नवीन लेखन...

साधनेतील ईश्वरी अनुभव

बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. जीवन म्हणजे काय ? कसे जगायचे ?कसा व्यवहार करायचा? कशी दिनचर्या असावी ? याची पुरेपुर संकल्पना त्यांत होती. शरीर मनाला त्या प्रमाणे वाकविले जात होते. आदर्श जीवन चौकटीत त्याला बंदीस्त करण्याचा प्रयत्न होत होता. प्रथम आई वडील, गुरु, शाळा शिक्षण क्षेत्रे कुटूंब समाज ह्या सर्वानी आप आपल्यापरीने आघात करणे चालू ठेवले होते. परंतु ‘हे असे करा’ हे कुणी सांगितले नाही. प्रत्येकाने ‘असे असावे’ हेच तत्वज्ञान माझ्यावर अप्रत्यक्षपणे आदळत ठेवले. त्यांत धर्म, जात, ईश्वरी संकल्पना, व सामाजिक व्यवहार हे प्रामुख्याने असलेले विषय. ह्या सर्वांचा आधार घेऊनच प्रगती करा, यश मिळवा, ध्येय साध्य करा हे मार्गदर्शन असे. मार्ग तर अनेकांनी अनेक व निरनिराळ्या पद्धतीने सांगितले. काय, कोणते, व कसे हे सारे सत्य आहेत. ह्याची उकल मात्र प्रत्येकाच्याच अनुभव ज्ञानसंपदेवर सोडलेली होती. ज्ञान घ्या, त्यांत वृद्धी करा, आणि अनुभव संपन्न व्हा. तुमचा आपला अनुभव, आपला आत्मिक हूंकार, हीच ईश्वरी चेतना असेल. त्यालाच कदाचित् ईश्वरी दर्शन समजा. ते फक्त तुमचेच असेल. इतरांच्या अनुभवांची थोडी सुद्धा त्यावर छाया पडता कामा नये. कदाचित् थोडेसे मार्गदर्शन. बस एवढेच. म्हणून म्हणतात की तुम्ही ह्या जगांत ‘एक वैशिष्ठपूर्ण आहांत’ तुमची महानता, मोठेपणा ही तुमचीच असेल. परंतु हे तुम्ही जाणले पाहीजे. प्रथम ज्ञानसंपादन, नंतर अनुभव व शेवटी जाण. अर्थात ईश्वरी जाणीव. ह्या पायऱ्या अत्यंत महत्वाच्या आहेत. परंतु एक उकल लक्षांत ठेवा. तुमच्या ह्या प्रवासांत भावनांची आणि षडरिपूंची सतत घुसखोरी चालू असते. ते तुमच्या प्रगती व ध्येयासाठी हानीकारक असतात. येथेच अनेक जण वाहून जातात. कांहीं जाणून तर कित्त्येक अजाणता. लाखात एक, नव्हे कोट्यावधीमध्ये एखादाच तयार होतो जो ही संसारीक वादळे, महापूर पार करुन किनारी जावू शकतो. बाकी तर फक्त डुबक्या घेतच आयुष्य गैरसमजावर, अज्ञानावर आरुढ होऊन भोवऱ्यांत अडकून जातात.

नुकतीच पंचाहत्तरी (७५) लागली. आयुष्याचे अनेक रंग रुप बघितले, अनुभवले आणि जाणले देखील. उर्वरीत आयुष्य अर्थात अनिश्चिततेचा अल्प काळ. हे दोन आघाड्यावर असल्याचे भासले. १. वेळ – अत्यंत महत्वाचे. वेळ कसा व्यतीत कराल. जीवनांत आजपर्यंत सतत धावपळीत, परिस्थितीशी झगडण्यांत, कांहींतरी प्राप्त करुन घेण्यांत वेळ दवडला. हाती वेळ कमी होता. समोर आलेली वा निर्माण केलेली प्रचंड कार्ये वाट बघून होती. त्याची पुर्तता करण्यांत अनेक कारणे होती . त्यापैकी ‘ वेळ ‘ हे अंग अद्दष्य व अलिखीत. परंतु प्रमुख होते. वैचारीक समजानुसार महत्वाचे, तरीही दुर्लक्षीत होते. दुर्दैवाने ‘ त्या वेळेची जाण ‘ वेळीच न आल्यामुळे जीवनांत खुपसे गमावून बसलो. ह्याची जाण, ती अर्थांत, वेळ गमाऊन बसल्यानंतर होत आहे. जी ह्या जन्मी पुन्हा केंव्हांच लाभणार नाही. आता त्याची खंत ह्या उतार वयांत वाटूं लागली. आता मात्र ‘ वेळ घालविणे वा व्यतीत करणे ‘ ही समस्या समोर येत आहे. मिळालेला वेळ अनिश्चित हे एक सत्य. तसेच त्या अल्प वेळेचा जास्तीजास्त उपयोग करुन घेणे, हा विचार होता.

