नवीन लेखन...

स्वातंत्र्य लढ्याबद्दलचा महत्त्वाचा दस्तावेज – ‘जिंकू किंवा मरू’

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी भरलेला आहे. कायदेभंगाची चळवळ, अहिंसक सत्याग्रह, शत्रूला हिंसक मार्गाने संपवण्याची क्रांतिकारक चळवळ असे सारे प्रकार या स्वातंत्र्यलढ्यात अंगीकारण्यात आले. हा सगळा इतिहास आज उपलब्ध आहे तो निरनिराळ्या स्वरूपातील पुराव्यांच्या रूपाने. ‘चलेजाव’ची १९४२ सालातली चळवळ. हा स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनापेक्षा १९४२ ची चळवळ खूपच वेगळी होती. एकतर या चळवळीला एक असा नेता नव्हता, कारण गांधीजींपासून बहुतेक सारे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून उठले… योगोयोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्टला बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि पंधरा तारखेस स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य चळवळीची आठवण जागवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे ठरेल.

महात्मा गांधींनी अहिंसेची आणि सत्याग्रहाची विचारधारा या देशात रुजवली. अटीतटीचा सामना सुरू झाल्याची जाणीव घेऊन ही चळवळ चालवण्यात आली होती. एका अर्थी शुद्ध अहिंसेच्या तत्त्वज्ञानापेक्षा हटके असाच सूर यात होता असे म्हणायला हवे. कदाचित म्हणूनच तरुणवर्ग बेचाळीसच्या चळवळीत मोठ्या संख्येने उतरला होता. ‘करेंगे या मरेंगे’ हा पुकारा करत बेचाळीसचा लढा लढला गेला आणि तरीही गांधीजींचीच प्रेरणा या आंदोलनाला होती, हे या पर्वाचे वेगळेपण होते. त्या काळाचा इतिहास ज्ञात असला तरीही त्याचा सारा तपशील प्रथमच प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांच्या चक्षुर्वैसत्यम् निवेदनातून समोर आणण्याचा प्रयत्न ‘जिंकू किंवा मरू’ या पुस्तकाच्या रूपाने करण्यात आला आहे. राजकीय आंदोलनांचा आणि सिद्धान्तांचा गाढा अभ्यास असलेल्या डॉ. रोहिणी गवाणकर यांनी बेचाळीसच्या लढ्यात सहभागी झालेल्या शिलेदारांच्या मुलाखतींच्या आधारे हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे स्वरूपच मुळी मुलाखतींद्वारे साधलेला संवाद हे आहे. बेचाळीसच्या लढ्याच्या वेळचे पुढे आपआपल्या क्षेत्रांमध्ये

लक्षणीय कर्तृत्व गाजवणारे म्हणून नावारूपास आलेली तरुण मंडळी म्हणजे मोहन धारिया, गोवा मुक्‍तिसंग्रामात सहभागी झालेले मोहन रानडे, नागनाथ नायकवडी, दत्ताजी ताम्हाणे, अलीकडेच दिवंगत झालेले ग. प्र. प्रधान, डॉ. शांती पटेल, अनुताई लिमये, डॉ. जी. जी. पारीख, सिंधुताई देशपांडे, डॉ. विजेंद्र काबरा इत्यादि. या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती या पुस्तकात समाविष्ट आहेत. चळवळीच्या दिवसांच्या आठवणींसोबतच या साऱ्यांनी पुढच्या वाटचालीत केलेल्या कामाबद्दलही लेखिकेने त्यांच्याकडून जाणून घेतले आहे. बहुतेक मुलाखती रोहिणी गवाणकर यांनी घेतल्या आहेत, तर काही मुलाखती घेण्याचे काम अंजली भागवत, विभावरी कडू, शैला लोहिया आणि जयंत दिवा
यांनी केले आहे. मुंबईच्या प्रभात प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

स्वराज्याची चळवळ विचारवंतांनी दाखवलेल्या मार्गानुसार झाली अशी मांडणी केली जाते. त्याचवेळी समाजाच्या खालच्या स्तरावरील लोक आणि स्त्रियांचा या लढ्यातील वाटा दुर्लक्षित राहतो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीबाबत हेच झाले. गांधीजींच्या प्रेरणेने महिलावर्ग स्वराज्याच्या चळवळीकडे वळला आणि क्रांतिकारी आंदोलनातही स्त्रिया उतरल्या हे वास्तव होते. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया जशा या चळवळीकडे वळल्या तशाच सर्वसामान्य स्त्रियाही त्यात उतरल्या. पण रूढ इतिहासाने हे श्रेय त्यांना म्हणावे तसे दिले नाही. १९७० च्या दशकाच्या अखेरीस सबआल्टर्न स्टडीजची संकल्पना पुढे आली आणि त्यांतर या सहभागाचा विषय रेटला गेला. हे पुस्तक सिद्ध करताना आपल्या मनात हा सगळा संदर्भ होता असे रोहिणी गवाणकर यांनी सुरुवातीच्या निवेदनात म्हटले आहे. मौखिक इतिहास आणि दुर्लक्षितांचे श्रेय ही दोन सूत्रे घेऊन तयार झालेले हे पुस्तक असे वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

यातली पहिली मुलाखत दत्ताजी ताम्हाणे यांची आहे. ते या चळवळीतले आज हयात असलेले सर्वात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक. निष्ठावान आणि निर्भिड प्रतिमा असलेल्या ताम्हाणे यांनी आपल्या मुलाखतीत तो काळ आणि त्यावेळच्या चळवळीचे रूपरंग तपशीलात उभे केले आहे. सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या निदर्शनात ते सहभागी झाले होते. हा चळवळीतला त्यांचा पहिला सहभाग. याच मिरवणुकीत लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला झाला. त्यानंतरच्या चळवळीचा आलेख त्यांच्या मुलाखतीत सविस्तरपणे आला आहे. चळवळीप्रमाणेच या सर्व मुलाखतींमधून व्यक्‍तिगत जीवनाचे आणि सामाजिक संदर्भांचे तपशीलही येतात. त्यामुळे तत्कालीन समाजजीवन आणि त्यामधील उलथापालथींची माहिती समोर येते. लोकांच्या जीवनाच्या माध्यमातून इतिहासाचा पट उलगडत जातो. तुरुंगातले जीवन, तेथील वातावरण, कैदी म्हणून एकत्र आलेल्यांमधील संवाद आणि वैचारिक देवाणघेवाण, राजकीय जीवनातील आदर्श अशा गोष्टींवर प्रकाश पडतो.

नागनाथ नायकवडी नाना पाटलांच्या पत्री सरकारमधले खंदे सैनिक. कोल्हापूरला शाळेच्या वसतिगृहातून पळून ते बेचाळीसच्या गवालिया टँकवरच्या सभेसाठी मुंबईला आले. वडिलांचा विरोध असल्याने, तिथून घरी परतल्यानंतर त्यांना शिकण्यासाठी शाळेत जावे लागले. मात्र, तिथून पुन्हा ते वसतिगृहाच्या अधीक्षकाला सांगून बाहेर पडले आणि चळवळीत उतरले. त्यांच्यामुळे वडिलांनाही तुरुंगात डांबण्यात आले. नागनाथ नायकवडी तुरुंगातूनही पसार होण्यात यशस्वी झाले. चळवळीच्या ध्यासापायी वाटेल ते करण्याची ताकद त्यावेळच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजली होती. पत्री सरकार चळवळीच्या अनेक आठवणी नायकवडींनी सांगितल्या आहेत. आयुष्य झोकून देऊन काम करणारी ही सारी माणसे होती.

ग. प्र. प्रधान हेही असेच उद्दिष्टांनी भारावलेले व्यक्‍तिमत्त्व. अलीकडेच प्रधान मास्तरांचे निधन झाले. अखेरपर्यंत मनात समाजाचे हित जागे ठेवणारे प्रधान मास्तर एक अभ्यासू विचारवंत आणि तत्त्वनिष्ठ राजकीय कार्यकर्ते म्हणून लोकांसमोर आले. साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी ते एक होते. मध्यमवर्गीय घरात ते जन्मले आणि त्या सुरक्षित जीवनाचा अधिकार आपल्याला नाही ही भावना मनात रुजल्याने ते वयाच्या विसाव्या वर्षी घराबाहेर पडले. आदर्शवादाने भारलेले त्यांच्यासारखे तरुण पुण्यात स्टडी सर्कलमध्ये जमत आणि तेथील व्याखाने मनापासून ऐकत. साने गुरुजींच्या भेटीनंतर तर ते खूपच प्रभावित झाले आणि देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत व्यक्‍तिगत जीवनाचा विचारही न करण्याची प्रतिज्ञा त्यांनी

