रत्येकाचीच राख
Leave a Reply