२. स्वतःची प्रकृती – ही सांभाळणे, सुदृढ, तन् दुरुस्त ठेवणे. ही अत्यंत महत्वाची बाब. कल्पनेच्या सर्व समस्यांची सोडवणूक फक्त शरीरप्रकृती नुसार होते. ती ठरविली जाते’ वयानुसार अशक्त होऊ जाणारी व व्याधीना तोंड द्यावे लागणारी देणारी, शरीर मनाची अवस्था ह्यावर ‘. दोन आघाड्या, वेळ नी प्रकृती ह्या नैसर्गिक भागाची जाण ठेऊनच आयुष्याची दखल घ्यावी लागणार होती.

शरीर प्रकृतीधर्मानुसार ‘ इतरासाठी काहीं करणे ‘ सामाजिक कार्यांत रस घेणे ह्या मार्गाना, निसर्गच बंधन घालण्याचा प्रयत्न करतो. वैचारीक ठेवणच तशी बनते. ‘ आता अल्प काळ हाती आहे. शरीर मनाला उत्साहीत, सुदृढ ठेऊन अनंताच्या प्रवासाला जाण्याची तयारी ठेवा ‘ हाच निसर्ग संदेश एक गमतीदार प्रसंग आठवला. एका मित्राने उपदेश केला तुम्ही जेष्ठ आहांत. म्हातारे होत चाललात. शारीरिक हालचाली खुपच थंडावल्या आहेत. फक्त गरजेपुरतेच आवयव मर्यादित् साथ देतांत. कांहीं अवयवांनी आपल्या कार्याला कायमचा पू्र्णविराम दिला आहे. मात्र मेंदू प्रमुख. तोही अडखळत चालतो. परंतु सतर्क व उत्साही राहीलांत तर तो तुम्हास शेवटपर्यंत साथ देऊं शकतो. १- वातावरण ( निसर्ग निर्मीत), २ परिस्थीती (मानव निर्मित), आणि ३ मानवी वैयक्तीक स्वभाव ठेवण, ह्या जीवन त्रिकोण बद्धतेमध्येच प्रत्येकजण आनंद-समाधान- शांतता ह्याचा शोध घेत जातो. मात्र जीवनांत सदैव सकारात्मक दृष्टीकोण असावा. तरच आयुष्य सुकर होते.

चांगल्या सवई, छंद हे पुर्व आयुष्यांत लावून घ्यावे, बाळगांवे लागतात. त्यामुळे म्हातारपणात ते तुमचा वेळ व काळ समाधानाने व्यतीत घालवितां येतो. दुर्दैवाने तुम्ही कोणताच छंद जोपासला नसेल, तरी चागले छंद हे केंव्हाही जोपासता येतात. फक्त प्रभळ इच्छाशक्ती, आन्तरीक चेतना, व सकारात्मक द्दष्टीकोण असावी लागते. ह्या वयाच्या मोडवर, कोणता छंद जोपासावा. चिंतन केल्यानंतर ठरविले.