मनोमन केली. समाजवादी चळवळीतले मित्र व साथी, स्वातंत्र्य लढ्यातील सहप्रवासी यांच्याबद्दलच्या वेगळ्या कहाण्या प्रधान मास्तरांनी या मुलाखतीत कथन केल्या आहेत. अनेक लहानमोठ्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी सांगितले आहे, तशाच गांधीजींसारख्या मान्यवरांच्या वेगळेपणाची झलक दाखवणारे प्रसंगही सांगितले आहेत. निरलस कार्यकर्ता, विधानपरिषदेतील अभ्यासू विरोधी पक्षनेता, ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, साक्षेपी वाचक आणि साहित्यप्रेमी अशा वेगवेगळ्या रूपांनी प्रधान मास्तर महाराष्ट्रला माहीत आहेतच. त्यांची आत्मीय ओळख या मुलाखतीतून होते.

या साऱ्यांबरोबरच अनुताई लिमये, शान्ती पटेल, मोहन धारिया, मोहन रानडे प्रभृतींशी साधलेला संवादही ‘जिंकू किंवा मरू’ मध्ये वाचायला मिळतो. गांधीजींचा प्रभाव त्यांच्यावर खूप होता. बेचाळीसच्या चळवळीत त्नी पुण्यातून बुलेटिन काढण्याचं काम केलं. त्यातच त्यांना अटक झाली आणि तुरुंगवास घडला. तुरुंग हा कधी तुरुंग वाटलाच नाही असे अनुताई मुलाखतीत म्हणतात. उशीमध्ये पत्रे दडवून उशी दुरुस्त करण्याच्या मिषाने बाहेर पाठवली जाई आणि पत्रे काढून ईप्सित स्थळी पोचवली जात अशी मजेशीर हकीकत त्यांनी सांगितली आहे. पुढे अनुताई लिमये सेवादलाच्या कामात मनापासून रमल्या. त्यांनी समाजवादी महिला सभेची स्थापना केली आणि पुणे महापालिकेतही काम केले. शान्ती पटेल हेही गांधी विचारांनी प्रेरित होऊनच चळवळीकडे आकर्षित झाले. काँग्रेसच्या अधिवाशनास विद्यार्थी असतानाच त्यांनी हजेरी लावली होती. बेचाळीसच्या आंदोलनाच्या वेळी ते मेडिकलचे विद्यार्थी होते. नंतर कामगार चळवळीच्या क्षेत्रात ते शिरले आणि पुढे हे त्यांचे एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र बनले. सिंधुताई देशपांडे या कॉलेजात असतानाच चळवळीत शिरल्या. तुरंगवासात असताना जेलच्या कौलावर चढून तीनरंगांच्या साड्यांचे तुकडे बांधून तयार केलेला झेंडा फडकावण्याचे धडस त्यांनी केले. पण त्यावेळी त्यांचे नाव कुणी न सांगितल्याने पुढची कारवाई झाली नाही. गोवा मुक्‍तिसंग्रमातही त्या सक्रिय होत्या. त्याबद्दल त्यांना बारा वर्षांची कैद झाली होती. देशासाठी काहीतरी करत राहण्याचा आणि त्यासाठीच लग्न न करण्याचा निश्चय त्यांनी केला. नंतरच्या काळात मात्र त्या राजकीय कामापासून दूर ठरवून राहिल्या.

