उपेंद्र चिंचोरे यांनी ज्येष्ठ गायिका मालती पांडे – बर्वे यांची सांगितलेली आठवण.
‘सुगंध त्याचा लपेल कां “? … ज्येष्ठ गायिका मालती पांडे – बर्वे ह्यांच्या सहवासातील सुगंधित आठवणी :आज १९ एप्रिल त्यांची जयंती
माझ्या लहानपणी रेडिओ हे मनोरंजनाचे मोठे आकर्षण होते ! त्याकाळी आम्ही रहात असलेल्या वाड्यामध्ये सर्वात आधी म्हणजे आमच्या घरी मर्फी कंपनीचा रेडिओ आला. माझ्या आईमुळे मलाही गाण्याची आवड लागली !
मालती पांडे ह्यांची पहिली ओळख झाली, ती त्यांनी गायिलेल्या सुमधुर गाण्यातून, कवी श्रीनिवास खारकर ह्यांची रचना, गजानन वाटावे ह्यांच्या संगीतामध्ये मालती पांडे ह्यांनी गायिलेले गाणे – उठ जानकी मंगल घटिका, आली आनंदाची, ग. दि. माडगूळकरांचे – सुधीर फडके ह्यांची सुरावट असलेले – त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे, मधुकर पाठक ह्यांनी स्वरबद्ध केलेलं, अनिल भारतींच गाणं – खेड्यामधले घर कौलारू, मधुकर पाठक आणि अनिल भारती ह्या द्वयींच – पाहिजेस तू जवळी, राजा बढे ह्यांच्या काव्याला, श्रीनिवास खळे ह्यांचं संगीत लाभलेलं – कशी रे तुला भेटू ? गीतरामायणातील आज मी शापमुक्त झाले, कोण तू कुठला राजकुमार ? ह्या आणि अश्या अनेक गाण्यांनी मालती पांडे हे नांव खूप मोठ्ठ झालं होतं !
गाणं एकदा ऐकलं ,की ते चालीसकट माझं तोंडपाठ होत असे. वहीमध्ये गाणं उतरवून ठेवायची मला सवय लागली, ती तेव्हांपासून, गाणही लगेच पाठ व्हायचं ! माझ्या आईचं ऐकून मी ही गाणं म्हणायचो. तो आनंद काही वेगळाच होता !
मालती पांडे – बर्वे ह्यांची नि माझी पहिली भेट झाली, तो प्रसंग मोठा गमतीचा आहे, ऐका, अकरा जून १९८२ चा तो दिवस होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मालतीबाईंची आणि माझी ओळख कॉलेजमध्ये होईल ! होय, पण झालं अगदी तसंच ! पुण्याच्या कर्वे रोडवरील एम ई एस गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये मी नोकरी करीत होतो. दहावीचा बोर्डाचा निकाल लागला होता आणि अकरावीच्या प्रवेशाचे काम चालू होते. अकरा जूनला सकाळी ऑफिसमध्ये प्रवेशाचे काम सुरु असतांना, माझं लक्ष कार्यालयाच्या दारावर खिळले, अन् मी बघतच राहिलो, माझ्या शेजारीच बसलेल्या सहक-याला – श्री शाळीग्राम ह्याना म्हणालो, “अरे ते बघ, कॉलेजमध्ये मालती पांडे आल्यात”. ते म्हणाले, “कसं शक्यय, त्या कशाला इथं येतील, तुला सगळीकडे गाण्यातली लोकं दिसतात”.
“अरे हो, नक्की मालती पांडेच आहेत त्या, थांब मी बोलून येतो” , असं म्हणून मी दाराजवळ उभ्या असलेल्या मालती पांडे ह्यांचे जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, “नमस्कार, अहो आपण इथं कश्या आलात ? कुणाच्या प्रवेशाला ?” मालती पांडे माझ्या प्रश्नाला उत्तरल्या, “अहो माझ्या मुलाच्या – राजूच्या प्रवेशासाठी आलेय” !
