सार्डीमॅन दिलीप
8 ऑगस्ट 1940 रोजी गोव्यातील मडगावात नारायण सरदेसाईंना पुत्रप्राप्ती झाली. हे पुत्ररत्न पुढे जाऊन भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आणि कॅरिबींच्या भूमीत ‘सार्डीमॅन’ म्हणून प्रसिद्धीस आले. (सार्डीन हा एक माशाचा आणि सागरी खाद्याचा प्रकार आहे – गोव्याच्या भूमीलाही ‘सार्डीमॅन’ चपखलपणे लागू होते!)
1960-61च्या हंगामात भारत दौर्यावर आलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध अध्यक्षीय एकादशकडून खेळताना दिलीप सरदेसाईंनी नाबाद शतक केले. त्या मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी ‘आणीबाणीतील राखीव खेळाडू’ म्हणून त्यांची निवड झाली होती. त्याच हंगामात बॉम्बेच्या रणजी संघात त्यांची निवड झाली. डिसेम्बर 1961मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्यांनी पदार्पण केले. त्याच हंगामात वेस्ट इंडीजच्या दौर्यावर गेलेल्या संघात त्यांचा समावेश होता. बार्बडोसविरुद्धच्या सामन्यात खेळताना नरी कॉन्ट्रॅक्टर चार्ली ग्रिफिथच्या चेंडूवर जायबंदी झाले तेव्हा दिलीप ‘बिनटोल्या’ होते. नरींना रक्ताधानाची (ब्लड ट्रान्स्फ्यूजन) गरज पडली आणि रक्तदाते होते फ्रॅंक वॉरेल (पहा -1 ऑगस्ट). नरींची संघातील जागा सरदेसाईंना मिळाली. नंतर त्यांनी इंग्लंडचा दौरा केला. न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी बॉम्बेत द्विशतक काढले आणि दिल्लीत पाहुण्या गोलंदाजांना शेकून काढणारा वेगवान शेकडा. वेळ येईल तेव्हा वेगाने धावा काढण्याची आपली क्षमता त्यांनी सिद्ध केली, नंतर मात्र त्यांचे संघातील स्थान काहीसे अस्थिर झाले.
1970-71च्या हंगामात विंडीज दौर्यावर जाणार्या संघात त्यांची निवड झाली. ही त्यांच्यासाठी अखेरचीच संधी असणार होती. आतापर्यंत त्यांनी फिरकीविरुद्धच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी ख्याती कमावली होती पण या कॅरिबिअन दौर्यात त्यांनी वेगवान गोलंदाजीविरुद्धचेही आपले कसब दाखवून दिले. एक द्विशतक आणि दोन शतकांसह त्यांनी 80.25च्या सरासरीने 642 धावा या मालिकेत काढल्या. भारताने 1-0 असा विजय मिळविला – तिकडचा भारताचा पहिलावहिला मालिकाविजय. निवडसमितीचे तत्कालीन अध्यक्ष विजय मर्चंट यांनी ‘भारतीय क्रिकेटमधील
प्रबोधन-पुरुष’ असा सरदेसाईंचा गौरव केला होता. (याच दौर्यात गावसकर नावाचा ‘सलामीवीर’ जन्माला आला होता.)
2 जुलै 2007 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपट अभ्यवेक्षण (सेन्सअ) मंडळाच्या एक सदस्य नंदिनी सरदेसाई या त्यांच्या पत्नी. त्यांचा मुलगा राजदीप ऑक्सफर्डकडून काही काळ क्रिकेट खेळला. आता तो सीएनएन-आयबीएन या वृत्तवाहिनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
आजोबा ग्रेस
8 ऑगस्ट 1914 रोजी वयाच्या 66व्या वर्षी अखिल क्रिकेटविश्वात ‘डॉक’ या उपाधीने प्रख्यात असलेले डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस घरच्या मैदानावर एल्थॅमसाठी एका क्लब सामन्यात खेळले. हा त्यांचा अखेरचा स्पर्धात्मक सामना ठरला. 124 प्रथमश्रेणी शतके काढणार्या ‘डॉक’ आजोबांना या सामन्यात मात्र ना फलंदाजीची संधी मिळाली, ना गोलंदाजीची.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply