टीव्ही पाहताना रिमोटचा वापर अपरिहार्य बनला आहे. पण हल्ली टीव्ही केवळ वाहिन्या पाहण्यासाठीच नव्हे तर इंटरनेट, नेटवर्किंग साईट्स आणि इतरही अनेक अॅप्लीकेशन्साठी वापरला जातो. अशा वेळी ग्राहकाला रिमोटद्वारे टायपींगचीही गरज पडते. म्हणून स्मार्ट फोनचाच रिमोट म्हणून वापर करता यावा यासाठी काही अॅप्लीकेशन्स तयार करण्यात आली आहेत. टीव्ही कंपन्याही अशी अॅप्लीकेशन्स तयार करू लागल्या आहेत.
दूरचित्रवाणीच्या शंभराहून अधिक वाहिन्या सुरू झाल्यानंतर रिमोटचा वापर अपरिहार्य बनला. घरात टीव्ही पाहताना प्रत्येकाला रिमोट आपल्याच हातात हवा असतो. हवे ते कार्यक्रम, वाहिन्या पाहतायाव्यात आणि मधल्या ‘ब्रेक’मध्ये वाहिनी बदलता यावी यासाठी सर्वांचा आटापिटा सुरू असतो. या धावपळीत रिमोट कुठेही ठेवला जातो, त्याची बटणे खराब होतात किवा ऐनवेळी तो सापडत नाही. अशा वेळी मोबाईल फोनचा वापर टीव्हीचा रिमोट म्हणून करणे शक्य आहे. अर्थात त्यासाठी आपल्याकडे स्मार्ट फोन असायला हवा आणि त्यावर ठरावीक अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यायला हवे.
या नव्या सुविधेमुळे टीव्हीचा रिमोट लवकरच इतिहासजमा होऊ शकेल असे तज्ज्ञांना वाटते. अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे राहणाऱ्या ख्रिस लेव्होई या रेडिओ उत्पादकाने स्मार्ट फोन्समधील तंत्रज्ञानाचा वापर करून हे खास अॅप्लीकेशन तयार केले आहे. लेव्होई त्यांच्या आयफोनवर हे अॅप्लीकेशन वापरून अॅपल टीव्ही सेट ऑफ बॉक्सचे नियंत्रण करतात. खरे तर मोबाईल फोन हा योग्य पर्याय नव्हे. कारण तो कधीही ‘स्लीप मोड’मध्ये जातो आणि रिमोट म्हणून काम करणे बंद करतो. अशा वेळी तो पुन्हा रिमोट म्हणून वापरण्यासाठी ठरावीक बटन्स दाबावी लागतात. म्हणून अगदी बेसिक फंक्शन्ससाठी लेव्होई टीव्हीबरोबर येणारा रिमोटच वापरतात.
आता टीव्हीचा वापर केवळ टीव्ही म्हणून न होता त्यातच इंटरनेट, ऑन डिमांड कार्यक्रम, युटूब व्हिडीओज, चित्रपट, शॉपिंग साईट्स, फेसबुकवरील छायाचित्रे अशा अनेक कामांसाठी टीव्हीचा
वापर केला जातो. ही सर्व फंक्शन्स वापरण्यासाठी आपल्याला टायपींगसारख्या गोष्टीही कराव्या लागतात. साध्या रिमोटवर ते शक्य होत नाही. त्यामुळे केबल कंपन्या आणि टीव्ही उत्पादक कंपन्यांना आता जुन्या रिमोट कंट्रोलच्या जागी नवीन अधिक उपयुक्त रिमोट कंट्रोल्स आणण्याची गरज निर्माण झाल्याचे पटले आहे. परंतु एकाच रिमोटमध्ये अनेक फीचर्स देणे महाग तर होतेच पण त्यामुळे रिमोटचा आकारही वाढतो. सोनीने त्यांच्या गुगल पॉवर्ड टीव्हीसाठी तयार केलेला रिमोट बराच रुंद असून त्यावर 75 बटणे आहेत. त्याचा वापर करण्यासाठी दोन्ही हातांचा वापर करावा लागतो. हा रिमोट वापरताना रिमोटच्या सहाय्याने एखादे विमान उडवत असल्यासारखे वाटते. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकांना यावर योग्य पर्याय असावा असे वाटते. त्यासाठीच स्मार्ट फोनचा रिमोट म्हणून वापर करता येणारे अॅप्लीकेशन तयार करण्यात आले आहे. अशा अॅप्लीकेशनमुळे स्मार्ट फोनच्या टच स्क’ीनचा चांगल्याप्रमारे वापर करता येईल.
स्मार्ट फोनचा रिमोट म्हणून वापर करण्याचे अनेक प्रयत्न झाले असून त्यांना यशही आले आहे. सोनोस या इंटरनेट कनेक्टेड स्टिरिओ बनवणार्या कंपनीने आयफोनसाठी एक अॅप्लीकेशन तयार केले असून ते विनामुल्य उपलब्ध आहे. या आप्लीकेशनमुळे या कंपनीच्या रिमोटवरील सर्व फंक्शन्स आयफोनमध्येही येतात. सोनोसच्या जवळजवळ पन्नास टक्के ग्राहकांनी हे अॅप्लीकेशन वापरण्यास सुरुवात केली असून त्यामुळे स्टीरिओ वायफाय नेटवर्कला जोडणे शक्य झाले आहे. मित्सुबिशी आणि सॅमसंगसारख्या अनेक टीव्ही उत्पादक कंपन्यांनी स्मार्ट फोन रिमोट्स आणि फोन अॅप्लीकेशन तयार करण्यास सुरुवात केली आहे. फोनचा रिमोटसारखा वापर करण्यात आणखी एक फायदा असून फोन सापडत नसल्यास त्यावर रिंग देऊन तो शोधता येतो. नुसत्या रिमोटचे तसे होत नाही.
सध्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रिमोटला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. विशेषत: टीव्हीसाठी तर रिमोट अपरिहार्य बनला आहे. 1950 च्या दशकात सर्वप्रथम रिमोट तयार झाला तेव्हा तो आळशी लोकांसाठी असल्याचे मानले जात होतो. सर्वप्रथम झेनित या कंपनीच्या टीव्हीसाठी रिमोट बनवण्यात आला होता आणि तो एका लांब कॉर्डने टीव्हीला जोडला होता. त्यावेळी त्याचा वापर मुख्यत: आवाज कमी-जास्त करण्यासाठीच केला जाई. हळूहळू वाहिन्या बदलण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. वाहिनी बदलताना प्रत्येक वेळी उठून टीव्हीपर्यंत जावे लागले तर ते कंटाळवाणे होईल. आता केवळ वाहिन्या बदलण्यासाठीच नव्हे तर इतर अनेक फंक्शन्स टीव्हीवर उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे रिमोट अधिकाधिक अद्यायावत असायला हवा. 2015 पर्यंत 43 दशलक्ष घरांमध्ये इंटरनेटयुक्त टीव्ही असतील. सध्या ही संख्या केवळ वीस लाखांवर आहे. टीव्हीबरोबर सर्वार्थाने चांगले इंटरॅक्शन (संवाद) साधू शकणारा रिमोट ही काळाची गरज बनली आहे.
अजूनही काही कंपन्यांना स्मार्ट फोनचा रिमोट म्हणून वापर करणे पटलेले नाही. या कंपन्या विविध प्रकारचे आणि पूर्ण कीबोर्ड्स असलेले रिमोट तयार करत आहेत. या रिमोट्समध्ये टच स्क्रीन्स तसेच रिमोट सेन्सर्सचाही समोवेश केला जात आहे. कायक्रो सॉफ्टने नुकतीच किनेट ही गेमिंग सिस्टीम बाजारात आणली असून या सिस्टीममध्ये आपल्याला हातांची हालचाल आणि आवाजाच्या सहाय्याने चित्रपट, स्पोर्ट, खेळ आणि इतर कंटेन्ट पाहता येतो. त्यासाठी एक्सबॉक्स कन्सोल देण्यात आला असून वेगळ्या रिमोटची गरज नसते. सॅमसंगच्या महागड्या टेलीव्हीजनसाठी टचस्क्रीन रिमोट बनवण्यात आला असून त्यावर वर्च्युअल कीबोर्डही आहे. त्यावर टीव्हीवर दिसणारा व्हिडीओही दिसू शकतो. त्यामुळे टीव्ही पाहता पाहता आपल्याला उठून दुसर्या खोलीत जावे लागल्यास रिमोटवरच कार्यक्रम पाहता येतो.
सॅमसंगच्या मते स्मार्ट फोन अॅप्लीकेशन्स या उपकरणावर चालू शकतात. सॅमसंगने गॅलेक्सी या नावाने स्वत:चे स्मार्ट फोन उत्पादन सुरू केले आहे. मित्सुबिशीने मात्र स्वत:चे रिमोट कंट्रोल्स तयार न करता अशा अॅप्लीकेशनवरच लक्ष केंद्रीत केले आहे. या वर्षी त्यांना टच स्क्रीन रिमोट कंट्रोल बाजारात आणायचा होता परंतु त्यामुळे त्यांच्या टीव्हीची किंमत काहीशे डॉलर्सने
वाढली असती म्हणून त्यांनी ही योजना रद्द केली. त्याऐवजी त्यांनी स्मार्ट फोन्स आणि टॅबलेट पीसीसाठी अॅप्लीकेशन तयार केले आहे. पुढील काळात कदाचित टीव्हीबरोबर रिमोट न येता केवळ हे अॅप्लीकेशनच घ्यावे लागेल.
(अद्वैत फीचर्स)
— महेश जोशी
Leave a Reply