सूर्यावर घडलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या चुंबकीय घडामोडींमुळे विद्युत्भारित कणांचा एक महाकाय ढग पृथ्वीच्या दिशेने भिरकावला गेला. हा ढग कोणत्याही क्षणी पृथ्वीला तडाखा देऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. याला सौरसुनामीचे नाव देण्यात आले आहे. प्रत्यक्षात भूकंप झाल्याशिवाय सुनामी येत नाही. त्यामुळे या घटनेला ऊर्जेचा स्फोट म्हणता येईल. त्याचा पृथ्वीवर कितपत परिणाम होतो याबाबत मतमतांतरे आहेत.
सागरी सुनामीच्या तडाख्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. 2004 मध्ये आलेल्या सागरी सुनामीने इंडोनेशिया आणि इतर भागांमध्ये हाहाकार माजवला होता. मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती. आजही त्या नैसर्गिक आपत्तीच्या आठवणी जाग्या झाल्या की अंगावर काटा येतो. आता पुन्हा एकदा सुनामीचा विषय चर्चेत आला आहे. मात्र, ही सागरी सुनामी नसून सौरसुनामी आहे. सूर्यावर घडलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या चुंबकीय घडामोडींमुळे विद्युत्भारित कणांचा एक महाकाय ढग पृथ्वीच्या दिशेने भिरकावला गेला आहे. हा ढग कोणत्याही क्षणी पृथ्वीला तडाखा देऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी (एसडीओ) बरोबरच बर्याच उपग्रहांनी एक सौरज्वाला पाहिली. ही ज्वाला एका विशिष्ट ठिकाणाहून निघाली होती. दुसरीकडे वायुचा एक वेटोळा सूर्याच्या उत्तर गोलार्धाच्या वर आढळला. त्याच वेळी अंतराळात एक स्फोट झाला. या स्फोटाला खगोलशास्त्राच्या भाषेत ‘कॉरोनल मास इजेक्शन’ असे म्हटले जाते. ही घटना धनुष्यबाणातून सुटलेल्या बाणाप्रमाणे आहे. या बाणाचे लक्ष्य म्हणजे पृथ्वी. प्रत्यक्षात या दोन घटना एकमेकांपासून हजारो किलोमीटर अंतरावर घडल्या असल्या तरी त्यांचा काही तरी संबंध असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एसडीओच्या म्हणण्यानुसार सूर्यापासून एक तरंग फिलामेंटकडे जात आहे. याबाबत लंडन विद्यापीठातील मुलार्ड स्पेस विज्ञान प्रयोगशाळेतील वैज्ञानिक लेन कुल्हान म्हणतात, ‘सूर्याच्या उत्तर गोलार्धात
तयार झालेला महाकाय
ढग आणि स्फोट या दोन घटना एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. फिलामेंट एक मोठ्या चुंबकीय नळीप्रमाणे असते. त्यामध्ये सौर वायू भरलेले असतात. सध्या उपग्रहांद्वारे जी फिलामेंट आढळली आहे ती स्फोटाच्या आधी पृथ्वीच्या व्यासापेक्षा 50 पटींनी जास्त दूर पसरली होती. त्यानंतर त्यातील वायू अंतराळात पसरले. हेच वायू विद्युत्भारित कणांप्रमाणे रूपांतरित झाले.’
