पाचवीपर्यंत असलेला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आता बारावीपर्यंत बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयीन जीवनापर्यंत क्रीडानैपुण्य व शारीरिक शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात कामवासनेच्या मनोविकृतीने पछाडलेल्या नराधमांकडून नातीगोती विसरून बाल, विवाहित, अविवाहित, वयोवृद्धांवर बलात्कार, विनयभंग, छेडछाड करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. देशात महिला पोलिस, डॉक्टर, नर्सेस, रुग्ण, शालेय शिक्षीका, विद्यार्थिनी, अज्ञानी मुलींसहित वयोवृद्ध असे कुणीही लैंगिक अत्याचारापासून सुरक्षित नाहीत. पोलिसांकडून सुरक्षेची हमी मिळत नाही करण महाराष्ट्रात कार्यरत असलेले एकूण १ लाख ८० हजार पोलिस संपूर्ण महाराष्ट्रच्या सव्वा अकरा कोटी जनतेचे संरक्षण कसेकाय करू शकतील? त्यातून बहुतांशी पोलिस यंत्रणा ही सामाजिक-राजकीय पुढारी आणि मंत्री, धर्मगुरू यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या मागेपुढे फिरण्यात व्यस्त असते. त्यामुळे शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमासोबत बारावीपर्यंतच्या शालेय व महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणार्थ ज्युडो, कराटेचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक झालेले आहे. त्याच बरोबरीने विनयभंग, बलात्कार, छेडछाड, रॅगिंग सारखा गुन्हा केल्याने होणार्या फौजदारी दंड व कारावासाच्या शिक्षेबाबत उदाहरण दाखल्यांसहित सखोल ज्ञान व माहिती शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्याची अत्यंत गरज आहे. जेणेकरून अशा अपराधांबद्दल भावी पिढीच्या मनात भिती निर्माण होवून अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
सुभाष रा. आचरेकर, वांद्रे(पूर्व)
— सुभाष रा. आचरेकर
Leave a Reply