सुप्रजननासाठी आयुर्वेदात उपलब्ध औषधे :-
यष्टिमधु, क्षीरकाकोली, तीळ, पिंपळी, शतावरी, गुडूची, कष्ठकारी, बृहति, गोक्षुर, भृंगराज, विदारीकंद, शृंगाटक, रिंगणी, डोरली, सारिवा, अंनता, उशीर, मंजिष्ठा, आमलकी, शतावरी, बला, पिठवण, चिकणा, शेवगा, बिल्व, कवठ, शिंगाडा, कमलतंतु, द्राक्ष, नागरमोथा ही सर्व औषधे सुप्रजननासाठी उपयुक्त असून ह्यांत सूक्ष्मपोषक तत्वे आहेत. आधुनिक शास्त्रानुसार मॅक्रो व मायक्रोन्युट्रियंट्स ह्यामध्ये समाविष्ट असून ते गर्भशयातील बाळाची वाढ उत्तम प्रकारे करतात. या औषधांमध्ये ग्लूटॅमिक अॅसिड, मेथीअॅनिन आणि आर्जिनीन यांसारखी दहापेक्षा जास्त अमाईनो अॅसिड असल्याचे डॉ. के. एस. अय्यर, परेल, मुंबई यांनी सिद्ध केले आहे.
यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ह्यांसारखी घटकद्रव्ये उपलब्ध आहेत. मुंबई येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. एच. एस. पालेप ह्यांनी मार्च १९९९ मध्ये या संदर्भातील आपला शोधनिबंध मुंबई स्त्रीरोगतज्ञ प्रसूतिशास्त्र परिषदेपुढे सादर केला. वरील औषधांचा उपयोग गर्भिणीपांडू, रक्तक्षय ह्या विकारांमध्येसुद्धा होतो. मुंबई येथील पोदार रुग्णालयात ह्या औषधांचा उपयोग ‘मासानुमास-काढे’ या स्वरूपामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून होत आहे.
स्त्रियांसाठी आहार :-
सुप्रजनानासाठी स्त्रियांनी रोजच्या आहाराशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त बनणारे पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजिर, द्राक्ष, कलिंगड, बाजरी, तीळ, उडीद, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, ज्वारी, इ.
पुरुषांसाठी आहार:-
ताजी फळे, दुध, लसूण, मुळा, बटाटे, तुप, उडीदडाळ, साखर, फरसबी, बीट, गाजर, इ.
हा वेगवेगळा आहार स्त्री-पुरुषांनी का घ्यावा?
वरील आहारामध्ये शुक्र व आर्तव यांना कार्यक्षम करण्याची क्षमता असते. अपत्यपयाध्ये शुक्रनिवडीची क्षमता असते. अपत्यपय, गर्भाशयमुख, गर्भाशय यांच्यामध्ये शुक्रनिवड व भृणरूजूकरण अवलंबून असते. वरील प्रकारचा आहार सुप्रजननासाठी आवश्यक ठरतो. शरीरशुद्धी, औषधीद्रव्ये आणि आहार यांचा विचार केल्यानंतर आता आपण वातावरणाचा गर्भावर काही परिणाम होतो काय ह्या विषयावर उहापोह करू या.
आपला आहार-विहार जीवनपद्धती या बाबी कशा असाव्यात हे आपण ठरूवू शकतो. ह्यात काही चुकीचे सेवन केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम गर्भावर होऊ शकतो. ओझोन व कार्बन मोनोक्साईड या वायूचे हवेमधील प्रमाण ज्या भागांमध्ये जास्त आहे, त्या भागातील गरोदर बायकांची मुले सदोष हृदय घेऊन जन्माला येण्याची शक्यता असते. हृदयाबरोबरच फुफ्फुसावरसुद्धा प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यामध्ये हृदयामध्ये व फुफ्फुसामध्ये दोष निर्माण झालेले असतात. ही महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा अभ्यास कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. ह्यासाठी योग्य पद्धतीने व तज्ञ मार्गदर्शनाखाली प्राणायाम करणे हितकर ठरू शकते.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
Leave a Reply