वयाची पंचाहत्तरी सुरु झाली होती. डोळ्याला चश्मा, कानांत Hearing Aid, तोल सांभाळण्यासाठी हाती काठी घेऊन बँकेत गेलो होतो. दोन महीन्यांपासून पेन्शन येणे बंद झाले होते, त्याची चौकशी करावयाची होती. मी सांगितलेल्या टेबलाजवळ जाताच समोर एक तरुण पंचविशीतील मुलगी सेक्क्षनवर होती. माझे तिने हसून स्वागत केले व खुर्चीवर बसण्यास विनविले. काय झाले कुणास ठाऊक. मी त्या मुलीकडे बघतच राहीलो. ती जे सांगत होती त्याकडे माझे लक्ष नव्हते. मी चमत्कारीकपणे तिच्याकडे बघतच राहीलो. मला ती त्यावेळी सौंदर्याचा, प्रतिभेचा, तेजस्वीपणाचा एक जीवंत चेहरा वाटला. माझे मन तेथेच अडकून गेले. एक अप्रतिम सौंदर्य व शरीरबांधकाठी मला आकर्शून गेली. तिचे बोलणे, हालचाली, लकबा, पेहेराव, सारे सारे मनास एकदम प्रफूल्लीत करणारे वाटले. माझे भिरभिरणारे डोळे, थरथरणारी मान, त्या तरुण मुलीच्या तथाकथीत आकर्शकतेमध्ये, सौंदर्यामध्ये, गुंतून गेले. परंतु मला Sense of Orientation अर्थांत सभोवतालच्या व स्वतःच्या परिस्थीतीची जाणीव होती. मला गम्मत वाटली. विचीत्र वाटले. एक मात्र सत्य की तिला बघून अत्यंत आनंद वाटला, समाधान वाटले.
थोडीशी माझ्या कामाची चर्चा झाली. काही कागदपत्रे मी आणली नव्हती. ती आणण्यास मला सांगितले गेले. मी तेथून निरोप घेतला.
असे कां व्हावे ? जीवनांतील सौंदर्याचा आस्वाद मी आयुष्यांत तर भरपूर घेतला हेता. मग असे हे विक्षीप्त परंतु प्रचंड आनंद देणारे कां वाटावे ?. एक बेचैनी, एक तगमग, एक आशंका, मनात तुफान निर्माण करुन गेले.
मी दुसर्या दिवशी लागणारी कागदपत्रे घेऊन पून्हा बँकेत गेलो. उत्सुकतेने तिला भेटलो. आज मात्र वेगळेच चित्र डोळ्यासमोर येऊ लागले. मला ती फक्त एक तरुण मुलगी दिसली. साधीसुधी इतर मुलींप्रमाणे. काही भिन्न नव्हते. न ते कालचे सौंदर्य, न आकर्षण, न मनाला ओढ, ना आनंद. मी तिच्याकडे निरखून बघू लागलो. कालच्या प्रसंगाची उजळणी करु लागलो. पण मन कोणतेच ठाव घेण्याचे स्विकारु लागले नाही. सारे तेच होते. मी, माझेच डोळे, आणि समोरचे देखील तेच. तीच तरुण मुलगी, तेच सौंदर्य. परंतु आज मजवर कोणतीच जादू झालेली दिसली नाही. कां असे ? कां मी चोविस तासांत मला माझ्या वयाला, विकलांगपणाला ओळख होते. अर्थात काल तर मी फक्त तिच्यातले सौंदर्य, प्रतिभा, तेज टिपले होते. मग आज ते सारे का नष्ट झालेले वाटले ?
आकर्षण आणि उपभोग ह्या भिन्न गोष्टी आहेत. जेंव्हा भिन्न, तेंव्हा त्याच्याकडे बघण्याचा द्दष्टीकोन देखील वेगळाच असू शकतो. उपभोगाची साधने, फक्त दोनच आहेत. एक शरीर व दुसरे मन. दोन्हीवर ताबा असतो तो विचारांचा, विवेकाचा. शरीराचा विकलांगपणा बघतांच मन त्याची साथ सोडून देते. बुद्धीमधला विवेक वरचढ बनतो. हाच विवेक मनाच्या चंचल स्वभावाला मुरड घालून, शरीराला जगवण्यासाठी साथ देण्यास सरसावतो. तुमच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध तो शरीराला तन्दुरुस्त, आरोग्यवर्धक ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवेकासमोर असतात फक्त दोन मार्ग. त्या निसर्गाचा शोध घेणे. अर्थात ईश्वर सान्निध्य व शरीराला त्याच्याशी एकरुप करण्याचा प्रयत्न करणे.
विकलांग शरीर आणि दुर्बल मन हे कसे करणार. केवळ कल्पनेने ईश्वर अस्तित्वाच्या जाणीवेचा शोध घेणे ह्या समाधानांत आनंद असतो. आनंदात ईश्वरी रुप दडलेले असते. त्याच ईश्वरी रुपांत एकरुप होण्याचा सतत प्रयत्न व्हावा, हेच तुमच्या जीवन मार्गाचे ध्येय असेल.
जीवनाच्या चाकोरीमधले कित्येक प्रसंग असे येत जातात की जेव्हां त्या निसर्गाच्या भव्यतेचे, दिव्यतेचे स्वरूप आम्हास जाणवते. आम्ही आनंदी, उल्हासीत होतो. काही क्षण तर आम्ही आम्हाला व सभोवतालच्या जगाला पूर्ण विसरून जातो. रिम-झिम पडणार्या पावसांत दिसणारे नयन मनोहर इंद्रधनुष्य, गारांचा पडणार्या पावसात गारा जमा करतानाचा आनंद, प्रचंड पडणार्या धबधब्याचा लयबध्द आवाज, जमीनीवर वेगाने पडणार्या पाण्याचे उडणारे तुषार, समुद्रकिनारी सुर्यास्ताचे देखावे, समुद्राच्या खडकाळ किनारी आदळणार्या पाण्याच्या लाटा, कोकीळेच्या मधूर ताना, मोराचे पसारा फुलवित थुई-थुई नाचणे, फुलांच्या ताटव्यात उमललेली रंगीबेरंगी फुले, जंगलामध्ये स्वैर बागडणारे वन्य प्राणी, उंच पर्वताच्या रांगा, नदीचे संथ वाहणे, सूर्य किरणांमुळे सोनेरी छटा प्राप्त झालेले निरनिराळ्या आकाराचे चमकणारे ढग. एक नाही अनेक-अनेक प्रसंग तुम्ही त्या अप्रतीम निसर्गाच्या अविष्कारामध्ये आनंदाने एकरूप होतात. विचार करा, कसले हे निसर्गाचं दिव्य स्वरूप. हेच तर तुम्हाला मिळालेले परमेश्वराचे दर्शन नव्हे काय? ह्यालाच (Reality of Consciousness) वा सत्याची जाणीव म्हणतात. तसे बघीतले तर आपणास प्रासंगीक वाटणारी नैसर्गिक भव्यता ही सर्व ठीकाणी आणि सदैव असते. फक्त आपल्या दृष्टीची जागृतता असावी.
त्या तरुण मुलीच्या सौंदर्यातील ईश्वरी अंश माझ्या विवेकाने टिपण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच तो क्षणिक होता. त्याच वेळी प्रकाशमान झाला होता. विजेप्रमाणे चमकून माझ्या ह्रदयाला भिडणारा होता. पुन्हा नंतर ती अत्यंत आनंदाची लहर केव्हांच भासली नाही. कारण ईश्वरी जाणीवेचे दर्शन असे क्वचीत अनुभवते.
मी तिच्यांत काय बघीतले ? मला काय हवं होतं ? ह्याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. कारण ते सौंदर्य, त्या प्रकारचे तेज मला कुणांतही, आगदी तीच्यामध्येही नंतर दिसले नाही.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply