13 ऑगस्ट 1945 रोजी सिमल्यात रॉबिन डेविड जॅकमनचा जन्म झाला. याची जीवनकहाणी तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये विखुरलेली आहे. त्याचा जन्म भारतात झाला पण त्याचे बालपण बहुतांशी इंग्लंडमध्ये व्यतीत झाले. ब्रिटिशांच्या आफ्रिका खंडातील वसाहतींमुळे जॅकमन कुटुंबाचे दक्षिण आफ्रिकेशी घनिष्ट संबंध होते. र्होडेशिया प्रांताच्या संघाला तो प्रशिक्षण तर देईच पण त्या संघाचा तो एक खेळाडूही असे. या रॉबिनमुळे एक कसोटी सामना रद्द झाला होता –
1980-81च्या हंगामात वेस्ट इंडीज दौर्यावर जाणार्या संघात त्याची निवड झाली. दौर्यावरील पहिल्या सामन्यात तो खेळणार्या अकरांमध्ये नव्हता. दुसरा सामना होता गुयानातील जॉर्जटाऊनमधल्या बोर्डा मैदानावर. गुयानाच्या सरकारने रॉबिन जॅकमन गेली 11 वर्षे ‘वर्णभेदी’ दक्षिण आफ्रिकेत खेळलेला आहे आणि तिकडे त्याने प्रशिक्षणाचे कामही केलेले आहे या सबबीवर जॅकमनचा व्हिसा जप्त केला. गुयानाच्या भूमीतील त्याचे वास्तव्य आता ‘बेकायदेशीर’ असणार होते. असल्या राजकीय कारणापुढे न झुकण्याचा निर्णय ब्रिटिश मंडळाने घेतला (अहो एके काळी अर्ध्या जगावर राज्य होते त्यांचे). हा सामना एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला. ब्रिजटाऊनमध्ये अखेर त्याला पदार्पणाची संधी मिळाली – वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्याने आयुष्यातील पहिले कसोटी षटक टाकले आणि त्यात एक बळीही मिळवला. आणखी तीनच सामन्यांमध्ये तो खेळला.
दक्षिण आफ्रिकेशी असलेला त्याचा संबंध अजूनही संपलेला नाही. ‘सुपरस्पोर्ट’ नावाच्या दक्षिण आफ्रिकी वाहिनीवर तो आता समालोचक आहे.
धडकांमागून धडका घेणारा ब्रूस
तसा तो इंग्लंडकडून खेळलेला आंतरराष्ट्रीय कसोटीवीर आहे पण या तारखेला 1959 ह्या वर्षी जन्मलेल्या ब्रूस फ्रेंचचा इथे समावेश करण्याचे कारण वेगळेच आहे. यष्टीरक्षणाच्या त्याच्या कामात तो अत्यंत चलाख
होता आणि काही काळ तो इंग्लिश संघाचा प्रशिक्षकही होता. अपघात पाठीशी
लागणे म्हणजे काय हे त्यालाच विचारलेले बरे राहील : 1985-86च्या वेस्ट इंडीजच्या दौर्यावर असताना जॉगिंग करताना त्याला कुत्रा चावला. नोव्हेंबर 1987च्या पाकिस्तान दौर्यात लाहोरात एका सराव सत्रादरम्यान खेळाडूने मारलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला. तो एकाने परत फेकला – तो आला आणि पडला ब्रूसच्या डोक्यावर! भुवयांजवळ जखम झाली. बिचारा जवळच्या दवाखान्यात टाके घालून घेण्यासाठी जात असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्याला एक कार धडकली. टाके घालण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडली. बरा सुटला. आता तरी थांबावं. कसलं काय – चार टाके घालून झाल्यावर जाण्यासाठी तो उठला आणि वरच्या मोठ्या ‘ओवरहेड’ लाईटला धडकला. अशा अपघातांनंतरही तो इंग्लंडकडून ‘तब्बल’ 16 कसोटी सामने खेळला.
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).
Leave a Reply