रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली होते, ते त्यांचे मामा सागर यांना दत्तक गेले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव रामानंद ठेवले गेले. मामाच्या घरी गरिबी असल्यामुळे लहान वयात ट्रक क्लिनर, ऑफिस कार्यालयात शिपायाचे काम अशी विविध कामे त्यांनी केली. मुळात साहित्याची आवड असल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी ‘प्रितम प्रतीक्षा’ हे काव्य काश्मीर येथील प्रताप कॉलेजच्या मासिकासाठी लिहिले. पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मुन्शी फझल’ असा पर्शियन किताब व सुवर्णपदक बहाल केले. १९३३ पासून साहित्य-काव्य-लेखन कार्यात ते मग्न झाले. वृत्तपत्रांतून स्तंभ लेखनाचे काम मिळाले. त्यांच्या लेखणीतील एक निराळी जादू लोकांना प्रभावित करू लागली. पंजाबमधील ‘मिलाप’ या वृत्तदैनिक पत्रिकेमध्ये पत्रकार म्हणून नियुक्ती झाली. ३२ कथा, ३ प्रदीर्घ कथा, २ नाटके, कादंबरी, दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण केले. १९४२ मध्ये त्यांना क्षयरोगाने पछाडले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले. स्वत:च्या अनुभवावरून ‘एका क्षयरोग्याची डायरी’ हे लिखाण केले. आयुष्याला वेगळं वळण मिळावं म्हणून कुटुंबासह ते मुंबईला आले. बरेच दिवस मुंबईत त्यांचा जम बसत नव्हता. त्या हालाखीच्या दिवसांत त्यांनी ‘और इन्सान मर गया’ हे उर्दू, हिंदी भाषेत अप्रतिम वास्तव चित्रण सादर केले. या पुस्तकाला अमाप लोकप्रियता लाभली. १९४२ मध्ये प्रकाशित झालेला दिलीपकुमारचा प्रथम चित्रपट ‘ज्वारभाटा’ याचे कथा लेखन केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लेखन निर्मितीला सुरुवात केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे ते चमकत राहिले. त्या आधी लाहोर येथे तयार केलेल्या ‘रायडर ऑफ द रेल रोड’ या मूकचित्रपट निर्मितीच्या वेळी क्लॅपर बायचे कामही त्यांनी केले. कुठलेही काम करण्यात कमीपणा मानायचा नाही असा त्यांचा स्वभाव होता. १९४९ मध्ये आर के निर्मित ‘बरसात’ चित्रपटाचे कथानक संवादलेखन केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्या आधी पृथ्वी थिएटरच्या नाटकासाठी त्यांनी लेखन केले होते. १९५० मध्ये सागर आर्टस्’ या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. १९५१ मध्ये ‘मेहमान’, ‘बाझूबंद’, १९५० मध्ये ‘बडी बहू’, १९५३ मध्ये ‘संगदिल’, १९५५ मध्ये ‘इन्सानियत’, १९५८ मध्ये ‘पैगाम’, ‘राजकुमार’, ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी लेखन केले. तसेच १२ दूरदर्शन मालिका चित्रित केल्या. १९६० ते १९६४ या कालावधीत ‘घुंघट’, ‘जिन्दगी’ या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शक, प्रोडय़ुसर म्हणून काम केले. मद्रास येथील जेमिनी या चित्रपटसंस्थेला आर्थिक सहाय्य केले होते. १९८६ सालापर्यंतच २५ चित्रपटांची निर्मिती केली. २९ चित्रपटांसाठी कथानक लेखन केले- त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. ‘आरझू’, ‘ललकार’, ‘चरस’, ‘बगावत’ या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवाचे यश प्राप्त केले. २५ चित्रपटांना सिल्व्हर ज्युबिलीचे यश लाभले. सागर आर्टस्च्या जवळपास २५ यशस्वी चित्रपटांचे सरासरी एकत्रित यश एकटय़ा ‘रामायण’ व ‘श्रीकृष्ण’ मालिकेला मिळाले. दूरदर्शनच्या माध्यमातून डॉक्टर रामानंद सागर यांनी निदर्शनास आणून या माध्यमातून ते उत्कृष्ट वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात व ज्ञान, मनोरंजन पुरवू शकतात हे दाखवून दिले. चित्रपटांमधून व्यावसायिक यश मिळविल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर छोटय़ा पडद्याकडे वळले व त्यांना धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा प्राप्त झाली. १९८५ ते २००२ या कालावधीत सुमारे २००० तासांचे चित्रीकरण त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी केले. ‘रामायण’ या मालिकेचे डॉ. रामानंद सागर यांनी भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे सृजनात्मक पद्धतीने सादरीकरण करून सर्वसामान्य जनमानसात मानाचे स्थान मिळविले. रामायणाची संकल्पना कल्पनेने सादर करून, लेखन, दिग्दर्शन, निर्माता या नात्याने तिन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळून धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली. तद्नंतर ‘श्रीकृष्ण’ ही महामालिका दूरदर्शनसाठी केली. ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘जय गंगा मय्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. फ्रान्स, जपान, लंडन बी. बी. सी.वर त्यांच्या कथांचे वाचनही झाले. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले. त्याआधी १९९७ मध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) जम्मू युनिव्हर्सिटी, ‘साहित्य वाचस्पती’ हिंदी साहित्य संमेलन प्रयाग-अलाहाबाद यांनी पदवी प्रदान करून गौरविले. मा.रामानंद सागर यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.शरद मेहेत्रे.
Leave a Reply