“अहो मालतीबाई मी आपल्याला एका झटक्यात ओळखले, अन् त्यांना म्हणालो, आपण आत या, बसा इथं ! राजू जवळची कागदपत्रं मी तपासली, प्रवेशाची बाकीची प्रक्रिया सुरु होती, त्या पटकन मला म्हणाल्या, “तुम्ही कसं काय मला ओळखलं ?” “अहो, मला गाण्याची खूप आवड आहे, आपण गायिलेली गाणीसुद्धा मला आवडतात, इतकंच नाही तर आपलीही गाणी माझी तोंडपाठ आहेत”! त्यावर त्या म्हणाल्या, “कसं शक्यय, आता खूप काळ लोटलाय, हा लता आशाचा जामानाय …. ” त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच, मी पटकन माझ्या आवडीचं त्यांचं गाणं तिथेच तोंडपाठ म्हणलो – गद्यात …।
लपविलास तू हिरवा चाफा,
सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?
जवळ मने पण दूर शरीरे । नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे । रंग गालिचा छपेल का ?
क्षणात हसणे, क्षणात रुसणे । उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे । घडल्यावाचुन चुकेल का ?
पुरे बहाणे गंभिर होणे । चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे । केली चोरी छपेल का ?
माझं गद्य संपलं तेव्हां मालतीबाई माझ्याकडे बघतच राहिल्या, “वा छान वाटलं, आजही माझे रसिक मला लक्षात ठेवतात”, त्यांच्या चेहे-यावरचा आनंद लपत नव्हता. राजूच्या प्रवेशाचे काम तर केव्हांच झालं होतं, त्या घरी जायला निघाल्या तेव्हांच त्यांनी मला घरी यायचं आमंत्रण दिलं !
ऑगस्ट १९८२ मधील अशीच एक हृद्य आठवण ! माझी आई वैदेही भजनी मंडळात जायची ! ते मंडळ दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करायचे. कालिंदी केसकर, भार्गवराम आचरेकर, जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार असे मातब्बर कलावंत त्या मंडळाला अध्यक्ष म्हणून लाभले होते. मी आईला म्हणालो, “अगं मालती पांडे ह्यांना विचारू कां?” मी फोन करून मालतीबाईंच्या घरी गेलो, त्यांनी त्यांचे पती – शास्त्रीय गायक, मा. पं पद्माकर बर्वे ह्यांचीही ओळख करून दिली. मी भीत भीत मालतीबाईंना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकाराल कां, असं विचारलं आणि काय आनंद झाला म्हणून सांगू, त्यांनी मला तत्काळ होकार भरला. “फक्त एकच करा, मला तिथं गायचा आग्रह करू नका, बाकी माझी मी वेळेवर येते, तुमचं काम चालू ठेवा “! इति मालती पांडे – बर्वे …
पुण्यातील नारायण पेठेतील कन्याशाळेच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम २७ ऑगस्ट रोजी झाला होता ! कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची होती, मालतीबाई साडेतीन वाजताच हजर ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचपदीने सुरुवात झाली, थोडा वेळ होताच, मालतीबाई मला म्हणाल्या, “चिंचोरे, मी तुम्हाला आधी नाही म्हणले खरं, पण काळी पाचचा तंबोरा मिळेल कां ? मीही म्हणीन काही…। ”
मी पटकन उठलो आणि कन्याशाळे समोरच्याच वाड्यात दुस-या मजल्यावरील एका घरात गेलो, तिथं पिता-पुत्रीचा गाण्याचा रियाज सुरु होता. मला बघून, गात असलेली ती सुकन्या आणि तिचे गुरु म्हणाले, “या, या चिंचोरे सर”. मी त्यांना सांगितले, “अहो, समोर कन्याशाळेच्या हॉलमध्ये चक्क मालतीबाई पांडे आल्यात, त्या काळी पाचचा तंबोरा मागतायत”, … माझं बोलणं संपत न संपत तोच ते गानगुरू म्हणाले, “अरे वा, हा तर खूपच चांगला योग चालून आलाय, चला लगेच, आम्ही दोघंही त्यांच्या साथीला बसतो”, असं म्हणून दोन तंबो-यांसह ते दोघेही माझ्याबरोबर कार्यक्रमस्थळी आले. मालतीबाई त्यांना बघताच म्हणाल्या, “कर्वे साहेब काय छान योग जुळून आलाय”… होय, ते गानगुरु होते, आकाशवाणीचे ए ग्रेड कलावंत पंडित मोहनबुवा कर्वे आणि त्यांची सुकन्या म्हणजे मंजिरी कर्वे होय, आत्ताची मंजिरी कर्वे – आलेगावकर ! झालं, कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगविला तो मालतीबाईंनी, कर्वेबुवा आणि मंजिरीच्या साथीने ! इथं अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो, तो म्हणजे, माझ्या आपुलकीच्या स्वभावामुळे मालतीबाईंनी कार्यक्रमाचे मानधन घेतले नव्हते !
