[ccavlink]book-top#nachiket-0013#220[/ccavlink]
मनुष्य हा “सामाजिक प्राणी” म्हणून ओळखला जातो आणि ते खरेही आहे. मनुष्य हा मनुष्यांच्या संगतीशिवाय राहू शकत नाही.
त्यातही भारतीय माणसाचे वैशिष्ट्य असे की तो नातेसंबंधांची जपणूक भावनिक पातळीवर करीत असतो. आपल्या पूर्वजांची आठवणही तो गोत्रांच्या रुपाने ठेवत असतो. आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, खापरपणजी, खापरपणजोबा, मावशी, आत्या, काका, मामा, सासू, सासरा, असे नातेसंबंधांचे अनेक पैलू भारतीयात आढळतात. त्यांनाच आपण सोयरे म्हणतो. हे सर्व आठवायचे कारण वसंत चिंचाळकरांचे “सगे सोयरे” हे पुस्तक वाचतांना हे सर्व नातेसंबंध सहज आठवले.
या सोयर्यांप्रमाणेच सगे सुद्धा मानवी जीवनात महत्वाचे स्थान बाळगून असतात. सोयरे जेव्हा जवळ नसतात तेव्हा हे सगेच आपल्या जीवनात महत्वाचे स्थान बाळगून असतात. त्यांची आपल्याला जी साथ असते ती सोयर्यांपेक्षा जास्त जवळची आणि घट्ट विणीची असते. या सग्यांमध्ये केवळ माणसं नसतात तर तुम्ही पाळलेले प्राणी असतात, तुम्ही जिव्हाळ्याने बांधलेले घर असते आणि तुमचे बालपण ज्या गावात व्यतीत झाले त्या गावच्या आठवणीही असतात. या आठवणी तुमची सोबत सग्यांप्रमाणेच करीत असतात आणि तुमच्या जीवनात नवे चैतन्य भरत असतात.
वसंत चिंचाळकर यांचे “सगे सोयरे” हे नवीन पुस्तक मानवी नातेसंबंधाच्या घट्ट विणीची जाणीव करून देणारे, अत्यंत आल्हाददायक असे पुस्तक ठरले आहे. कथाकार म्हणून वसंत चिंचाळकर हे सर्वांना परिचित आहेत. पण कथेच्या चौकटीत ज्या माणसांना बसवता आलं नाही, त्यांना व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून अजरामर करण्याची किमया वसंत चिंचाळकर ह्यांनी आपल्या व्यक्तिचित्रणातून साकारली आहे. प्रतिभावंतांचा प्रतिभा-स्पर्श ज्यांना होतो. त्यांचे स्वरूप पालटून टाकण्याची किमया त्यांना साधली आहे. त्यामुळे ते ज्या व्यक्तिरेखा आपल्या लेखनातून साकारतात, त्यांची नव्याने ओळख होते त्यांचे देखिलेले पैलू त्यांच्या लिखाणातून गवसतात आणि प्रतिभेच्या सामर्थ्याचा अनोखा प्रत्यय येतो.
“सगे सोयरे” या पुस्तकात 38 व्यक्तिरेखा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यात त्यांनी राजकारणातील अद्भुत वाटलेल्या व्यक्ति, सामाजिक जीवनावर ज्यांनी ठसा उमटविला आहे अशा गाडगेबाबा, बाबा आमटे यांच्या सारख्या व्यक्ति, संगीत आणि चित्रकला ह्यांचा हस्त ज्यांनी मनावर उमटविला अशा पद्मजा फेणाणी, शोभा जोशी, अलमेलकर यांच्यासारखे कलाकार, जीवनाच्या प्रवासात भेटलेल्या तुळसा काकी, डॉ. विकास महात्मे, रिझर्व्ह बॅंकेचे महाप्रबंधक, एस.आर.मित्तल, अशी वेगळ्या वळणाची माणसं, तसेच पहाट पाऊस वैशाख वणवा, जन्मघर यासारखी भौतिकाची वर्णने, यातून लेखकाचे भावविश्र्व जीवनातील तरलता टिपणारे असे आहे याचा प्रत्यय येतो. यातील काही व्यक्तिचित्रणे ही प्रासंगिक वृत्तपत्रीय स्वरूपाची आहेत. गाडगेबाबा, राजर्षि शाहू महाराज, राजे रघुजी, जवाहरलाल दर्डा ही व्यक्तिचित्रणे प्रासंगिक स्वरूपाची प्रसंग आला म्हणून लिहिलेली आहेत. त्यामुळे या चित्रणात सखोलता जाणवत नाही पण व्हर्जिनिया वुल्फ, चित्रकार अलमेलकर, गायिका स्वरराधा पद्मजा फेणाणी यांच्या विषयी लिहितांना लेखक त्या व्यक्तिंशी एकरूप झाल्याचे जाणवते. या व्यक्तिरेखा “सगेसायरे” तील सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा म्हणून निर्देशिता येतील. अर्थात इतर व्यक्तिरेखा दुय्यम स्वरूपाच्या आहेत असे मला म्हणायचे नाही. ज्या ज्या व्यक्तिंविषयी लिहावेसे वाटले त्या त्या व्यक्तिंविषयी त्यांनी पोटतिडिकेने लिहिलेले आहे. पण अशावेळी त्या व्यक्तीचे काही विशिष्ट पैलूच चिंचाळकरांच्या प्रतिभेला पकडता आले आहेत. ते पैलू त्या व्यक्तीचे गुणवैशिष्ट्य आहेत हे तर निर्विवादच आहे. पण एक समग्र आकृतीबंध त्यांना या व्यक्तींच्या संदर्भात उभा करण्यात यश लाभलेले नाही हे ही तितकेच खरे.
जेथे ललित लेखन करण्याचा प्रसंग येतो तेव्हा चिंचाळकरांच्या लेखणीचे खरे सामर्थ्य लक्षात येते “कमलजींच्या कोवळ्या तनुलतेला आलेले हे फुलारे मग बर्फराशींच्या पार्श्र्वभूमीवर पेटलेल्या पळसबनासारखे वाटतात” (काश्मिरी काव्य) ङ्गसत्य हे सूर्यप्रकाशासारखे असते. ते स्वीकारले पाहिजे. परंतु जेथे सत्य हे असत्याच्या अवगुंठनात येते आणि सत्याचा अपलाप करते तेथे ते असत्य होतेङ्घ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) ङ्गदूरवर छेडली जाणारी एखादी अस्पष्ट धून कानी पडावी, ती आतवर भिनत जावी नी माणूस एका वेगळ्या विश्र्वात लोटला जावा. तसे काहीसे इथे होऊन जातेङ्घ (व्हर्जिनिया वुल्फ) अशी अनेक वाक्ये उद्धृत करता येण्यासारखी आहेत. वसंत चिंचाळकरांची शब्दकळा दाखविण्यासाठी ती पुरेशी आहेत. एकूणच एका प्रतिभाशाली लेखकाने टिपलेली ही व्यक्तिचित्रणे मराठी साहित्य समृद्ध करणारी आहेत, यात शंका नाही.
सगे सोयरे
पाने : 240, किंमत : रु. 200/-
नचिकेत प्रकाशन
[ccavlink]book-bot#nachiket-0013#220[/ccavlink]
— श्री.अनिल रा. सांबरे
Leave a Reply