जी. जी. पारीख कॉलेजात शिकत असताना बेचाळीसची चळवळ झाली. त्यात सहभागी होताना तुरुंगवासही घडला. कॉलेजात तेव्हा कम्युनिस्ट विद्यार्थी असत आणि त्यांना पाठिंबा न देण्याचे धोरण पारीख यांचा गट बाळगत होते. एकीकडे गांधीजींच्या अहिंसावादाचा प्रभाव तर दुसरीकडे भगतसिंगसारख्या क्रान्तिकारी मंडळींबीबत सॉफ्च कॉर्नर अशी त्यांची मनोवस्था होती. पुढे गांधीविचाराशी ७० ते ८० टक्के सहमती वाटू लागली असे ते म्हणतात. नंतर मात्र पारीख समाजवादी बनून राहिले. एका मुसलमान मित्राकडे ते जेवले म्हणून त्यांच्या शिक्षकाने त्यांना थप्पड मारल्याची घटना त्यांनी सांगितली आहे. पुढे आपण काढलेल्या संस्थेचं नामकरण यूसुफ मेहरअली ठेवलं त्यामागे हीच घटना कारणीभूत होती असे त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे. मोहन धारिया हे गुजराती कुटुंबात जन्मले तरी मराठी संस्कृती त्यांनी सहज आत्मसात केली याला कारण कोकण ही त्यांची जन्मभूमी आहे. वडील जेमतेम शिकलेले असले तरी सामाजिकदृष्ट्या ते सजग होते. महाडच्या तळ्याच्या सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. धारिया कोकणातील जंजिरा संस्थान स्वतंत्र करण्याच्या मोहिमेत आघाडीवर होते, एवढेच नाही तर ते त्या संस्थानचे परराष्ट्रमंत्री बनले होते. तिथला सिद्दी पाकिस्तानात सामील होण्याच्या प्रयत्नात होता. स्वातंत्र्यानंतर हैदराबाद व इतर संस्थानांप्रमाणे जंजिरा हेही एक होते. म्हणून ही मोहीम आखण्यात आली होती. धारिया पुढे पुण्यातून खासदार म्हणून गेले. आणीबाणीत त्यांना तुरुंगवास घडला. कामगार चळवळ, गांधीविचार, राष्ट्रसेवादल, विस्वस्ताची कल्पना अशा अनेक प्रेरणा घेऊन त्यांनी वाटचाल केली आहे. एक काळ चंद्रशेखर यांच्या जोडीने धारिया यांचे नाव तरुण तुर्क म्हणून घेतले गेले. वनराई या उपक्रमाच्या माध्यमातून ते ग्रामीण समाजाला दिशा देणारे कार्य कर
आले.

विजेंद्र काबरा हे मराठवाड्यातील लढाऊ स्वातंत्र्.सैनिक. बेचाळीसच्या चळवळीत आणि हैदराबाद मुक्‍तिसंग्रमात त्यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला. मराटवाडा विकास परिषद, मराठवाडा राष्ट्रीय मिल मजदूर संघ, इंटक, श्रमिक विद्यापीठ अशा संस्था- संघटनांशी त्यांचा सक्रिय संबंध होता. गोवा मुक्‍तिसंग्रामाशी अभिन्नतेने जोडलेले नाव म्हणजे मोहन रानडे. गोवा स्वतंत्र झाल्यावरही ते तब्बल आठ वर्षे पोर्तुगालमधील तुरुंगातच होते. १९६९ मध्ये त्यांना सोडण्यात आले. १९४८ साली मॅट्रिक झाल्यावर ते गोव्याच्या मुक्‍तीसाठी बाहेर पडले. त्याआधीही मनात इच्छा असूनही लहान वयामुळे स्वातंत्र्यलढ्यात जाता आले नव्हते. आईला न विचारताच ते घर सोडून निघाले. गोव्याच्या लढ्याचा इतिहास ते जगले, असे म्हणता येईल. गोव्यातील मोहिमेची तपशीलवार हकीकत त्यांच्या मुलाखतीत आहे. या लढ्यात त्यांच्या पोटावर गोळीही लागली होती. त्यांना शिक्षाच मुळी २६ वर्षांची ठोठावण्यात आली. या कारावासातील दिवस, कोडवर्ड तयार करून संदेश तुरुंगाबाहेर पाठवण्याची युक्‍ती याबद्दलही ते सांगतात.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरावा. इतिहासलेखनात अलीकडे मौखिक इतिहासास महत्त्व आले आहे. पूर्वी, मुलाखती म्हणजे केवळ भरकटलेल्या आठवणी अशी धारणा असे. आता मात्र ठोस पुराव्याबरोबरच माणसांनी मनात जपलेल्या आठवणी याही इतिहासाचाच एक भाग असतात हे तत्त्व मान्यता पावले आहे. यादृष्टीने पाहिले तर हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतला एक लखलखता कालखंड मांडणारे लेखन आहे. ऐतिहासिक दस्तावेजापेक्षा या लेखनाचे महत्त्व तसूभरही कमी नाही.

— नंदिनी आत्मसिध्द
(सौजन्य ‘महान्यूज’)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..