एरवीही मी त्यांच्याकडे जाऊ लागलो, माझ्या छंदाबद्दल त्या उत्सुकतेने बोलत असत. गप्पांच्या ओघात, एकदा त्या म्हणाल्या, “मालती-माधव” चित्रपटातील रेकॉर्डिंगसाठी लताबाई पुण्यात प्रभात कंपनीत आल्या होत्या, तेव्हां आमची ओळख झाली होती, आतामध्ये खूप गॅप पडली, त्या खूप मोठ्या आहेत, आता ओळखणारही नाहीत”… मालतीबाईंचं बोलणं मध्येच थांबवत मी म्हणालो, ” नाही, मालतीबाई, दीदींची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे, त्या अजूनही तुम्ही समोर गेल्यावर तपशीलवार आठवण सांगतील”. त्यावर मालतीबाई म्हणाल्या, “अहो चिंचोरे, कसं शक्यय ?”
चोवीस एप्रिल १९८७ ह्या दिवसाची एक आठवण मुद्दाम सांगतो, ऐका, मास्टर दीनानांथांची पुण्यतिथी त्या दिवशी, पुण्यातील सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर संपन्न झाली होती. प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा पहिल्या सत्रात झाला तर दुस-यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम होता. पहिलं सत्र संपलं आणि पुढच्याची तयारी सुरु होती, त्या मधल्या वेळात, मी चटकन, श्रोतृवृंदामध्ये मालतीबाई जिथं बसल्या होत्या तिथं गेलो अन् त्यांना म्हणालो, “चला मालतीबाई, दीदींना भेटा”, त्या म्हणाल्या “अहो नको, त्या ओळखणार नाहीत, खूप वर्ष झाली,” चला, चला लवकर, पुढचा कार्यक्रम सुरु होण्याआधी भेटा”. झालं मालतीबाईंना घेऊन, मी लतादीदी जिथं बसल्या होत्या, तिथं आलो, मी दीदींना म्हणालो, “दीदी, बघा तुम्हांला भेटायला कोण आलंय”? दिदींनी डावीकडे मागे वळून पाहिलं मात्र आणि पटकन म्हणाल्या, ” वा वा मालतीबाई या या,” असं म्हणून त्यांनी मालतीबाईंना आपल्याशेजारी बसवलं अन् पुढं बोलू लागल्या, “आपण खूप वर्षांनी भेटत आहोत, आपण प्रभात फिल्म कंपनीच्या, मालतीमाधवच्या रेकॉर्डिंगला भेटलो होतो, इतकंच काय, मी मुंबईला जाण्यापूर्वी तुमच्या रूमवर आले होते, आपण कॉफी घेतली होती …।” दीदी जुन्या आठवणीत रमल्या होत्या, बोलत होत्या आणि मालतीबाई आश्चर्यचकित होऊन ऐकत होत्या… “अहो, तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे,” मालतीबाई उत्तरल्या…
दुस-या दिवशी सकाळीच मालतीबाईंचा आनंदाने मला फोन आला, म्हणाल्या, “कालचा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही”।
मालतीबाईंच्या प्रत्येक जन्मदिवसाला – एकोणीस एप्रिलला शुभेच्छा देणारा फोन मी करायचो ! मात्र, २७ डिसेंबर १९९७ नंतर तसा फोन करण्याची संधी नियतीने हिरावून घेतली होती. नंतर एकोणीस एप्रिलला मालतीबाईंची “जयंती” असं म्हणू लागलो. दिवस गेले, वर्षही गेली, तरीही त्यांच्याच गाण्याच्या ओळीत म्हणावसं वाटतं ‘सुगंध त्याचा लपेल कां “? …।
— उपेंद्र चिंचोरे
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply