रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी, दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू दिसले. एक भयावह दृश्य वाटले. त्या परिसरांत कांही अघटीत होणार ह्याची चाहूल लागली. अनेक जाणारी येणारी माणसे थांबली आणि मार्ग बदलून जाऊ लागली. मी देखील आंत जाऊन खिड्की बन्द करुन काचेतून वातावरनाचे निरिक्षण करु लगलो. उत्सुकता, भिती आणि स्वसंरक्षण ह्याची मनात घालमेल सुरु होती.शिवाय रोजच्या विविध बातम्यानी, गुण्डगिरिनी, आतंकवादी वातावरणानी सर्व काही अनिश्चित होते.
पडते घे विनाकारण विरोध करु नकोस, सत्याच्या व तत्वाच्या मागे जाण्याचा मोह टाळ. यात कदाचित बळीपण जावे लगेल. “हा संदेश व्यक्त होत होता. स्वत:चा बचाव हेच त्या अघटीत परिस्थितीला उत्तर होते.
ते सर्व राकट आडदांड त्या फळगाडी भोवती जमले. त्यांचा आरडा ओरडा विक्षिप्त चाळे, आक्रमक भूमिका, या वागण्याने परिस्थितीचे गांभीर्य त्या फळविक्रेत्याने देखिल जाणले. तो चटकन बाजूस सरकला. खाली मान घालून बसला. भीती व जीव वाचवणे, आणि होणाऱ्या नुकसानीबद्दल डोळे भरून आलेले अश्रू लपविणे, हेच तो करु बघत होता. सर्वांनी त्याची गाडी अक्षरश: लुटली. भराभर फळांच्या टोपल्या आपल्या गाडीत टाकल्या आणि सर्वजण गाडीत बसून होर्न वाजवीत, सुसाट निघून गेले. सामसूम झाल्याची चाहूल लागताच मी चटकन पश्यात बुद्धीची सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्या फळवाल्याकडे धावलो. तो गाडीजवळ मटकन बसला होता. त्याचे लक्ष त्या सुसाट गेलेल्या गाडीकडे होते. डोळातून अश्रू वहात असलेले दिसत होते. मी सहानुभूती व्यक्त करीत म्हणालो “काय ही सैतानी वृतीची माणसे. जंगली व दादागिरी करणारी. गरिबांना लुटणारी. ह्यांना तर गोळ्याच घालून ठार करावयास हवे.”
“थांबा साहेब! प्रसंगावर चुकीचे बोलू नका” तो फळविक्या बोलू लागला. देव माणस होती ती. प्रथम दैत्या प्रमाणे वागली खरी. परंतु त्यांच्या वृतीमध्ये देवत्व दिसून आले.”
मला त्या क्षणी विचित्र वाटणाऱ्या त्याचा शब्दाचा बोध झाला नाही. मी चक्राऊन गेलो. त्यांनी इतका धिंगाणा घातला, लुटालूट केली तरी त्याबद्दल सहानुभूती? त्याने कांहीच उत्तर दिले नाही. फक्त जवळच्या टोपलीकडे बोट दाखवू लागला. माझी दृष्टी तिकडे वळली. त्यात शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी पडली होती. हे सहा हजार रुपये आहेत साहेब. ही गड्डी माझ्या हाती देत ते वेगाने निघून गेले. ही माझ्या रोजच्या मालाच्या व धंद्याच्या कमाई पेक्षा दुप्पट रक्कम आहे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply