सिस्टिम बदलायची पण, कोणी ? असा प्रश्न सर्वच स्तरातुन विचारला जातोय. सिस्टिम बदलायची, सिस्टिम बदलायची अशी ओरड ही सातत्याने होते. पण, सिस्टिम विषयी सततगळ काढणारे आणि सिस्टिम विषयी “ब्र” ही न काढणारे अशी दोन भिन्न टोकं आज प्रत्यक्ष वावरताना दिसुन येतात. सिस्टिम निर्माण केली ती आपण आपल्या सोईसाठी. पण, ती बदलण्याची अपेक्षा आपण कुणा तिसर्या व्यक्तीकडुन का करायची ? सिस्टिम बदलण्याची ताकद आपल्यात किंबहुना समस्त तरुण वर्गात असुनही आपण मागे पडतोय कारण सध्या बोकाळत असलेला भ्रष्टाचार, चंगळवाद आणि चैन. भ्रष्टाचारासारखा अत्यंत वाईट “व्हायरस” अर्थात “जिवाणू” संसर्गजन्य रोगासारखा फोफावतोय आणि माणसामाणसांवर तो अतिक्रमण करतोय. मला अजुनही कळत नाही की, सिस्टिम अर्थात व्यवस्थेला आपण दोष का देतो ? चंगळवादाची सुरुवात जर आपल्या पासुन होत असेल तर व्यवस्थेला दोषी ठरविण्याचं कारणच नाही. भ्रष्टाचाराला आपण प्रवृत्त होतो किंवा प्रवृत्त करतो आणि दुसरीकडे ती कमी होण्यासाठी मोर्चे काढतो, आंदोलन करतो. जर एखाद्या गोष्टीची सुरुवातच आपणापासुन होत असेल तर तिर्हाइताकडुन ती कमी व्हावी ही अपेक्षाच चुकीची आहे असं मला वाटतं.
सार्वजनिक ठिकाणी थुंकु नाका, घाण करु नका, कचरा टाकु नका पण तरीही आपण त्या गोष्टी सर्रास करतो. आणि पुन्हा अशा गोष्टी घडत आहेत यासाठी आपण कुणा तिसर्याच व्यक्तीला जबाबदार धरतो. खरं म्हणजे जोपर्यंत अअपली मानसिकता आणि विचार करण्याची पद्धत बदलत नाही तोपर्यंत सिस्टिम बदलणारच नाही. हे शाश्वत सत्य आहे. आपण एखादी गोष्ट टाळतो किंवा चांगलं व वाईट जाणतो. सारासार विचार किंवा विचाराचं अधिष्ठान असेल तर आपल्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल. माध्यमांतुन जाहिराती दाखवुन किंवा सुचनांचे फलक लावुन जर सिस्टिम बदलली तर ती नक्कीच कौतुकास्पद गोष्ट ठरेल. पण, जाहिरांतीतील नाहक खर्च टाळून तो असंघटित क्षेत्रासाठी वापरला तर अधिक योग्य ठरेल. कारण सिस्टिम बदलण्याची चळवळ सर्व स्तरांतुन होणं गरजेचं आहे.
आज कॉस्मोपॉलिटीन शहरांतुन उदयास येणारा सुखलोलुप घटक सिस्टिमच मुठीत घट्ट पकडु पहातोय तर सामान्य माणुस व्यवस्थेचे कंगोरे शोधण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे व्यवस्थेची व्याख्या लिहीण्याचा भाबडा प्रयत्न करु पाहणारी आजची तरुण पिढी. तर व्यवस्थेलाच भौतिक सुख मानुन ती राजरोसपणे उपभोगताना दिसणारी राजकारणी, भांडवलदार मंडळी. व्यवस्थेत वावरताना नेमका कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायाचा ? हा प्रश्न सतत डोकं वर काढतो तर व्यवस्था बदलायला निघालेल्या तरुण पिढीची मुस्कट दाबीही आपणच करु शकतो ? सत्तेची अन् साम्राज्याची अणितं अजुनही आपणाला सोडवता येत नाहीत. अशा परिस्थितीत व्यवस्था बदलू पहाणार्यांना काही अपवादी घटक टिकू देतील का ? ही शंका वाटते.
स्वातंत्र्याची साठ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आपण व्यवस्थेपर्यंत पोहचू शकलो नाही. याचचं जास्त आश्चर्य वाटतं सामान्य माणसाला या व्यवस्थेकडुन काय अपेक्षा असतात ? पण, माफक अपेक्षा सुद्धा व्यवस्था पूर्ण करु शकत नाही. याला जबाबदार कोण ? व्यवस्था बदलायला हवी, त्यात परिवर्तन व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण, परिवर्तनाच्या चळवळी थंडावत असताना त्या पुन्हा जागरुक व्हाव्यात यासाठी कुणीच पुढे येत नाही. गोचिडीसारख्या घट्ट चिकटलेल्या ह्या व्यवस्थेत आपला चेहरा तर हरवणार नाही ना ?अशी भिती आता वाटु लागली आहे कारण सत्ता ही अफुची गोळी आहे. असं म्हणणार आपल्यापैकीच अनेक. पण, आपण जागे आहोत, आपण उघड्या डोळ्यांनी सारं काही पहातोय. सिस्टिम बदलण्याची ताकद आपल्यात आहे. मग वेळ कशाला दवडा. सुरुवात आपणापासुनच होऊ देत.
— प्रकाश बोरडे
Leave a Reply