21 ऑगस्ट 1914 हा आहे डग्लस विविअन पार्सन राईटचा जन्मदिवस. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा त्रिक्रम घडविण्याचा विक्रम डग्लसच्या नावावर आहे. 497 प्रथमश्रेणी सामन्यांमधून 2,056 बळी घेताना त्याने एकूण सात वेळा त्रिक्रम रचलेला आहे. कसोट्यांमध्ये त्याने 34 सामन्यांमधून 108 बळी मिळवलेले आहेत. खासियत प्रत्येक बळीमागे तब्बल 39.11 धावा मोजणे. खराब चेंडू सतत टाकण्याची खराब सवय त्याला होती.
21 ऑगस्ट 1986
मरिवान्हा या मादक आणि उत्तेजक द्रव्याचे सेवक केल्याबद्दल मिळालेली बंदीची शिक्षा भोगून ‘बीफी’ इअन बोथम ओवलवरील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याद्वारे कसोटीविश्वात पुन्हा प्रवेशता झाला. आपल्या पुनर्प्रवेशानंतरच्या पहिल्याच चेंडूवर बीफीने ब्रूस एडगरला झेलबाद केले आणि सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या डेनिस लिलीच्या (तत्कालीन) विक्रमाशी बरोबरी केली. ग्रॅहम गूच त्याला खोचकपणे आणि मार्मिकतेने विचारला झाला, “अरे बीफी, तुझ्या संहिता (स्क्रिप्ट्स) लिहिते कोण?” नाटक-सिनेमांमधील कलात्मकता आणि आकर्षकता टिकून रहावी म्हणून साहित्यिकांकडून काळजीपूर्वक तिच्या संहिता लिहिल्या जातात. इथे गूचला बोथमची ही ‘कलाकारी’ दाखवायची आहे. याच दिवशी जेफ क्रोला पायचित पकडून बोथमने त्याचा कारकिर्दीतील बळी क्र. 356 मिळवला आणि लिलीचा विक्रम मोडला. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने अवघ्या 36 कंदुकांवर नाबाद 59 धावाही तडकवल्या. 15 ऑगस्टच्या किश्श्यातील फ्रेड ट्रूमनचा ’थकलेला’ संघभाऊ दुसरा-तिसरा कुणी नव्हता. 15 ऑगस्ट 2010ला मी घेतलेले एक स्वातंत्र्य आज संपुष्टात येत आहे. झां झ्याक रूसोने म्हटल्याप्रमाणे मनुष्य खरोखरच स्वातंत्र्याची शिक्षा भोगणारा प्राणी आहे काय?
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply