सावरकर… त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा !
दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता.
इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलिया मधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले “तुम्ही श्री *** ना ?”
त्या अधिकाऱ्याने सांगितले “हो”. “पण मी आपणास ओळखले नाही!”
त्या प्राचार्याने सांगितले “तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये “.
क्षणार्धात ओळख पटली.
प्राचार्यांनी विचारले “ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहीले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्याच्यात दीडशे गुणांचा फरक होता आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते . बरोबर ?”
ते अधिकारी उत्तरले “हो.”
“कारण माहीत आहे?”, प्राचार्यांनी विचारले.
“नाही” ते अधिकारी उत्तरले.
“जाणून घ्यायचंय ?” प्राचार्य.
“हो”, अधिकारी.
“सांगतो…”, प्राचार्य.
त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे!
ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते “रत्नागिरी” ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .
त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता.
सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.
“आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला”. ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षार्थी असल्याने मला सर्व माहीत आहे.
सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.
मित्रांनो, आपला शत्रू आपली खरी परीक्षा करतो असे म्हटले जाते ते उगाच नाही.
जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.
हा प्राचार्य होता रँग्लर रघुनाथराव परांजपे आणि हा विद्यार्थी होता श्री वेलणकर! संस्कृत भाषेचे तज्ञ! आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते श्रीराम भिकाजी वेलणकर!!
Leave a Reply