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या दिशेने एक लाख मैल प्रति सेकंद या वेगाने येणार्या चुंबकीय ढगांमधील कणांचे वजन कोट्यवधी टन असू शकते. सौरसुनामी अंतराळात 9.3 कोटी मैल एवढ्या अंतरावर पसरली आहे. या सौरसुनामीमुळे पृथ्वीला धोका निर्माण झाला आहे. सौरसुनामीमुळे पृथ्वीचे संरक्षक कवच असलेल्या चुंबकीय थरावर परिणाम होऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पृथ्वीला महाकाय ढगाचा तडाखा बसेल तेव्हा उपग्रहांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ही घटना कधीही घडू शकते. या घटनेचा परिणाम थेट पृथ्वीवर होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पृथ्वीच्या दिशेने होत असलेला हा पहिलाच प्रमुख स्फोट आहे. वैज्ञानिकांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मोठा सौर स्फोट झाला तर पृथ्वीवरील ऊर्जा पुरवठा आणि दूरसंपर्क यंत्रणेवर प्रभाव पडू शकतो. मात्र, या घडामोडींचा जगाच्या संपर्कयंत्रणेवर काय परिणाम होईल हे अजून स्पष्ट झालेले नाही. गाढ निद्रावस्थेतून सूर्याला 2010 मध्ये जाग येईल, त्यावेळी सौरज्वालांमधून उफाळलेल्या चुंबकीय ऊर्जेच्या लाटा पृथ्वीवर आदळतील असे भाकित शास्त्रज्ञांनी केले आहे. प्रत्यक्षात यात फारसे तथ्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते सूर्यामध्ये तयार झालेल्या ढगांचा पृथ्वीला फारसा धोका नाही. उपग्रहांनी टिपलेल्या सौरज्वाळा आणि स्फोट यामुळे सौरसुनामीच्या संकल्पनेबद्दल बोलले जात आहे. मात्र, हे विस्फोट गंभीर स्वरूपाचे नाहीत. असे स्फोट सूर्यावर वारंवार होत असतात. सूर्याच्या मध्यभागी करोना नावाचा भाग असतो. या भागात प्रचंड प्रमाणात स्फोट होतात. स्फोटांमुळे तिथे ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा सूर्यकिरणांद्वारे बाहेर फेकली जाते. तसेच सूर्यावरील काळे डाग दर 11 वर्षांनी महत्तम असतात. ही परिस्थिती समजून घ्यायला हवी. सूर्यावरील डागांची वारंवारता कायम बदलत असते. त्यामुळे त्याचे ताबडतोब पृथ्वीवर परिणाम होत नाहीत. सौरज्वाळा आणि विद्युतभारित ढगांचे वेटोळे यातून निघणारी लहर पृथ्वीवर आपटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे काही घडले तरी त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होणार नाही असे ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ अरूण बापट यांचे मत आहे. या स्फोटामुळे पृथ्वीवरील सॅटेलाईट कम्युनिकेशनवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, दूरसंपर्क यंत्रणेला विशेष धोका संभवत नाही, असेही ते सांगतात. पृथ्वीच्या चुंबकीय कवचावरही सूर्यावरील स्फोटांचा परिणाम जाणवत नाही.
सूर्याच्या उत्तर गोलार्धात झालेले स्फोट आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम याला सौरसुनामी असे नाव दिले गेले आहे. प्रत्यक्षात हे नाव फारसे प्रशस्त वाटत नाही. कारण, मुळात सुनामीची संकल्पना वेगळी आहे. भूकंप झाल्याशिवाय सुनामी येत नाही. उपग्रहांद्वारे महाकाय ढग टिपला गेला असला तरी सूर्यावर असे अनेक ढग आहेत. तसेच सूर्याची ऊर्जा आणि घनता जास्त असल्याने तिथे कंप होऊ शकत नाही. चंद्राचे तापमान कमी असल्याने तेथे कंप होण्याची शक्यता असते. मात्र, सूर्यावर काही कंपने झाली तरी कंपाची शक्यता नाही. पण, त्यांचा पृथ्वीशी काहीही संबंध नाही. कारण, सूर्याच्या करोनामध्ये निर्माण होणारी ऊर्जा पृथ्वीवर पोहोचेपर्यंत त्यातील बरीचशी शक्ती कमी होते. सूर्यावरील कंपने, स्फोट, सौरज्वाळा याबाबत आपल्याला उपग्रहांद्वारे माहिती मिळते. पूर्वी उपग्रह नव्हते मात्र स्फोट होत होतेच. आपल्याला त्यांची माहिती नव्हती इतकेच. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सूर्यावरील प्रकियेला सौरसुनामीपेक्षा ऊर्जेचा विस्फोट म्हणता येईल.
(अद्वैत फीचर्स)
— अजय तिवारी
Leave a Reply