की संगीत क्षेत्रांत आपले मन रमवावे. संगीत ही ईश्वरी कला आहे. त्याचे एक वेगळेच दालन. श्री सरस्वतीदेवी ही कलेची आराध्य देवता समजली गेली. कलेचे अनेक प्रांत आहेत. सर्व श्रेष्ठ आहेत. त्यापैकी एकाची निवड करावी. आवड व शक्यता ही दोन मोजमापे असावी. एखादी कला मिळवणे, त्यांत रममान होणे, देहमनाने त्याच्याशी एक रुप होणे, हीच खरी ‘ साधना ‘ असेल. आपल्या इच्छेप्रमाणे, माहितीप्रमा हे, अस्तित्वात असलेल्या ज्ञानाप्रमाणे, कदाचित् ते ईश्वरी दर्शन मिळणार नाही. मात्र ज्या साधनेंत एकरुप व्हाल, त्यांत मिळणारा आनंद, समाधान, शांतता हेच ईश्वरी दर्शन असेल. मात्र ते फक्त करणाराचेच. त्याला रंग, रुप, आकार इत्यादी परिमाणे केंव्हांच नसतील. ते सतत बदलणारे, व ‘ आनंद ‘ वाढविणारे असेल. ते फक्त अनुभवता येईल. शब्दांनी व्यक्त करता येणार नाही. जर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर समजा ” तूम्ही अजून कच्चे आहांत.परिपूर्ण झाला नाही. व्यवहारी व संसारीक जगांतच फिरता आहात. पुन्हा प्रयत्न चालू ठेवा . काय अनुभवल? कसा आनंद मिळाला? ही संकल्पनाच संपू्र्णपणे उपभोगून विसरुन जा. तोच ईश्वर जाणण्याचा यशस्वी क्षण असेल. “अनुभवने, जाणने, मात्र विसरुन जाणे हेच जीवनाचे साध्य असावे. ”


त्यांत न गुरफटता वा अडकता. नसता तुमचा अहंकार जागृत ठेवण्याचे ते काम होईल. जे तुम्हास मोठेपणाचा भाव ( ‘अहं ‘ ) आणित सदा अपूर्णते मध्येंच ठेवेल. कोणती संगीत कला अन्तरमुख करण्याचा प्रयत्न करावा. सारे कांही एकदम अपरिचीत्. कसलाच गंध नाही. आगदी नविन दालन. वय ज्यास्त. हाती वेळ तसा मर्यादित् . केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारुन समाधान शोधणे हा अविचार ठरेल. तो फक्त निराशेच्या वातावरणांत ढकलेल. मला काळ, वेळ, शक्यता, क्षमता, विषयाची झेप, ह्या बाबींचा सुक्ष्मपणे विचार करावाच लागणार होता. केवळ चांगले वाटले, भावना उसळली, भव्यता दिसली, ह्या गोष्टीवर चिंतन करावे लागणार आहे. हे सर्व शांत चित्ताने, वेळ घेत, प्रत्येक द्दष्टीकोणातून ( From every Angle ) विचार करणे सुरु केले. शिवाय हा फक्त माझाच विचार होता, कारण तो माझ्याच संबंधीत होता.

Vocal Music अर्थात स्वर संगीत हे शक्यच नव्हते. आवाज चांगला नव्हता. त्यांत स्थिरता नव्हती. कंपन होते. त्यामुळे त्याचा विचार बाध केला. Instrumental Music वाद्य संगीत ह्यावर विचार केला. अनेक वाद्ये समोर आली. परंतु प्रत्येकांत कोणत्या ना कोणत्या शरीर अवयवांचा संबंध येत होता. जसे फुंकणे, बोटाच्या हालचाली, हातांच्या पंजाचा ठेका, वा इतर. म्हातार वयांत त्या अवयवावर तान देणे, ते टिकवून राहणे, तासा-तासाची क्षमता बाळगुन ते करण्याचा प्रयत्न करणे, हे सर्व आवघड वाटू लागले. आपली शारीरिक क्षमता किती व कोठपर्यंत साथ देईल, ह्या बद्दल मन साशंक होते. शेवटी सर्व साधारण वाजवण्यांत येणारी दोन वाद्ये समोर आली. 1 न्यु हार्मोनियम (New Harmonium ) आणि 2 पियानो (Piano) ( अथवा कँसियो (Casio) ,सिन्थसाईझर ( Synthesizer ), दोन्हीची रचना व संकल्पना सारखीच. दोन्हीत बोटांचे कौश्यल्य हवे. Piano मध्ये विजेचा वापर, परंतु श्रम कमी म्हणून ते वाद्य निवडले. त्याला लागणारे सर्व साहीत्य गोळा केले. त्या विषयींची पुस्तके, मासिके, लिफलेट्स, व गुगल वा ईन्टरनेटवर मिळणाऱ्या वेब साईट्स. सर्वावरील माहिती संकलीत केली. परंतु हे सारे नविन असल्यामुळे ती कला शिकवणाऱ्या गुरुचा शोध घेतला. त्यासाठी Musical Academy च्या क्लासमध्ये नांव घातले.
पियानो ह्या वाद्य प्रांतातले अ आ ई— अर्थात CDEFGABC–ह्या धड्यांना सुरवात केली. प्रथम देवी श्री सरस्वतीची, नंतर वाद्याची पुजा केली. गुरुला अभिवादन करुन आरंभ केला. हालके हालके प्रगतीपथावर चालू लागलो. त्यांत मन रमु लागले. वेळ समाधाने व्यतीत होऊ लागला. मनाला शांतता वाटू लागली. ह्या छंदमध्ये अत्यंत महत्वाचे म्हणजे ती कला वा वाद्यसाधना, ईश्वरी आनंद व जाणीवेत घेऊन जाणारी असावी ही प्रमुख धारणा होती.
गुरुनी स्वर शब्दांची ओळख सराव करुन दिली. नंतर एक हलके फुलके गाण्याचे नोटेशन दिले व तसा सराव करण्यास सुचविले. एका प्रसिद्ध जुन्या गाण्याचे ते बोल होते.
प्यार हूवा, ईकरार हूवा है , प्यारसे फिर क्युं डरता है दिल,
कहता है दिल रस्ता मुशकिल मालूम नही है कंहा मन्जील ।।
जुणे गाणे अप्रतिम, बोल सुरेख. शब्द रचना चांगली. दिलेली चाल व संगीत माधुर्य मनाला रममान करणारे होते.
मार्ग दशर्नाप्रमाणे प्रथम दररोज त्या गाण्याचे ध्वनिमुद्रित केलेले बोल ऐकू लागलो.

त्यातील लकबा. ताना, सुर, लयी, ठेके, इत्यादीवर लक्ष्य केंद्रित केले. सतत ते गाणे गुणगुणने, ते पाठ करणे, हे सारे सुरु झाले. सारे फक्त स्वतःकरीताच होते. तेंव्हां फिरावयास जाताना, बागेत वा कोठेतरी एकांतात बसलो असताना, जेंव्हा जसा वेळ मिळेल तसे ते गाणे आत्मसात करण्याचा प्रयत्न चालू होता. तेच तेच बोल ह्याचा सराव करण्यांत वेळ जाऊ लागला. ह्यात एकांतवास आवडू लागला. इतर व्यवहारीक हालचाली, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, चर्चा वादविवाद, इत्यादी बाजुस सारले जाऊ लागले. फक्त एकच ध्येय व त्याची प्रचंड जिज्ञासा लागुन राहीली. प्रथम गाणे आत्मसात करणे व मग त्याचे बोल ( नोटेशन) पियानोवर वाजविणे.

मनाची द्विधा परिसिथीती झाली होती. सर्व हालचाली समोर आल्या. मन फार बेचैन झाले. ह्या प्रयत्न्यात मी अडकून गेलो होतो. समोरचे ध्येय हे फार उच्य होते. कलेला जाणने, तीच्याशी एक रुप होणे, सर्व आनंद लुटणे, समाधान व शांता प्राप्त करणे हा प्रमुख उद्देश. मात्र जे होऊं लागले ते एकदम विपरीत वाटू लागले. जो पर्यंत गुरुजीनी स्वर बाराखडी शिकविली. Casio key Board चे नोटेशन, स्केल, काळ्यापांढऱ्या पट्या, त्यातील सुर, बोटांचे ठरलेले स्पर्ष समजून करु लागलो. गाणे, गाण्याचे बोल त्याचा सराव, रियाज होऊ लागला. मन कसल्यातरी विचारांनी बोलांच्या प्रथःकरणानी बेचैन व विचलीत होऊ लागले. गाण्याचे सर्वांगाने महत्व काळ, वेळ, आयुष्य आवडी निवडी ह्याच्या चौकटीमध्ये असते. तरच त्याचा आनंद लुटता येतो. ही जाणीव येऊ लागली. वाढत्या वयानी त्या गाण्याच्या मधूर चौकटीला आत्मसात करण्याचे नाकारले. मग आनंद कसा येणार. कसला प्यार—, कसला इकरार—, क्या दिल कहता है—, सारे सारे मजसाठी काल बाह्य झालेले, भावना सुकून गेल्या होत्या. हे मला जाणवत होते. अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या ध्येयानी प्रेरीत होऊन, त्याकडे मी झेप घेत होतो, ती मला निराशेच्या खाईत ढकलत होती. मला हवी होती कला, संगीत, आत्मिक समाधान. व ते करीत असता ईश्वरी आराधना साधणे. त्या श्री सरस्वतीशी एकचित्त होणे. परंतु हे दुर राहूं लागले. त्या गाण्याच्या शब्दांनी, सुर तालाने, मला आनंद मिळत होता. पण समाधान होत नव्हते.

मी माझ्या अध्यात्मिक गरुकडे ह्याची तक्रार केली. मी प्रयत्न करीत आहे. मुख्य हेतू ईश्वरी आराधना, त्याचे सान्निध्य हे आहे. मग मी निराश कां. कोठे चुकतो प्रयत्न. मला जे मार्ग दर्शन मिळाले ते असे होते. आपण त्या ईश्वराला, विचारांनी भावनेने व मिळालेल्या ज्ञानानी जाणले. परंतु तो ह्या सर्व ज्ञान संपदेच्या बाहेर आहे. त्याला खऱ्या अर्थाने कुणीही बघीतले नाही. हे सत्य. मात्र त्याला अनेकांनी अनुभवले आहे हेही एक सत्य. तो फक्त अनुभवांत, उर्जा रुपांत असतो. त्यामुळेच सर्व व्यापी सर्व श्रेष्ठ, अविनाशी इत्यादी गुणानी परिपुर्ण आहे. जो जसे वर्णन करेल, जसा भाव प्रकट करेल त्याच्यासाठी परमेश्वर तसांच असेल. वर्णने बदलतात, भावना बदलते, तसा तोही बदलत जातो. म्हणून तो विविध अंगी आहे.

मग ते गाणे — प्यार हूवा, ईकरार हूवा है , प्यारसे फिर क्युं डरता है दिल,
कहता है दिल रस्ता मुशकिल मालूम नही है कंहा मन्जील ।। —
अथवा इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची—।।

असो

प्रेम गीत, भजन, अभंग, प्रार्थना, वा इतर कोणती संगीतबद्ध योजना. सर्व सुर-शब्द बद्ध असतात. मात्र ईश्वर ह्या शब्दांनी पकडता येत नाही. संगीत, सुर ताल, ठेका, इत्यादी अविष्कारांनी देखील पकडता येत नाही.

मात्र हे ही सत्य आहे की ईश्वर शब्दांत-सुर-तालांत असतो. असणे व पकडला जाणे खुप भिन्न आहेत. तुमची आराधना वरच्या दर्जाची असावी, अतःकरणातून आलेली असावी, भावनांच्या गुंत्यात नसावी, वासनेपासून अलिप्त असावी, हे दिव्य ईश्वरी अनुभवांसाठी प्राथमिक व महत्वाचे. तुम्ही संगीत साधना करताना अर्थ, शब्द, सुर, ताल, इत्यादींचे मुखवटे पुर्णपणे विसरुन, त्याच्या आत्म्यात शिरा. फक्त लयामध्ये, निनादांत, त्या लहरीमध्यें एकरुप व्हा. संगीताला विसरा, स्वतःला पण विसरा. मग बघा कसा ईश्वरी साक्षातकार होतो तो. ते सांगुन होणे शक्य नाही. हे फक्त अनुभवून, जाणूनच शक्य आहे. जेंव्हा शब्द विसरले जातात, सुरताल विसरले जातात, तुमच्या त्याच्याशी तादात्म होणाऱ्या भावनापण हलक्या होऊ लागतात, साऱ्या चौकटीची पकड ढिली होते.

राहते ती फक्त ‘एक जाणीव’. अर्थात Reality Consciousness . ही स्थिती अत्यंत परिश्रमानी, तपश्चर्येनी साधता येते. तुमचे राग, लोभ, निराशा, तुमच्या समजुती, वासना, यामुळे त्यांत बाधा येते. त्याना बाजूस सारा. कलेची तुलना करु नका. ते शब्दांत गुरफटने होईल. शब्द नको, भावना नको, फक्त एकाग्रता ह्यांत रममान होण्याचा प्रयत्न असावा. हाच कलेतील ईश्वरी शोध असेल. मला माझ्या साधनेचा खरा अर्थ ज्ञात झाला. फक्त ‘आनंद हाच भगवंत ‘ असेल.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी ***३१
जेंव्हा पडले पाऊल पहीले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दुर जाण्याची तुज पासूनी त्याच क्षणीं


— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..